मिळवलेलं यश कस टिकवून धारायच ? by Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 100) विजय

यशाचा पासवर्ड (भाग :100) - विजय (Victory)

 विजय मिळवणं हे यश नव्हे तर मिळवलेलं यश टिकवून स्थिर राहता येणं हे खरं यश..!

दोन कोंबड्यांची एकदा झुंज लागली. त्यातील बलवान कोंबड्याने दुसऱ्याला जेरीस आणलं. बघता-बघता पराभूत केलं. त्याचा हा विजय पाहाताच आजूबाजूच्या कोंबड्या त्याच्याभोवती गोळा झाल्या. त्यांच्या त्या स्तुतीने कोंबडा आणखीनच मोहरला. वाटलं आपला हा विज साऱ्यांना कळावा. माहीत व्हावा, म्हणून तो उंच उडाला. एका उंच जागेवर बसून खालच्यांकडे पाहात गरजला, पाहा… मीच तो विजयी… कुणापाशीही माझ्याएवढी ताकद नाही. मला कुणी पराभूत करू शकत नाही! स्वतःबद्दलचं हे गौरवी बोलणं संपतं न संपतं तोच त्या कोंबड्याला वरच्यावर एका गरुडाने फटकारलं. ठार मारलं आणि पंज्यात घट्ट पकडून दूर नेलंही !

विजयाचा उन्माद डोक्यात गेला की अशी डोक्यावर आपटण्याची वेळ येतेच. विजय मिळेपर्यंत शक्तीचा वापर करा. मात्र विजय मिळाल्यानंतर त्यांचं प्रकटीकरण, दर्शन वा प्रदर्शन टाळायलाच हवं. नंतरचं शक्तिप्रदर्शन हे विजयाची हवा डोक्यात गेल्याचं चिन्ह असतं. विजयासाठी आक्रमक व्हायलाच हवं. मात्र विजयानंतर तितकंच नम्र राहायला हवं. विजयाच्या उन्मादात विजयानंतर अंगावर चालून येणाऱ्या संकटाकडे दुर्लक्ष होतं आणि आपलीच शिकार साधली जाते. याउलट, विजयानंतरच्या नम्र शांततेत पुढे काय घडणार आहे, घडतं आहे किंवा काय येऊ घातलं आहे, यावर नियंत्रण ठेवता येतं. ज्या योजनेचा वापर करून यश मिळवलं तीच योजना उत्तम, असं समजून आपण पुन्हा त्याच योजनेचा वापर करू पाहातो. पण पुढच्या परिस्थितीला ती मागची योजना चालेल का? याचा विचार न करता एकाच दिशेने मार्गक्रमण करत राहातो. तिथेच चुकतो आणि मिळवलेला विजय आपणावरच उलटवला जातो.

मिळवलेलं यश कस टिकवून धारायच ? by Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 100) विजय




यश टिकवायचं असेल तर, एकवेळ सुरुवात चुकीची झाली तरी चालते. • पण शेवट कुठे करायचा हे कळणं महत्त्वाचं असतं. एखाद लक्ष्य मिळवायचं ठरवलं आणि ते मिळवलं तर तिथेच थांबावं. पण आता आपल्याला कुणीच रोखू शकत नाही, हा फाजील आत्मविश्वास आणि विजयाचा उन्माद पुढे पुढे ढकलत राहातो आणि आपण जितक्यांना हरवू शकतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपण शत्रू निर्माण करत राहातो.

यश हे अपयशापेक्षा जास्त धोकादायक असतं. म्हणूनच विजय मिळवल्यावर त्या उन्मादात चार पावलं पुढे जाण्यापेक्षा दोन पावलं मागे येणं हिताचं असतं. या मागे येणाऱ्या दोन पावलांत आपल्या भावनांवर ताबा ठेवता येतो. विजय मिळवणं हे यश नव्हे, तर मिळवलेला विजय टिकवून स्थिर राहाता येणे हे खरं यश !

तुम्ही विजयी होत असता त्यावेळी साहजिकच बाकीचे पराभूत होत असतात. त्यांचा पराजय हाच विजयानंतरचा तुमचा सर्वात मोठा धोका असतो. पराजित लोकांना आपल्या न्यूनत्वाचा नि गौणत्वाचा मुकाबला करणं मुश्किलीचं असतं. आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ आहे, ही भावनाच त्यांना तुमचा मत्सर करायला भाग पाडते. पण मत्सर प्रकट करणं म्हणजे आपलं न्यूनत्व व गौणत्व मान्य केल्यासारखं होतं, म्हणून ही पराजित मनं मत्सर प्रकट न करता तुम्हाला पराभूत करण्यासाठी हल्ला करण्याची वेळ आणि सबळ कारण शोधत असतात. तुमच्या वाटेत अडथळे आणण्याचे मनसुबे आखतच असतात. ते आगाऊ कळणं कठीण! अशा हल्ल्यापासून बचाव करणं जिकिरीचं असतं. अशावेळी आपल्या विजयाने इतरांमध्ये मत्सर निर्माण होऊ न देणं, हाच विजयानंतरचे धोके टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग !

विजय मिळवल्यावर तुम्ही स्वतःला इतरांपासहून वेगळे न मानता, त्यांना कमी लेखत स्वत: उंचीवर जाऊन बसून नका. यश मिळवूनही पायाखालची जमीन सोडू नका. तुम्ही त्यांच्यातलेच आहात, असं दाखवत त्यांच्यातच राहा. त्यांच्यासमोर नम्र व्हा. तुमचा विजय त्यांनाच समर्पित करा. लक्ष असू द्या, उन्मादाने शत्रू निर्माण होतात आणि विनम्रतेने मित्र जोडता येत आणि यशाला उन्मादापेक्षा विनम्रतेची मैत्रीच प्रिय असते.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने