Helen Keller story | हेलेन केलर । आव्हानं( Challenges) - प्रा.नितीन बानुगडे पाटील

 यशाचा पासवर्ड (भाग :104) -आव्हानं( Challenges)

आव्हानांना पाठ दाखवणाऱ्या माणसांकडे यशही पाठ फिरवतं..!

आव्हानं हीच कार्य करण्याची प्रेरणा देतात. जिथे आव्हानंच नसतात, अशा ठिकाणची माणसं कार्यशून्य ठरतात. ज्या लोकांकडून कुणाच्याच काही अपेक्षा नसतात, अशी माणसं कृतिशून्य बनतात. कर्तृत्ववान माणसाला आव्हानांचं नेहमीच आकर्षण असतं. अशी माणसं आव्हानांना भिडतात, स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देऊन समर्थ आणि सामर्थ्यवंत बनत जातात. गरज आणि संघर्ष या गोष्टीच माणसांना कार्य करण्यासाठी प्रेरक ठरत असतात.


Helen Keller story | हेलेन केलर । आव्हानं( Challenges) - प्रा.नितीन बानुगडे पाटील


काहीच ऐकू अन् पाहू न शकणाऱ्या 'हेलेन केलर' यांची त्या निःशब्द आणि अंधाऱ्या जगातून बाहेर येणं, ही गरज बनली होती. पण त्याहीपेक्षा असं ऐकू-पाहू न शकणारं जीवन जगणं, हेच त्यांच्यासाठी आव्हान बनलं होतं. पण हे आव्हान हेलन केलर यांनी पेललं. अपंगत्वामुळे कुणाशी कसलाही संवाद साधू न शकणाऱ्या हेलन केलरनी त्या अंधाऱ्या गुहेतून बाहेर येण्यासाठी संघर्ष सुरू केला आणि अचानक एके दिवशी तिला पाण्याच्या नळापाशी संवादाची भाषा गवसली. ती ॲन सलिव्हन या आपल्या शिक्षिकेशी संवाद साधण्यात यशस्वी झाली. हेलन बोलू शकत नसली, तरी तिला संवेदना होत्या. तिने त्या संवेदनाचा वापर संवादासाठी केला तिने नळातून खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या स्पर्शाच्या संवेदनेला दुसऱ्या तळहातावर तिची शिक्षिका 'अॅन' बोटाने जे लिहीत होत्या त्याच्याशी जोडलं. W.A..T.E..R.. पाणी…ऽऽ अन् हेलन त्या स्पर्शाच्या संवादामुळे विलक्षण आनंदाने हरखून गेली. मग सुरू झाला प्रवास… नवा..स्पर्श अन् नवे नवे शब्द. एका हातातून दुसऱ्या हाताकडे जणू निर्मितीच्या ठिणग्या उडत गेल्या. आणि एक नवी संवादाची लिपी जन्माला आली.

याच हेलन केलर आपल्या अपंगत्वावर मात करून पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या 'नायिका' झाल्या. कर्तृत्वशालिनी ठरल्या. अपंग व्यक्तींसाठी त्यांनी अनेक नवे मार्ग खुले करून दिले. शारीरिक व्यंग असलेली, मनाने भंग झालेली माणसं हेलन केलरनी आपल्या निर्मितीच्या आनंदाने अभंग करून टाकली. हेलन केलर सांगतात, 'अपंगत्व तुम्हाला कार्यशून्य करू शकत नाही. परिस्थिती बिकटच असायला हवी. तीच तुम्हाला घडवते. गोष्टी सोप्या, हलक्या असूच नयेत. त्या सोप्या नि हलक्या असल्यावरच आपली वाढ खुंटवतात. आपल्याला अपंग बनवून टाकतात!'

सरळ, सोप्या मार्गाने कुणीही चालतात. पण जो मार्ग अरुंद, अडथळ्यांचा आणि खडतर असतो, अशा मार्गावरून जे चालतात तेच 'यशस्वी' होतात. आव्हानांत एक आकर्षण असतं. जे लोक आव्हानांकडे आकर्षित होतात, तेच इतिहास घडवतात. आव्हानांना पाठ दाखवणाऱ्या माणसांकडे यशही पाठ फिरवतं. आव्हानं 'जिवंतपणा' देतात. कृतिशील ठेवतात. आव्हानंच धाडसी बनवतात. सकारात्मक करतात. उद्दिष्ट अथवा ध्येय असं निवडावं ज्यात आव्हान आहे. आव्हानात्मक ध्येयच विजयाचा आनंद देतं. कर्तृत्वाची उंची वाढवतं.

हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्बस्फोट झाल्यावर बेचिराख झालेला 'जपान' त्या आव्हानाने पेटून उठला. विलक्षण कामाला लागला. तिथला प्रत्येक माणूस चिवटपणे नि जिद्दीने झपाटला आणि अवघ्या काही काळात 'जपान' पुन्हा 'समृद्ध' होऊन जगाच्या पटलावर विराजमान झाला.

मोठं होण्यासाठी आधी आपल्या उणिवांचा स्वीकार करण्याचा मनाचा मोठेपणा असावा लागतो. या उणिवा कळल्या, स्वीकारल्या, की त्याच मग आव्हानांचं रूप होतात. तसंच या उणिवा दूर करण्याची आव्हा स्वीकारली, की मग त्याच यश देतात. ज्यांच्याकडे सारं उत्तम, सर्वोत्तम आहे त्यांच्या हातून फारसं काही घडूच शकत नाही. मात्र ज्यांच्या पुढची परिस्थिती भयाण, खडतर आहे, ते लोक मात्र फार काही घडवू शकतात.

यश नेहमी आव्हानांच्या घरी मुक्कामाला असतं. तुम्ही आव्हानं स्वीकारा… यश तुम्हाला स्वीकारेल !


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने