Story of Flying Horse | Yashacha Password (Part 98) - संयतपणा | Nitin Banugade Patil Motivation

 यशाचा पासवर्ड (भाग :98) -संयतपणा

प्रत्येक प्रश्नाला लगेच भिडणं हे सर्वोत्तम उत्तर असू शकत नाही. 
तर बऱ्याच प्रश्नांना थोडा वेळ जाऊ देणं हे सर्वोत्तम उत्तर असतं..!

एका राजाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. ती शिक्षा ऐकून एकजण अत्यंत हताश, निराश झाला. दुसरा मात्र निर्विकार होता. राजाला त्याचं आश्चर्य वाटलं. फाशीची शिक्षा देऊनही याच्यावर काहीच कसा परिणाम नाही ? राजाने त्याला विचारलं, फाशीची शिक्षा सुनावली तरी तुझ्यावर फरक नाही. तुला भय नाही ? तसा तो निर्विकार कैदी म्हणाला, माझ्यासाठी या क्षणी फाशीचा विषय महत्त्वाचा नाही. मला काळजी आहे, उडणारा घोडा तयार करण्याच्या माझ्या प्रयोगाची!

तसा राजा चमकला… उडणारा घोडा ? होय महाराज, असं सांगत तो कैदी म्हणाला, माझा हा प्रयोग अंतिम टप्प्यात आलाय. एवढंच काय पण महाराज, मी आपल्याही घोड्याला एका वर्षात उडायला शिकवू शकतो. तसा राजा अविश्वासाने म्हणाला, तसं झालं नाही तर ? कैदी म्हणाला, महाराज, आपण मला फाशीची शिक्षा सुनावलीच आहे. पण मी जर हे करून दाखवलं, तर माझी फाशीची शिक्षा आपण रद्द केली पाहिजे!

राजाने यावर लगेच तयारी दर्शवली. मात्र दुसऱ्या कैद्याने या कैद्याकडे आश्चर्यमिश्रित अविश्वासाने पाहात विचारलं, तुला माहीत आहे, घोडे कधीच उड्डू शकत नाहीत. ते शक्यच होणार नाही. मग ही कल्पना तू मांडलीस कशी ? यामुळे आजचं मरण तू उद्यावर ढकलतो आहेस, एवढंच ?

Story of Flying Horse | Yashacha Password (Part 98) - संयतपणा | Nitin Banugade Patil Motivation


पहिला कैदी म्हणाला, खरं तर मी माझ्या सुटकेसाठी चार शक्यता निर्माण करतोय. पहिली म्हणजे, या वर्षात राजाचाच मृत्यू होऊ शकतो. दुसरी शक्यता म्हणजे, मलाच नैसर्गिक मृत्यू येऊ शकतो. तिसरी शक्यता, राजाचा तो घोडाच मरू शकतो आणि चौथी शक्यता, मी घोड्याला उडायला शिकवू शकतो!

प्रत्येक प्रश्नाला लगेच भिडणं, हे सर्वोत्तम उत्तर असू शकत नाही. तर बऱ्याच प्रश्नांना थोडा काळ जाऊ देणं, हे सर्वोत्तम उत्तर असतं. क्षणात उत्तर देणं, लगेच प्रतिक्रिया व्यक्त करणं किंवा ताबडतोब प्रतिहल्ला करणं, ही बाब तुम्ही त्या समस्येला फार गंभीरपणे घेतलं आहे किंवा महत्त्व दिलं आहे, हे सिद्ध करते. एखादी गोष्ट तुम्ही जिवाला लावून घेतली आहे, हे समस्येला कळलं की, मग समस्या तुमच्यावर स्वार होते. समस्येचे हेतूच तुम्ही आत अडकावे, असे असतात. त्यामुळे समस्येचं काम होतं; तुमचं नाही! लगेच क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही तिची दखलच घेतली नाही, हे कळू द्या. त्यासाठी तुम्ही दुसरीकडे व्यग्र असल्याचं दिसू द्या. समस्येला गडबडीत सामोरं गेलात, तर बिनचूक निर्णय घेता येत नाहीत. योग्य निर्णय शांतपणेच घेता येतात. संतापात उपलब्ध पर्याय दुर्लक्षिले जातात. यशस्वी व्हायचं असेल, तर विविध पर्याय उपलब्ध असावे लागतात. ते शांतपणे काही काळ जाऊ दिल्यावरच हाती येतात.

एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून त्या अपयशाची कारणं न शोधता, चुका दुरुस्त न करता नुसते धडका मारत राहाणं यामुळे यश मिळत नाही. याउलट थोडं थांबून, चुका शोधून, त्या दुरुस्त करून पुढे जाणं तुम्हाला यशाकडे नेतं. चार पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं. दोन पावलं मागे येण्याने पुढचे बेसावध होतात. दरम्यान, आणखी ताकदीचे पर्याय गवसतात. जे समोरच्या समस्येला दुबळं ठरवून तुम्हाला विजयाच्या दिशेने चार पावलं पुढे नेतात.

वाटेत चालताना छोट्या छोट्या समस्यांचे खडे येतात. ते टोचतातच. त्या खड्यांना फार महत्त्व देऊन वाट बदलू नका व सोडू नका. थोडं थांबा…नम्र झाल्यासारखे थोडे वाका. खडे उचलून बाजूला फेका नि चालत राहा. चालता चालता दगड आडवा येईल. त्याला तुमच्यापेक्षा मोठा करून वाट सोडू नका. सरळ त्याच्यावर उभे राहा. स्वत:ची उंची वाढवून घ्या नि पुढे चला. पुढे प्रचंड मोठा पर्वत आडवा येईल. त्याला भिडू नका. वाट सोडू नका. थोडे थांबा. शांतपणे विचार करा. पर्याय जाणा नि त्याला टकरा देण्यापेक्षा त्याला वळस घालून पुढे निघून जा. पुढे यश उभंच आहे!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने