जेव्हा यशाची, ध्येयपूर्तीची गरज वाटेल, तेव्हा तू यशस्वी होशील | Yashacha Password (Part 99)- लक्ष्यभेद (Targeting) | Nitin Banugade Patil

 यशाचा पासवर्ड (भाग :99) -लक्ष्यभेद (Targeting)

मन आणि बाण यांची एकतानता साधली तरच लक्ष्याचा ठाव घेता येतो..!

आपल्या गुरूंकडे जाऊन एक शिष्य म्हणाला, गुरुजी मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. पण माझं ध्येय गाठण्यात मात्र मला वारंवार अपयश येत आहे. गुरुजींनी त्याच्या कामाचं काम करण्याच्या पद्धतीचं निरीक्षण केलं. अन् म्हणाले, चल, माझ्यासोबत एकदा समोरच्या नदीत स्नान करून घे. म्हणजे मी तुला यशासाठी काय करावं लागेल ते सांगतो.

गुरुजी शिष्याला घेऊन नदीत गेले. कमरेभर पाण्यात आत खोल उतरले. गुरुजी शिष्याला म्हणाले, आता तुझं पूर्ण डोकं पाण्यात बुडव. शिष्या डोकं पाण्यात बुडवलं. तसं गुरुजींनी त्याच्या डोक्यावर हाताने दाब देऊन ते पाण्यातच दाबून धरलं. शिष्य धडपडू लागला. हात-पाय हलवू लागला. पण गुरुजींची पकड घट्ट होती. शिष्य आत तडफडू लागला. बाहेर येण्याची जीवघेणी मेहनत करू लागला. अखेर एका क्षणी गुरुजींनी आपला हात मागे घेतला, तसा शिष्य पाण्यातून उसळी मारून बाहेर आला. नाकातोंडात पाणी गेलेला शिष्य भरभरून श्वास घेऊ लागला. आपल्या गुरुजींनी असं का केलं, हे न कळलेला शिष्य काही विचारणार, तोच गुरुजी म्हणाले, तू पाण्यात होतास. बाहेर येता येत नव्हतं. त्यासाठी धडपडत-तडफडत होतास कसंही करून बाहेर येण्याची कोशिश करत होतास, तेव्हा तुला सगळ्यात जास्त कशाची गरज वाटत होती ?

जेव्हा यशाची, ध्येयपूर्तीची गरज वाटेल, तेव्हा तू यशस्वी होशील | Yashacha Password (Part 99)- लक्ष्यभेद (Targeting) | Nitin Banugade Patil

शिष्य म्हणाला, हवेची? तसे गुरुजी म्हणाले, 'पाण्यात असताना ज्या तीव्रतेने तुला हवेची गरज वाटत होती ना, त्याच तीव्रतेने तुला जेव्हा यशाची, ध्येयपूर्तीची गरज वाटेल, तेव्हा तू यशस्वी होशील. पाण्यात हवेसाठी जसा तू धडपडत नि तडफडत होतास तसाच तू तुझ्या ध्येयपूर्तीसाठी धडपडशील ना, तेव्हा तुला यश लाभेल. 

आपल्या शक्तीचं संवर्धन करत आपल्या प्रेरणेच्या आणि ऊर्जेच्या बलस्थानाशी पूर्ण एकाग्रता साधणे ज्यांना जमतं, त्यालाच यश गाठता येतं. आजूबाजूची परिस्थिती एकाग्रता साधू देत नाही. एकाच एका लक्ष्याकडे आपलं चित्त वेधलं जाण्यापूर्वीच त्यांना इतर हजारो व्यवधानाचे फाटे फुटतात. आजूबाजूच्या या किरकोळ नि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाच्या दिशेनेच कार्यरत राहाणं महत्त्वाचं. आपल्या बाहेरच्या जगाकडे जागा न शोधता आपल्या आतल्या आतच एकांत शोधणं, स्वतःच्या निश्चलतेचा शोध घेणं आणि स्वतःच्या विचार आणि कृतीची संपूर्ण एकाग्रता साधणं, हेच यशाचं रहस्य! स्वतःची ताकद आणि ऊर्जा एकवटलेली ठेवून अगदी टोकाच्या एकाग्रतेने कृती करणं, हेच यशाचं तत्त्व आहे.

दरवेळी रणांगणावर बाजी मारणाऱ्या नेपोलियनने कायम शत्रूच्या दुबळ्या जागी सर्व ताकदीनिशी एकाग्र लढत दिली. जबर इच्छाशक्ती आणि कुशाग्र धारणेचं मन याच्या जोरावर त्याने कायमच मुसंडी मारली. तो सांगतो, 'एका उद्दिष्टाची मानसिकता, लक्ष्यावर संपूर्ण एकाग्रता आणि गोंधळलेल्या, भांबावलेल्या लोकांवर तुमच्या एकवटलेल्या शक्तीचा प्रयोग, ही गोष्ट तुम्हाला विजय मिळवून देतेच!'

साहाय्य घेतानाही ते अनेकांचं घेत नुसतं पसरत राहू नका, मदत घेतानाही ती निवडक शक्तिकेंद्राचीच घ्या. नुसतं पसरत राहाण्याने बल आणि शक्ती खर्च होते. याउलट, एकाच शक्तिकेंद्राच्या उगमाशी घट्ट राहिल्याने कष्टांची बचत होतेच, पण शक्ती प्रचंड मिळते. एक ना धड भाराभर चिंध्या अशाने उपयोग काहीच नाही. सगळीकडेच उड्या मारत बसू नका. एकाच ठिकाणी घट्ट राहा. तिथेच आत खोल खोल जा. ही सखोलता यश देते. प्रत्येक ठिकाणी वर वर उकरून सोनं सापडणार नाही. ठरवून एकाच ठिकाणी खोल जा. जितक्या एकाग्रतेने आत-आत जाल तितकं यश गाठाल.

आपल्या शक्तीची नासाडी होणं किंवा ती वाया जाणं यापासून सजग राहा. ती शक्ती एकवटून एकाच ठिकाणी अचूकतेने खर्च करा. एकच बाण एकावेळी दोन लक्ष्यांचा वेध घेऊ शकत नाही. मन आणि बाण यांची एकतानता साधली, तरच लक्ष्याचा नेमका ठाव घेता येतो.तो ठावच यश देतो !


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने