यशाचा पासवर्ड (भाग :109) -सद्गुण
पैशाचा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महत्वाची ती सद्गुणाच्या कमाईतून येते..!
पैशाच्या श्रीमंतीपेक्षा सद्गुणांची श्रीमंती फार महत्त्वाची असते. सद्गुणांअभावी पैशाची श्रीमंतीही लयाला जाते. मात्र गुणांच्या श्रीमंतीच्या बळावर मनाची श्रीमंती कमावता येते. पूर्वी माणसं मनांनी आणि गुणांनी श्रीमंत असायची. आता माणसं पैशाने श्रीमंत होऊ पाहातात. ते होताना सद्गुणांना मागे सारत अवगुणांची साथ धरत पुढे झेपावतात, पण नंतर जरूर पस्तावतात.
दोन मित्र जगण्याच्या प्रवासात सोबत चाललेले. एक पुढे जाण्याच्या ईर्षेने झपाटलेला. तर दुसरा साऱ्यांना सोबत घेऊन चालत राहिलेला. पुढे जाऊ पाहाणारा प्रचंड पुढे गेला. अफाट श्रीमंत झाला. मात्र अचानक फासे उलटे पडले. त्याला उद्योगात प्रचंड नुकसान झालं. दहा लाख रुपयांची विलक्षण गरज पडली. पण करावं काय? त्याला सुचेना. कुणाकडे मागावे त्याला समजेना. तो पुरता हैराण झाला. त्याच्या मित्राने त्याची ही अवस्था पाहिली. त्याने विचारलं, 'काय झालं? त्याला कळेना. याला सांगून तरी काय फायदा?
याच्याकडे एवढेही पैसे नसणार. तो बोलेना. मित्राने पुन्हा विचारलं, अरे, सांग रे, काय अडचण आहे? काही मार्ग काढता येतो का ते पाहू. बोल तरी!
नाइलाजाने त्याने अडचण सांगितली. दहा लाखांची तातडीची गरज व्यक्त केली. ती ऐकल्यावर मित्र म्हणाला, 'अरे एवढंच ना. थांब जरा!' असं म्हणून त्याने आपल्या फोनवरून काही मित्रांचे नंबर फिरवले. मित्रांशी बोलला आणि मग त्याला म्हणाला, 'उद्या तुझ्या बँक खात्यावर पैसे जमा होतील. निर्धास्त राहा!'
आपल्या मित्राचं हे बोलणं त्याला विश्वासार्ह वाटलं नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचं कळताच तो आश्चर्यचकित झाला. कारण त्याचा समज फोल ठरला होता. त्याने मित्राकडे येऊन विचारलं, 'अरे, हे कसं जमलं तुला?' तेव्हा त्याचा गरीब मित्र शांतपणे म्हणाला, 'मित्रा, ज्यावेळी तू पैसे कमवत होतास, त्यावेळी मी माणसं कम तू वत होतो. मित्र जमवत होतो. मी माणसांच्या चांगुलपणाची, श्रीमंत मनांची आणि सर्वोत्तम गुणांची साधना करत होतो.'
आपल्या गुणांकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं. अवगुणांकडे दुर्लक्ष करायला हवं, इतकं की ते आपल्यात होते, याचा मागमूसही लागता कामा नये. आपल्यात काय गुण आहेत हे प्रत्येकाला माहिती असतं. पण ते झाकून ठेवले किंवा झाकूनच राहिले, तर त्याचा उपयोग काय? आपल्यात असणाऱ्या सद्गुणांचं व्यवस्थित प्रकटीकरणही आपल्याला करता आलं पाहिजे. तरच लोकांना तुमची उत्तमता कळेल. तुमच्यात मुळातच नसलेले गुण असल्याचा नुसता देखावा करू नका. मुखवटे शेवटी गळूनच पडतात. जे नाही ते मिळवायला, प्रयत्नपूर्वक अंगी बाणवायला शिका.
प्रत्येकात गुणदोष असतातच. माणसांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्यांच्यात असणाऱ्या गुणांचं कौतुक करा. कणभर सोनं मिळवायला मणभर माती बाजूला सारावीच लागते. दोष बाजूला सारा. लोकांच्या गुणांना जवळ करा. त्याचा स्वतःसाठी उपयोग करा. ते गुण स्वतःसाठी प्राप्त करा. ते नक्कीच तुम्हाला लोकप्रियतेकडे आणि यशाकडे नेतील.
सद्गुण अथवा अवगुण हा आपल्या हेतूवर अथवा क्रियेवर ठरत असतो. खरं तर, स्वार्थ असणं वाईट नाही. पण स्वार्थ जे जे उत्तम-सर्वोत्तम ते ते माझ्यात हवे, या भावनेचा असला पाहिजे. क्रोध वाईट नव्हे, पण तो जिथे अन्याय-अत्याचार-अनैतिकता तिथेच प्रकटला पाहिजे. मत्सर, द्वेष हेही वाईट नव्हेत. पण जे जे विनाशक, विघातक, अविचारी त्यांच्याबाबतच तो घडला पाहिजे.
आपलं व्यक्तिमत्त्व आपले विचार घडवतात. आपले विचार आपले गुण ठरवतात. आपले गुण हे आपणच आपल्यावर केलेल्या संस्कारांमुळे येतात. तेच स्वीकारा जे सत्य असेल. तेच बना जे सद्गुणी असेल, कारण तेच यशाचे राजमार्ग आहेत.