यशाचा पासवर्ड (भाग :110)-मोठेपणा
लोकांनी तुम्हाला 'राजा' समजावं असं वाटत असेल तर
आधी तुम्ही राजासारखं वागलं पाहिजे..!
आपल्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासात ज्यावेळी आपण काही काह त्यावेळी सारं आपणास हवं तसंच घडेल, असं नसतं, तसं घडतही नाही. वाट्याला येणारे नकार, टोलवाटोलवी, अथवा अपयश यामुळे आपल्या क्षेत्राला, अपेक्षांना मर्यादा पडतात. त्या मर्यादाची बंधनं मग आपण आपल्याभोवती घालून घेतो. हे आपल्याला साधणार नाही अथवा मि ळणार नाही. म्हणत आपण आपल्या अपेक्षा कमीकमी करत नेतो. अखेर अल्पसंतुष्ट बनतो. आपणच आपल्याला अत्यंत सामान्य समजत तसेच जगत राहातो. एखादी क्षुल्लक विनंती करतानाही आपण मग अभिवादनाची, मुजऱ्याची अथवा याचनेची भाषा बोलत राहातो. हे आपणच आपलं केलेलं खच्चीकरण असतं. स्वत: ला कमी समजून आपणच आपल्या मोठेपणाच्या वाटा बंद करून टाकतो. आपल्या कर्तृत्वाच्या क्षितिजाला पुरतं आकसून टाकतो. अशा परिस्थितीत यश कसं लाभेल ?
यावर सर्वोत्तम उपाय एकच. या साऱ्यांच्या विरुद्ध दिशेला स्वत:ला घेऊन जाणं. स्वतःला कमी समजणं सोडून द्या. अपयशाला अगदी नगण्य समजून स्वतःच्या मर्यादा पुरत्या झुगारून द्या. याचनेची भाषा सोडून हक्काने मागणी करा. हे मिळणं आपला अधिकारच आहे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे, अशा ठोस भूमिकेतून स्वतःवरचा विश्वास प्रकट करा. आपला जन्म किरकोळ जगण्यासाठी आणि रडत-कुढत वागण्यासाठी झालेला नसून या सृष्टीमध्ये आपण काही भव्य-दिव्य करण्यासाठीच आलो आहोत. काही तरी अफाट आणि बलाढ्य करण्यासाठीच आपली निवड झाली आहे. ही धारणा स्वतःच्या अंतरंगात एवढी भिनवा की, तिचं रूपांतर आत्मविश्वासात व्हायला हवं. आपण कुणीतरी मोठे आहोत, ही भावना त्या आत्मविश्वासातून निर्माण होते आणि मग मोठे आहोत तर काहीतरी मोठंच केलं पाहिजे, या जाणिवेतून इतिहास घडवणारी कामं आपल्या हातून घडतात.
आपल्या मनात आपल्याबद्दलच्या असणाऱ्या मोठेपणाच्या भावना, आपली सकारात्मकता आणि भव्य अपेक्षा या इतरांच्या मनातही आपल्याबद्दल त्याच भावना निर्माण करत राहातात आणि लोक विचार करू लागतात की, एवढा आत्मविश्वास वाटण्याएवढे काही सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट गुण निश्चितच आपण बाळगून आहोत. मग आपोआपच आपल्याबद्दलचा आदर दुणावतो. लोक तुम्हाला कशी वागणूक देतात, ते बऱ्याच अंशी तुम्ही तुम्हाला त्यांच्यासमोर कसे प्रकट करता यावर अवलंबून असतं. तुमची वागणूक जर अत्यंत सामान्य अभिरुचीची आणि हिणकस असेल, तर लोक तुमचा अनादरच करतील. याउलट, तुम्ही कोणीतरी थोर आहात, असे स्वतःला वागण्या-बोलण्यादिसण्यातून प्रकट केलेत, तर लोक निश्चित तुमचा आदर करतील. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं, हे लोक नव्हे, तर तुम्हीच तुमच्या कृतीतून ठरवत असता. लोकांनी तुम्हाला राजा समजावं असं वाटत असेल, तर आधी तुम्ही राजासारखं वागलं पाहिजे. भले तुम्ही राजे नसलात तरी !
स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः कडून नेहमी धाडसी मागणी करा. किरकोळ स्वप्नं पाहू नका. तुमचं मूल्य कायम अत्यंत उच्च ठेवा. तुमची पातळी कायम उन्नत आणि अत्युच्च ठेवा. खाली उतरू नका. लढाई करायचीच असेल, तर शत्रू अफाट आणि बलाढ्यच निवडा. किरकोळांशी भिडूच नका. तुमचा विरोधक जेवढा मोठा असेल, तेवढे आपोआप त्याच्याशी लढण्याने तुम्ही मोठे होता. कधीतरी तुम्हालाही राज्यपद लाभून कधी तुमचाही राज्याभिषेक सोहळा होईल याची वाट बघूच नका. सगळ्या महान राजांनी स्वतःच स्वतःला राजमुकुट घालून घेतले आहेत. कुणी त्यांना आणून दिले नाहीत. तुम्हालाही कोणी आणून देणार नाही. राजेच आहोत असं म्हणून स्वतःचा राजमुकुट स्वतःच घालून घ्या. राजासारखंच वागा. आपोआप इतर लोकही तुम्हाला राजासारखीच वागणूक, आदर आणि सन्मान देतील. यश यापेक्षा कुठे वेगळं असतं ?