यशाचा पासवर्ड (भाग :105) -स्पर्धा (Competition)
प्रत्येकवेळी आपणच जिंकलं पाहिजे असं नाही काही पराजयही खूप काही देऊन जातात..!
प्रत्येक व्यक्ती सर्वोत्कृष्ट होण्यासाठी धडपडत असते; तसेच सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करत असते. प्रत्येकातील जे सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट ते बाहेर काढण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्यात चुरस लावून देणे. त्यांच्यात निकराची स्पर्धा लावून देणे.
तशी प्रत्येकातच स्पर्धेची जन्मजात प्रवृत्ती असते. इतरांना हरवून आपण जिंकावे, हा प्रत्येकाचा स्थायीभावच असतो. त्यातूनच अनेक खेळ जन्माला आले आणि निकराच्या स्पर्धेमुळे ते विलक्षण मजेशीरही बनले. स्पर्धेमध्ये लोकांना प्रेरित करण्याचं अतिशय प्रभावी आधारतत्त्व असतं. बऱ्याचदा लोक गरज म्हणून नव्हे, तर आवड म्हणून स्पर्धेत उतरतात आणि अनेक विलक्षण गोष्टी करून दाखवतात. ज्या एरव्ही त्यांच्याकडून कधीच घडल्या नसत्या.
खेळणी तयार करणाऱ्या एका कारखान्याचं उत्पादन बरंच घटलं होतं. मालकाने कामगारांना प्रेमाने सांगून बघितलं, त्यांच्यामागे तगादा लावून बघितलं. त्यांना उत्पादन वाढलं नाही तर होणाऱ्या भयंकर परिणामांची कल्पना देऊन पाहिलं. अगदी नोकरीवरून काढून टाकण्यापर्यंत सुनावलं. पण या साऱ्याचा काहीच परिणाम झाला नाही.
एके दिवशी कारखाना बंद होताना त्याने कोणी किती खेळणी बनवली याची माहिती घेतली. अन् ज्याने सर्वात जास्त खेळणी बनवली होती, त्याचं नाव व बनवलेल्या खेळण्यांची संख्या फळ्यावर लिहून पुढे अभिनंदन असं लिहिलं. दुसऱ्या दिवशी सारे कामावर परत आले, तेव्हा त्यांनी फळ्यावर लिहिलेला मजकूर वाचला. हे मालकांनी लिहिलं आहे, ते त्यांना कळलं. तसं ते म्हणाले, मालकांना हा चांगला वाटतो काय! मग आता आम्ही किती खेळणी तयार करू शकतो, ते मालकांना दाखवतो. बघताबघता लोक उत्साहाने कामाला लागले. वेग वाढला. प्रत्येक जण इतरांपेक्षा अधिक खेळणी बनवण्याच्या मागे लागला. फळ्यावरील नावं व खेळण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. परिणामी, जो कारखाना उत्पादनात मागे पडला होता, तो काही काळातच इतर कारखान्यांच्या पुढे निघून गेला.
स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं असेल, स्वतःच्या क्षमता तपासायच्या असतील, तर स्पर्धेत उतरायलाच हवं. भले स्पर्धेत अपयश येईलही, पण ही स्पर्धाच आपल्यातील उणेपणा जाणवून देते. चुका लक्षात आणून देते. तसेच त्या दूर करून पुढच्या वेळेला अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणासुद्धा देते.
जिथे स्पर्धात्मक वातावरण नसतं, तिथे लोक फार काही नवं घडवू शकत नाहीत वा काही विलक्षण करूही शकत नाहीत. काही लोक पराभवाच्या भीतीने अथवा आपण मागे पडू या जाणिवेने स्पर्धेत उतरतच नाहीत. खरं ते आपल्या मर्यादा उघड्या पडतील, या भीतीपोटी आपल्या क्षमता वाढवण्याची मिळवलेली संधीच गमावत असतात. अशी माणसं कार्यशून्य होतात. बऱ्याचदा हे अति प्रमाणात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळेही होत असतं. माणसांतील सर्वोत्तमतेला बाहेर काढण्यासाठी स्पर्धात्मक भावना उत्तेजित करणं उपयुक्त असलं, तरी ही स्पर्धात्मक भावना फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडली, तर ती आक्रमकतेचं रूप धारण करते. इतर कोणी आपल्यापुढे जाऊच नये, यासाठी मग अनेक चुकीचे मार्ग निवडले जातात. प्रसंगी एकमेकांच्या पाठीत सुरेही खुपसले जातात. हा अतिरेक अत्यंत बाधक ठरतो.
कार्यक्षमता वाढीसाठी, सर्वोत्तम ते निर्माणासाठी स्पर्धा ही निरोगी आणि निकोप असायला हवी. प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे असं नाही. काही पराजयही खूप काही शिकवून जातात. घडवून जातात तसेच बरंच काही नवे देऊनही जातात. स्पर्धा म्हणजे आपण जिंकलो की इतरांना कमी लेखण्याची संधी अथवा आपण हरलो म्हणून स्वतःला कमी मानण्याची वेळ नव्हे; तर स्पर्धा ही स्वतःला परिपूर्ण करण्याची, स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याची गोष्ट आहे. स्पर्धा खिलाडूवृत्ती शिकवते. ही खिलाडूवृत्तीच तुम्हाला सर्वोत्तम यशाकडे घेऊन जाते.