यशाचा पासवर्ड (भाग :108) - 'स्व' निर्मिती
स्वत:ची सर्वोत्तम निर्मिती करण्यासाठी स्वतःवरच काम करणं हे आयुष्यभराचं भव्य कार्य आहे..!
आपल्याला जन्मजात मिळालेले गुण म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व नव्हे. तर आपल्या उणिवा शोधून, त्या कमतरता दूर करण्यासाठी विशेष गुण प्राप्त करून, कुंभार जसा चिखलाच्या गोळ्याला हवा तो आकार देतो, तसा आपल्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देणं. मात्र हा आकार देत असताना कुणा बाहेरच्या हस्तक्षेपाला विरोध करणं, मर्यादा घालणाऱ्या इतरांच्या क्षमतांना रोखून धरणं आणि स्वतःच्या जडणघडणीचं पूर्ण नियंत्रण स्वतःच्याच हातात ठेवणं. हे सारं साधणं ज्याला साधतं, त्याला स्वतःचं विलक्षण व्यक्तिमत्त्व घडवता येतं. खरं तर, स्वतःवरच काम करणं हे अत्यंत आनंददायी आणि आयुष्यभराचं भव्य कार्य होऊन जातं. तुम्ही स्वतःच एक आकृती व्हा…आणि तिला घडवणारे हाडाचे कलावंत तुम्हीच बना. जगात सर्वोत्तम-सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च होण्यासाठी तुम्ही स्वतःच स्वतः ची पुनर्निर्मिती करा.
स्वतःच्या 'स्व'ची निर्मिती करण्यासाठी गरज असते, ती 'स्व'च्या जाणिवेची, स्वतःच्या परिपूर्ण ओळखीची! आपल्यात काय आहे आणि काय नाही; आपण काय करू शकतो आणि काय नाही याची! स्वतःला कुठे आणि कसं प्रकट करावं…तसंच कुठे आणि काय झाकून ठेवावं, याची अखंड जागरूकता यासाठी फार महत्त्वाची ठरते. आपलं व्यक्तिमत्त्व घडवणारे कलावंत आपण होत असाल, तर आपण कलाकारासारखंच बनलं पाहिजे. कलाकार एखादी भूमिका करताना पूर्ण भानावर असतो. आपला पेहराव, आपली देहबोली आणि आपल्या भावना यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. चार लोकांत गळे काढून रडणाऱ्याला सुरुवातीला सहानभूती मिळते, पण नंतर तोच उपहासाचा विषय बनतो. जिथे अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे, जिथे सारे गंभीर, तिथे अचानक तुम्ही कुठली तरी गोष्ट आठवून हसत सुटणे, हा त्या लोकांचा मानभंग ठरतो. अतिप्रामाणिकपणा महाघातकी ठरतो. स्वत:वर काबू ठेवायला शिका. कलाकाराची लवचिकता अंगी बाणवा. जिथे ज्या भावनेची गरज आहे, त्याच भावनेचं प्रकटीकरण करा. उचित वेळी हसता आणि रडताही आलं पाहिजे. आनंदाचे शत्रू फार. म्हणून शत्रूच्या मेळ्यात आनंद लपवता आला पाहिजे. तर आपल्या दुःखाचं भांडवल कुणी करू नये, यासाठी नैराश्यातदेखील हसता आलं पाहिजे. तुम्हाला लोक कमवायचे असतील, तर त्या त्या वेळी तुम्ही जसे लोकांना हवे आहात, तसे होऊन जा. यशस्वी व्हायचं असेल तर, तुमच्या भावमुद्रांचे स्वामी तुम्हीच बनलं पाहिजे!
वर्तमानकाळाला साजेशी वागणूक ठेवा. तुम्ही पन्नास वर्षांपूर्वीचा पेहराव घालून आलात, तर लोक हसतील आणि वीस वर्षांनंतरचा विचार करीत असाल, तरी लोकांच्या तो डोक्यावरून जाईल. भूतकाळात फार रमू नका आणि भविष्य काळात भरारू नका. तुमची विचारसरणी, आशय, सत्त्व हे काळानुसार असेल, तरच तुमचं व्यक्तिमत्त्व वर्तमानकाळात उठून दिसेल.
तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा तुम्हीच बना. इतरांना काय वाटतं, हे विचारू नका. इतरांना कसे दिसता, हे पाहू नका. तुमच्या आरशात तुम्ही तुम्हाला कसे वाटता, हे पाहा. स्वतः च्या बारीक निरीक्षणातून तुम्ही प्रचंड मोठ्या घोडचुका टाळू शकता. तुमच्याकडे इतरांसारखं काय आहे आणि इतरांपेक्षा वेगळं काय आहे, हे उमगलं की तुम्ही सर्वोत्तम होण्यासाठी काय हवं आहे, हे जाणू शकता. स्व निर्मितीचा दुसरा टप्पा तोच आहे. स्वतःच्या चिरस्मरणीय वाटतील अशा पैलूंची उभारणी!
इतरांपेक्षा सरस, वेगळं. इतरांचं लक्ष त्वरित वेधून घेईल अशा व्यक्तिमत्त्वाची निर्मिती, ही अशा विलक्षण पैलूंतून होत असते. हे पैलू हीच तुमची ओळख बनते. हे सर्वोत्तम पैलूच; मग ते आपुलकीचे, प्रेमाचे, शौर्याचे, उल्हासाचे, बुद्धिमत्तेचे कोणतेही असोत, हे तुमचे विलक्षण पैलूच तुम्हाला पैलूदार यश देतील!