जोपर्यंत उद्दिष्टांच अस्तित्व, तोपर्यंत तुमचं अस्तित्व… आणि तोपर्यंत यशाचं अस्तित्व ! | Yashmudra (Part 1) - मागणे

यशमुद्रा (भाग : १) -  मागणे (Ask )

सृष्टी द्यायला कमी पडत नाही… कमी तर मागणाऱ्यांची आहे!

एखादं स्वप्न पाहाणं, एखादं ध्येय ठरवणं एवढ्यानेच कार्य सिद्धीस जात नाही. आपल्या स्वप्नांच्या पूर्णत्वासाठी कायम दक्ष राहायला हवं. त्यासाठी ते ध्येय मनात कोरून ठेवायला हवं. त्याचं कदापि विस्मरण होता कामा नये. कारण आज उद्दिष्ट ठरवलं आणि उद्या ते सिद्धीस गेलं, असं कधीही होत नाही. प्रत्येक गोष्टीच्या पूर्णत्वासाठी एक ठराविक कालावधी लागतो. हा कालावधीच तुमच्या ध्येयाच्या पूर्णत्वासाठी सारी जुळवाजवळ करत असतो. या साऱ्या गोष्टींचा मेळ जुळला, की एक अशी वेळ येते जेव्हा तुमचं कार्य सिद्धीस जातं.


गांधी सिनेमाचे निर्माता रिचर्ड अॅटनबरो  यांनी गांधी सिनेमाची कल्पना करून ती पूर्ण करायचीच हे ठरवलंच. पण ही कल्पना ठरवल्यानंतर ती तब्बल वीस वर्षांनी प्रत्यक्षात आली. रिडर्ड अॅटनबरो ही कल्पना तात्काळ अंमलात आणायला तयार होते. पण परिस्थिती जुळत नव्हती, अडचणी येत राहिल्या. समस्या सतावू लागल्या. मधेच अनेक नव्या गोष्टी घडल्या. पण साऱ्या काळाच्या घोंगावत्या प्रवासात रिचर्ड अॅटनबरोनी आपल्या उद्दिष्टाचं विस्मरण होऊ दिलं नाही. ते त्यांना करायचंच होतं. 

Richard Attenborough गांधी सिनेमा मोटिवेशन
Richard Attenborough 


अखेर सारं जुळून आलं. आपापल्या जागेवर चपखल बसलं आणि गांधी सिनेमा तयार झाला. हीच गोष्ट मोगले आझम या चित्रपटाची. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती आपापला वेळ घेते. तेवढा वेळ संयम राखला; त्या गोष्टीला हवा तेवढा वेळ दिला, तरच ती हवी तशी आकारास येते.

फळ पक्व व्हायला काही वेळ द्यायलाच लागतो. त्यावेळच्या आधीच ते तोडलं, तर त्याची गोडी लागत नाही. योग्य तो परिणाम मिळत नाही. मात्र एकच उद्दिष्ट ठरवलं आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी निर्धारित वेळ द्यायचा ठरवला, तर मधला काळ निव्वळ वाट पाहाण्यात अथवा वाया जाण्याचा सर्व संभव असतो. काही उद्दिष्टं लवकर साध्य होतात, काहीना अनेक वर्ष आपला प्रत्येक क्षण कारणी लागावा यासाठी एकच उद्दिष्ट नका अल्पसंतुष्ट होऊ नका. तुम्ही जेवढं मागता तेवढंच तुम्हाला मिळतं. तुम्ही भरपूर मागा, तुम्हाला भरपूर मिळेल. म्हणूनच उद्दिष्ट ठरवताना ती मनात कोरून ठेवताना, एकच नव्हे असंख्य उद्दिष्टं ठरवा. त्यांच्या परिपूर्तीसाठी धडपडत राहा. पूर्ण क्षमतेने, पूर्ण एकाग्र हाऊन तुमच्या उद्दिष्टा प्रती जेव्हा तुम्ही कार्यरत व्हाल, तेव्हा तुमच्या उद्दिष्टपूर्तीच्या मदतीसाठी सारी तुमच्यामागे उभी असेल. सृष्टी सर्वोत्तम गायक व्हायचं उद्दिष्ट ठेवलेल्या गायकाला रेडिओ केंद्रावरून फोन आला, 'आमच्या रेडिओसाठी आम्हाला तुम्ही गायलेली गाणी हवी आहेत. तुम्ही गाण्यासाठी येऊ शकाल का?' हा गायक त्वरित म्हणाला, मी तुमच्या बोलावण्याचीच वाट पाहात होतो!' त्यावर त्यांनी आश्चर्यान विचारलं, म्हणजे? गायक म्हणाला, मी नऊ वर्षांपूर्वीच ठरवलं होतं. मी एक दिवस रेडिओसाठी गाणी म्हणेन! आज ती वेळ आली!'

तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण होतंच. तुम्हाला जेवढं हवं तेवढं मिळतंच. अधिकता, मुबलकता हा विश्वाचा स्थायीभाव आहे तुम्ही तुमच्या उद्दिष्टाला म्हणूनच मर्यादा घालू नका. लोक अपयशी ठरतात, याचं कारण त्यांना खूप काही हवं असतं म्हणून नव्हे, तर त्यांना खूप कमी हवं असतं म्हणून या सृष्टीचं अद्भुत रहस्य हे आहे की, ही सृष्टी कुणाला काही द्यायला कधीच कमी पडली नाही. कमतरता असलीच, तर ती मागणाऱ्यांची आहे. तुमची कष्ट करण्याची, संघर्ष करण्याची तयारी असेल, तर कमी का मागता? प्रचंड मागा, उदंड मागा. तुम्हाला अफाट सहज मिळून जाईल.

उद्दिष्ट्य पूर्ण झालं की तुमचा प्रवास थांबला. याचा अर्थ तुम्ही संपला. मग तुमच्या जिवंतपणाला अर्थ नाही. एकाच्या पूर्णत्वातून दुसरी उद्दिष्टं जन्मायला हवीत. तरच तुमच्या जिवंतपणाचा प्रवास अखंड राहील. जोपर्यंत उद्दिष्टांच अस्तित्व, तोपर्यंत तुमचं अस्तित्व… आणि तोपर्यंत यशाचं अस्तित्व !

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने