तुम्ही कुणाच्या सान्निध्यात असता यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं | Yashacha Password (Part 107) - संगत

यशाचा पासवर्ड (भाग :107) -संगत

तुम्ही कुणाच्या सानिध्यात असता यावरच तुमचे भविष्य अवलंबून असते..!

एका चिमणीने चोचीत पकडलेली बी अचानक निसटली आणि ती एका देखण्या इमारतीच्या भिंतीवर पडली. घसरत घसरत ती दोन पत्थरांच्या मधल्या चिऱ्यात बरोबर अडकली. तिला पाहाताच ती इमारत चिडली. पण ती बी म्हणाली, कृपा करून मला इथे राहू दे. मला आता कुणाचाच आधार नाही. त्या चिमणीने मला उचललं. तशी मी संपलेच होते. पण तिच्या चोचीतून निसटल्याने बचावले. आता माझी फार काही इच्छा नाही. या अगदी छोट्याशा जागेत मी राहीन. तुझं सौंदर्य, तुझं देखणेपण अप्रतिम आहे. बस्स! मला तुझ्या सान्निध्यात राहू दे. मला इथून दूर लोटू नकोस. माझ्यावर दया कर.!

त्या 'बी'ने केलेली ही विनवणी ऐकून इमारतीला तिची दया आली आणि तिने तिला तिथे राहाण्यास संमती दिली. आपल्या भिंतीच्या चिऱ्यात तिला आश्रय दिला.

बघता बघता काही दिवसांतच त्या कठीण बीला अंकुर फुटला. तिची मुळं त्या दगडांच्या फटीत खोलवर रुजू लागली.

आत-आत घुसत त्या दगडांना दुभंगत स्वतःला जागा करून घेऊ लागली. बाहेर तिच्या फांद्याही जोमाने वाढू लागल्या, आभाळाकडे झेपावू लागल्या. काही काळातच मुळं धष्टपुष्ट होत आत भिंतीला धडका मारू लागली. भिंतीतील दगड हलवून त्यांना आपापल्या जागा सोडायला लावू लागली. काही दिवसांतच भिंतीला तडे गेले व इमारतीचं देखणेपण सौंदर्य हरवलं. त्या 'बी'ला आश्रय दिल्याबद्दल इमारत आता शोक करू लागली आणि काही काळातच ती ढासळली. पुरती नेस्तनाबूत झाली.

तुम्ही कुणाच्या सान्निध्यात असता यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं | Yashacha Password (Part 107) - संगत

संगत फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुणाच्या सान्निध्यात असता यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. परिस्थितीने गांजलेल्यांना मदत जरूर करावी. मात्र सर्वच अपयशी लोक हे परिस्थितीने नव्हे; तर त्यांच्या स्वतःच्या कर्माने आणि चुकांनी गांजलेले असतात. त्यांची अपयशी अवस्था त्यांनी आपल्या हाताने करून घेतलेली असते. अशा लोकांना जवळ करून त्यांना सुधारणं-उन्नत करणं-यशस्वी बनवणं, ही अत्यंत महान गोष्ट झाली. पण बऱ्याचदा त्यांना सुधारण्याऐवजी त्यांच्या चुकीच्या कृती आणि विचारांचा आपल्यावरच प्रभाव पडतो आणि आपल्यातच चुकीचा बदल घडू लागतो. योग्य संगत माणसाला घडवते आणि अयोग्य संगत माणसाला बिघडवतेच! काहींची निवड आपण करतो तर काही नकळत आपल्याला जवळ घेतात. त्यांचं भलंबुरं कळेपर्यंत फार वेळ निघून गेलेला असतो. मग त्यातून बाहेर पडण्याकरिता प्रचंड शक्ती आणि प्रचंड वेळ वाया घालवावा लागतो.

संगत ही सामर्थ्यवान असतेच. जी माणसं बुद्धिमत्ता, धैर्य, शौर्य, कार्यतत्पर, उल्हासी आणि आनंदी असतात. त्यांचे हे गुण यशाला खेचून घेणारे ठरतात. अशा लोकांच्या सान्निध्यात राहाणं म्हणजे यशस्वी होणं! त्यांची सोबतही त्यांच्यातील सकारात्मक गुण आपल्यात निर्माण होण्यासाठी अत्यंत उत्तम असते. सर्वोत्तम माणसाच्या सहवासात आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि गुणांनाही झळाळी येते.

तुम्हाला एखादी गोष्ट, एखादा गुण प्राप्त करायचा असेल, तर तो मुळातच ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या संगतीत राहा. ज्यांच्याकडे त्या गुणांची उणीव आहे, त्यांच्याकडे मात्र जाणं टाळा. गुणी माणसाकडे जाणं तुम्हाला गुणवान बनवेल. दुर्गुणी माणसाकडे राहाणं तुम्हाला दुर्गुणी ठरवेल. तुमची ओळख ही तुमच्यावरून होत नाही; तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, याच्यावरून ती ठरते.

तुम्ही निराश असाल, तर आनंदी माणसाकडे जा. मागे पडत असाल, तर पुढे पळणाऱ्यांच्या संगतीत राहा. एकलकोंडे असाल, तर मिळून मिसळून राहाणाऱ्यांच्यात वावरा. नकारात्मकतेशी नातं जोडूच नका. सकारात्मकतेशी नातं जोडा. अपयशी ठरत असाल, तर यशस्वी माणसांच्या कोंडाळ्यात जा. तुम्ही तुमच्यासाठी कुणाची निवड करता, यावरच तुमचं यश-अपयश ठरत असतं. चुका करून त्या पुन्हा दुरुस्त करत बसण्यापेक्षा चुकाच होऊ नयेत यासाठी दक्ष आणि सावध राहाणे, हाच यशाकडे वेगाने नेणारा सर्वोत्तम मार्ग आहे!


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने