यशाचा पासवर्ड (भाग :102) -किर्ती (Glory)
तुमचे यश तुम्हाला 'किर्ती' मिळवून देते अन् नंतर तुमची किर्तीच तुम्हाला यश आणून देते..!
एक गृहस्थ पळत येऊन एकाला तावातावाने म्हणाला, 'बघा भाऊ, तरी मी तुम्हाला सांगत होतो. तुमच्या मुलाला सांगा, पेट्रोल पंपावर बसून सिगारेट ओढत जाऊ नकोस म्हणून… पण माझं ऐकलं नाही !' तसे भाऊ म्हणाले, 'अरे, पण झालं काय?' तो गृहस्थ म्हणाला, 'काय म्हणजे? मी म्हणत होतो तसंच झालं. लागली ना आग!' हे एकताच भाऊ म्हणाले, 'अरे, मग भल्या माणसा, हे अग्निशमन दलाला तातडीने कळवायचं सोडून तू इकडे धावत पळत कशाला आलास?" तसा तो गृहस्थ शांतपणे म्हणाला, 'मी म्हणत होतो तेच खरं झालं, हे सांगायला!'
आपलीच पाठ आपणच थोपटून घेणारे आणि माझंच खरं म्हणणारे, असे अनेकजण अवतीभोवती भेटतात. त्यांना इतरांच्या नुकसानीची पर्वा नसते. याउलट, दुसऱ्या बाजूला असेही अनेक असतात, जे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याची धडपड करतात. समाजात वावरताना तुमचं बाह्यस्वरूप, तुमची कृती अथवा वर्तणूक हीच तुमच्या योग्य-अयोग्यतेचे निवाडा करणारे निकष असतात. यातून विश्वासार्हता निर्माण होत असते. ही विश्वासार्हताच 'कीर्ती' वाढवत जाते. तुमच्या कार्याने इतरांच्या मनात निर्माण झालेली तुमची प्रतिमा हीच तुमची कीर्ती किंवा अपकीर्ती घडवत राहाते.
तुमच्या कीर्तीनुसारच लोक तुमच्यावर विसंबून राहातात अथवा विश्वास टाकतात. कीर्तीच तुमचं सामर्थ्य नि समर्थपण ठरवते. तीच वैभव वाढवते. कीर्तीचं महत्त्व नि मोल अनन्यसाधारण असतं. कीर्ती मिळवण्यासाठी बरेच कष्ट नि काळ खर्ची घालावा लागतो. मात्र तुमची एखादी चुकीची कृती किंवा चुकीचा निर्णय तुमची कीर्ती धुळीस मिळवून तुम्हाला अपकीर्तीचा धनी बनवून टाकतो.
कीर्तिमान होण्यासाठी एक उद्दिष्ट ठरवा. त्या दिशेने विलक्षण कष्ट करा. तुमचा एखादा गुण इतका संवर्धित करा की, त्या एका गुणामुळे तुमच्या नावास विलक्षण महत्त्व प्राप्त होईल. अशा एखाद्या गुणांमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. अलौकिक होता. तुमचा तोच गुण तुमच्या क्रियाशीलतेची नि उपस्थितीची ललकारी देणारा ठरतो. या गुणांच्या कीर्तीनेच तुमच्याबद्दल एक वलय, आकर्षण तयार होतं. तोच तुमची कीर्ती वाढवत जातो.
एकदा कीर्ती स्थापन झाली की, फारशी शक्ती खर्च न करतादेखील प्रभाव आणि ताकद वाढीस लागते. तुमच्या या प्रभावामुळे लोकांमध्ये एक आदरयुक्त भय तयार होतं. जे तुम्हाला सहज विजय मिळवून देतं. तुमच्या कीर्तीच्या दिमाखानेच दिपून तुम्हाला त्रास देऊ पाहाणारे दबून जातात. कीर्ती तुमच्यासाठी संरक्षक ढालीचं काम करते. तुम्ही तिचं संरक्षण करू शकलात, तर तुमच्या कृतींचे तुम्ही समर्थपणे नियंत्रण आणि कार्यवाही करू शकता.
कीर्ती मिळवण्यापेक्षा तिचं जतन करणं कठीण असतं. कीर्तिवंत लोकांची अपकीर्ती करण्यासाठी चोहोबाजूंनी लोक सरसावत असतात. त्यासाठी सावध आणि सजगपणे पावलं टाकीत कीर्तीचा पाया मजबूत करत हळूहळू त्यावर इमले वाढवत न्यायला हवेत. हे करताना विरोधकांच्या निंदानालस्तीकडे साफ दुर्लक्ष करा. त्यांना उत्तर देणं म्हणजे तुमच्या कीर्तीवर तुमचा विश्वास नाही अथवा तुमच्या कीर्तीबद्दल तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याचं सिद्ध होतं. तुम्ही सिंह म्हणून स्थापित झालात, तर सिंहासारखेच वागलं पाहिजे. रस्त्यात लुडबुड करणाऱ्या उंदरांना खेळवत जरूर राहा: पण त्यांच्याशी उगाच लढायला जाऊ नका.
रत्नांसारखीच कीर्तीची चमक काही काळानंतर कमी होते. कीर्तीला गृहीत धरू नका. ती टिकवून ठेवायची तर प्राणपणाने तिचं रक्षण केलंच पाहिजे. तिच्यात सातत्याने भर टाकत राहिलं पाहिजे. कीर्ती कायम राहिली, तरच दबदबा नि दरारा कायम राहातो.
तुमचं यश तुम्हाला कीर्ती देईल अन् तुमची कीर्तीच तुम्हाला यश आणून देईल!