नैतिक कथा - लबाड बोका
एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दूध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.
थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजच्या मडक्यात दूध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले.
ती माकडे खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरू झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली.
बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराज मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले. एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले.
मग त्यातील थोडें लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्याने घेतला. 'हे उशिरा त्याच्या लक्षात आले.
तात्पर्य :- दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ.