यश वादाने नव्हे कामाने मिळतं | Yashacha Password (Part 101) वादविवाद (Debate) | Nitin Banugade Patil

यशाचा पासवर्ड (भाग :101) -वादविवाद (Debate)

 वितंडवादी शब्दांच्या हवेतील बुडबुड्यांपेक्षा कृतीची ताकद फार मोठी असते..!

एका नवरा-बायकोचा वाद एकदा भलताच पेटला. नवरा म्हणे, माझ्या मुलाला इंजिनीयर करायचं, तर बायको म्हणे, इंजिनीयर नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं! वाद चांगलाच वाढला. कुणीच माघार घेईना. आवाज वाढला. त्या आवाजाने शेजारी-पाजारी जमा झाले. त्यांनी त्या वादात उडी घेतली. बघता बघता गर्दी वाढली. दाटी झाली. घरातून माणसं दारात आली. दारातून रस्त्यावर जमा झाली. थोड्याच वेळात रस्ता जाम झाला. माणसं थबकली. वाहनं अडली. वाहतुकीची कोंडी बघून कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस आले. कारणाचा शोध घेतला. फौजदारांना विषय कळला. त्यांनी त्या नवरा-बायकोला विचारलं, नवरा तावातावाने म्हणाला, हिला काही कळत नाही. काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनीयरच करायचं! तशी बायको संतापून म्हणाली. ह्यांना काही समजत नाही. माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं !

अखेर फौजदार वैतागले. म्हणाले, 'तुम्ही दोघेही गप्प बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्यासमोर बोलवा. मला त्याला विचारू द्या. त्याला काय व्हायचंय ते!"

फौजदाराचे हे बोल ऐकताच बायको लाजून म्हणाली, 'अहो, तो अजून जन्माला यायचाय!'

खरं तर, बऱ्याच वादविवादांना सत्याचा पायाच नसतो. ज्या कृतीची वेळ अजून दृष्टीक्षेपातही नसते, अशा विषयांवर लोक वादविवाद घालत बसतात आणि आपला मौल्यवान वेळ, शक्ती आणि ऊर्जा खर्च करत राहातात!

वादविवादात मतांच्या खंडन-मंडनातून जरी आपण जिंकलो, तरी असा विजय हानीकारक असतो. इतर लोक वरवर आपलं म्हणणं मान्य केल्यासारखं दाखवत असले तरी ते त्यांना मान्य असतं असं नाही. कदाचित ते मनातल्या मनात चरफडत बंडाचा विचारही करतील किंवा वादविवादातल्या तुमच्या एखाद्या निष्काळजीपणे केलेल्या शब्दप्रयोगातून त्याचा मानभंग अथवा अपम नही घडल्यामुळे ते तुमच्या सरळसरळ विरोधात जातील. वादविवाद मतांच्या पुरस्कारापेक्षा तिरस्काराच्या भावनाच जास्त निर्माण करतो.



वादविवादातून निष्पन्न काहीच होत नाही. त्यातील अगदी सर्वोत्तम मुद्यांना ठोस पाया नसतोच. वादविवादाच्या तापल्या तव्यावर प्रत्येकजण लाह्यासारखा तडतडत असतो. स्वतःच्या मतांचा पाठपुरावा करण्यासाठी उंचच उंच उड्या मारत असतो. वादविवादात आपण आपल्या मतांच्या प्रतिपादनासाठी कितीही दाखले दिले. वचने उदधृत केली, तरी त्याने कोणाचंही मतपरिवर्तन होईलच असं नाही. वितंडवादी शब्दांच्या हवेतील बुडबुड्यापेक्षा कृतीची ताकद फार मोठी असते. कृती डोळ्यासमोर घडते. ती आपण पाहू शकतो. अनुभवू शकतो. तिथे स्पष्टीकरणाची गरज नसते. कृतीच्या पुराव्याने सिद्ध झालेल्या गोष्टींवर वाद निर्माण होण्याचा आणि विवाद घडण्याचा प्रश्नच येत नाही. कृतीतून फक्त सत्य नजरेस पडतं. वादविवादात मात्र सत्य क्वचित पाहिलं जातं आणि फारच क्वचित ऐकलं जातं.

यशस्वी माणसं वादविवादात कधी पडत नाहीत. ती शांतपणे आपली कृती करत राहातात. वादविवादात खर्ची पडणारी ऊर्जा ते कृतीच्या यशस्वीतेसाठी वापरत आणखी पुढे जात राहातात. त्यांना माहिती असतं, आपली कल्पना आणि संकल्पना बिनचूक असेल, तर त्याचं थेट कृतीत रूंपातर करावं. त्यासाठी कुणाशी वितंडवाद घालण्याचं कारण नाही.

ध्येयाच्या दिशेने चालणाऱ्याच्या वाटेत वादविवाद हे अडथळ्याचं काम करत चालणाऱ्याला तिथेच थांबवून गुंतवून ठेवतात. सबब त्याचं ध्येय दूरच राहातं. ही त्याला अडकवून ठेवण्याचीच युक्ती असू शकते. धूर्त आणि धोरणी माणसं एखादी विलक्षण कृती करतात आणि इतरांना वादविवादात गुंतवून ठेवत आपली पुढची योजना बिनघोरपणे कार्यान्वित करून पुढे निघून जातात. इतर लोक त्याच्याशी सहमत आहेत का? याला ते फारसं महत्त्व देत नाहीत. पुढच्या काळात आपल्या कृतीचा अर्थ बाकीच्यांना आपोआप उमगेल आणि आपण बरोबरच होतो, हे त्यांना समजेल, अशी ठाम भूमिका घेऊन ते चालत राहातात. वादविवादात अडकूच नका. कृती करत चालत राहा.

यश वादाने नव्हे कामाने मिळतं.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने