यशाचा पासवर्ड (भाग :105) -धाडस (courageous)
काहीच न करणे यापेक्षा काही करुन 'चुकणे' चांगले..!
रंगमंचावर प्रयोग ऐन रंगात आलेला असताना, काम करणारी अभिनेत्री त्याची आई अचानक चक्कर येऊन कोसळली. तो तातडीने रंगमंचावर धावला. आपल्या आईला त्याने सावरलं. रंगमंचाबाहेर नेलं. प्रयोग बंद पडल्याने जमलेल्या रसिकांनी कल्लोळाला सुरुवात केली. त्याची आई आता प्रयोग करू शकणार नव्हती. बाहेर प्रेक्षक संतापले होते. प्रयोग रद्द होऊन चालणार नव्हतं. अचानक त्याने मनाशी काही ठरवलं आणि तो रंगमंचावर आला. आपल्या आईची जागा भरून काढायला रंगमंचावर आलेला तो इवलासा पोर पाहून प्रेक्षक थबकले. त्या इवल्याशा मुलाकडे पाहू लागले आणि पोर बघता-बघता आपल्या अभिनयाच्या करामती दाखवू लागला. जे जमेल तसं, जे सुचेल तसं सादरीकरण चाललं होतं त्याचं! पण प्रेक्षक भारावले होते. टाळ्यांचा कडकडाट वाढत होता. आपल्या कोसळलेल्या आईची वेदना मनात लपवून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर तो हास्याचे कारंजे फुलवीत होता.
आपल्या आईची जागा भरून काढण्याची आणि आयुष्यात पहिल्यांदाच रंगमंचावर उभे राहाण्याची त्याची धिटाईच त्याला पुढे जगविख्यात बनवणारी ठरली. इतकी की, चार्ली चॅप्लीन हे त्याचं नाव हा लोकांच्या ओठांवर हसू फुलवणारा चिरंतन मंत्र झाला.
तुमचा धीटपणाच तुम्हाला कृतीच्या मैदानात बेधडक उतरायला भाग पाडतो, हा धीटपणा आत्मविश्वासातून प्राप्त होतो. कोणत्याही गोष्टीला बेधडक सामोरं जाणारी माणसंच यशस्वी ठरतात. संधी दाराशी येऊनही निव्वळ धीटपणाअभावी तिचा वापर करून न घेणारी माणसं आयुष्यात काही करू वा बनूही शकत नाहीत. मनातील हो-नाहीची आंदोलनं आणि शंका-संशय यामुळे माणसांच्या हातून कृतीच घडत नाही. हा भ्याडपणा अत्यंत धोकादायक असतो.
काहीच न करणे यापेक्षा काही करून चुकणे चांगले.
घावरटपणापेक्षा धाडसीपणा केव्हाही उत्तम! पण परिणामांच्या भीतीने आपण मागे सरतो. आपला हा भ्याडपणा लपवण्यासाठी मग सभ्यता, सुसंस्कृतपणा वैगरेचा आधार घेतो. खरं तर, हा आत्मकेंद्रीपणा असतो. आपण स्वतःच काळजीत असतो, ते स्वतःच्या! लोक काय म्हणतील म्हणत आपण त्याला लोकाभिमुख बनवू पाहातो. घाबरटपणा दबल्याची भावना निर्माण करून तुम्हाला दाबून ठेवतो. तर धीटपणा तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवतो. स्पष्टवक्ता बनवतो. घाबरटपणा तुमचं अवमूल्यन करतो, तर धीटपणा तुमचं मूल्य वाढवतो.
कोलंबसने अमेरिका शोधण्याचं धाडस केलंच. पण स्पेनच्या दरबारात त्याने या साऱ्या सफरीचा खर्च स्पेन दरबारने उचलावा, अशी मागणी केली. शिवाय त्याने स्वतःच सांगितलं, जाण्यापूर्वी मला ग्रॅण्ट अॅडमिरल ऑफ द ओशन हा किताब द्या. विशेष म्हणजे, त्याच्या या मागण्या मान्यही करण्यात आल्या. आपल्या धीटपणाच्या जोरावर कोलंबसने हे सारं मागण्याचं साहस केलं आणि ते मिळवलंही!
तुमची किंमत तुम्ही धीटपणे सांगायला हवी. मागणाऱ्याला सारे मिळतं. धीटपणा हे मागण्याचं सामर्थ्य देतो. आपल्या भूमिकेपासून मागे न हटण्याचं, ठामपणे उभं राहाण्याचं सामर्थ्य तुम्हाला ताकदवान आणि भव्य बनवतं. व्यक्तित्वाची ही भव्यता धीटपणातून-धाडसातून येते. घाबरटपणा तुम्हाला तडजोड करायला लावतो. तुमचा हा कमकुवतपणा लक्षात आला, की समोरचा मग तुम्हाला आणखी मागे सारायला भाग पाडतो. धीटपणा हा बचावात्मक पवित्रा नव्हे; तर आक्रमकपणा तुमच्यात निर्माण करतो. हा तुम चा धीटपणा, धाडसी प्रतिमा लोकांसमोर आली की, तुम्हाला मागे रेटण्याचंच काय, पण तुमच्याशी लढण्याचंही कोणी ठरवणार नाही.
जन्मताच माणसं धाडसी निपजत नाहीत. कोणत्याही संकटला सामोरं जाण्याचा धीटपणा तुम्हाला धाडसी बनवत जातो. धाडसाचा नि साहसाचाही सराव करावा लागतो. सरावातून हे कौशल्य आत्मसात करता येतं. धीटपणे सामोरं जाणाऱ्यालाच संधी मिळते आणि धाडसी व्यक्तीच्या गळ्यातच यशस्विता माळ घालते.