प्रतापगडावरील पराक्रम | Yashacha Password (Part 103) - परिणाम (consequence)

 यशाचा पासवर्ड (भाग :103) -परिणाम (consequence)

परिणामांचा अभ्यास करुन आक्रमकतेला
चातुर्याने सामोरं जाणं म्हणजे यश जिंकणं..!

परिणामांचा विचार न करता केलेली कृती ही नेहमी विनाशास कारणीभूत ठरते. तर परिणामांचा विचार करून केलेली कृती ही चिरकाल टिकणारं यश देते. यशाकडे नेणाऱ्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच, लक्ष शेवटच्या पायरीकडे हवं. वरून रोरावत येणारी संकटं आपला कडेलोट करण्यापूर्वी त्या संकटाच्या प्रतिकाराची सज्जता करून ठेवणारी माणसंच त्या संकटाचा पराभव करून पुढे जातात. जे फक्त आजचा विचार करतात, ते यशस्वी होत नाहीत. जे उद्यावर नजर ठेवतात तेच विजयी ठरतात. भविष्याचा वेध घेणारी शक्ती आणि व्यापक दूरदृष्टी ही यशस्वी माणसाची बलस्थानं असतात.

तहान लागल्यावर विहीर काढणारी अथवा संकटं आल्यावर आयत्या वेळी धावाधाव करणारी माणसं कायम अयशस्वी ठरतात. तर कृतीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच सारी नियोजनबद्ध आखणी करून सावधपणे पुढे जाणारी माणसं यशस्वी ठरतात. भविष्यकाळावर चाल करून जाताना बऱ्याचदा भूतकाळही उपयोगी पडतो. पाठीमागे घडून गेलेल्या अनेक घटना पुढच्या तशाच घडू पाहाणाऱ्या घटनांसाठी मार्गदर्शक ठरतात. निखळ भविष्यकाळावर नजर ठेवून चालत नाही. तर भूतकाळाच्या अनुभवाची समृद्ध शिदोरीही पाठीशी ठेवावी लागते. जेणेकरून पाठीमागे झालेल्या चुका कळाव्यात व त्या आता टाळता याव्यात. नवीन कृती, रणनीतीचं शस्त्र आणि शास्त्र तयार करता यावं, यासाठी भूतकाळ जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

अफझलखान बलाढ्य सामर्थ्यानिशी चालून येतो आहे, हे कळल्याबरोबर शिवरायांनी सज्जता चालू केली. पण खानाच्या बलाढ्य फौजेशी आपल्या तोकड्या फौजेनिशी उघड्या मैदानात लढणं म्हणजे आत्मघात करून घेणं, या घडणाऱ्या परिणामांची पुरती जाणही महाराजांनी ठेवली. म्हणूनच खानाच्या फौजेला न भिडता त्याच्याशी एकट्याने भेटण्याचा प्रस्ताव महाराजांनी ठेवला. 

प्रतापगडावरील पराक्रम


पण खानाशी भेटण्यापूर्वी महाराजांनी त्याचा भूतकाळ अभ्यासला. यापूर्वी कर्नाटकात अफझलखानाने कस्तुरीरंगा या राजास विश्वासाने भेटण्यास बोलावलं होतं आणि मोठ्या विश्वासाने भेटण्यास आलेल्या या कस्तुरीरंगाला खानाने त्या भेटीतच संपवलं. खानाच्या या दगाबाज आणि घातकी भूतकाळाचा अभ्यास करूनच राजांनी प्रतिकाराची तयारी आधी केली. नियोजनानुसार प्रत्येक कृती करून, काय घडू शकतं, हे आधीच जाणल्यामुळे राजांनी कुठलीच कसूर न ठेवता अचूक हालचाल केली आणि खान संपवला.

परिणामांची जाणीव झाल्यावर तुम्ही काय कृती करता, यापेक्षा तुम्ही कुठली कृती करत नाही, यावर तुमचं यश अवलंबून असतं. अफझलखान आपल्याला मारायलाच आला आहे, हे कळल्याबरोबर उसळून त्याच्यावर चालून जाणं नैसर्गिक होतं. पण शिवरायांनी हे टाळलं. याउलट, त्यांनी शरणागतीची भाषा सुरू केली. त्या शरणागतीच्या प्रस्तावातच खान फसला.

रोरावत येणारी संकटं बलाढ्य असतील, त्यांच्यापुढे तुम्ही दुबळे ठरत असाल, तर वृथा गौरवासाठी त्यांच्याशी झुंजायला जाऊ नका, किंवा पराभूत मानसिकतेने पळूनही जाऊ नका. बऱ्याचदा लढण्यापेक्षा शरण जाणं श्रेयस्कर असतं. पळून जाण्यापेक्षा शरण जाणं फायद्याचं ठरतं. आज पळून गेलात, तर संकट तुम्हाला उद्या गाठणारच. त्यापेक्षा शरण गेलात तर शत्रू ढिला पडेल. तुमच्याविरुद्धची त्याची आक्रमकता गळून पडेल. आणि तुम्हाला तुमची उणीव भरून काढण्याकरता अवधी अन् उसंत मिळेल. परिणामी, योग्य संधी मिळताच ढिल्या पडलेल्या शत्रूला पराभूत करणं सहजशक्य होईल. शरण जाणं म्हणजे वरवर नमलेलं दाखवणं, पण आतून आक्रमणासाठी सज्ज असणं. फक्त संधीसाठी वेळ घेणं!

बऱ्याचदा संकटापेक्षा त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी केलेली कृतीच मोठं संकट निर्माण करते. परिणामांचा अभ्यास करून आक्रमकतेला चातुर्याने सामोरं जाणं ज्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं.प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने