यशाचा पासवर्ड (भाग :97) -प्रतिक्षा (Wait)
गोड फळ हवे असेल तर ते पक्व होण्याची वाट पहावीच लागते..!
गौतम बुद्धाकडे एक शिष्य शिकण्यासाठी आला. पण त्याला शिकण्याची फार घाई होती. तो गौतम बुद्धांना म्हणाला, 'मला सारं ज्ञान मिळवण्यासाठी किती वेळ लागेल ?' गौतम बुद्ध म्हणाले, 'दहा वर्षं!' तसा तो शिष्य म्हणाला, 'मी वाटेल तेवढे कष्ट करीन. रात्रंदिवस अभ्यास करीन. मला लवकरात लवकर शिकायचे आहे. अगदी वेगात सारं ज्ञान मिळवायचं असेल तर मला किती वेळ लागेल ?' गौतम बुद्ध म्हणाले, 'वीस वर्ष!'
हे ऐकताच शिष्य चमकला. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, 'बाळा, नुसतं वाढणं वेगळं नि रुजणं वेगळं! पक्कं रुजायचं असेल, तर त्याला त्याचा वेळ द्यावाच लागेल. सामर्थ्याची पायाभरणी करण्यासाठी वर्षानुवर्षांचा अवधी जावाच लागतो. मिळवलेली उंची टिकवायची असेल, तर आधी वेळ देऊन पाया भक्कम करावा लागतो. क्षणात आभाळात तर क्षणात जमिनीवर अशी अवस्था टाळायला हवी. हळुवार संयत, पण ठोसपणाने बांधत नेलेली इमारत दीर्घकाळ टिकते!"
प्रत्येक गोष्टीचा काळ असतो. तेवढा वेळ त्याला द्यावाच लागतो. घाई गडबडीने कोणतीच गोष्ट पूर्णांशाने सिद्धीस जात नाही. घाई-गडबडीत चुका होण्याचा संभव जास्त असतो. त्यातूनच आणखी नव्या समस्या उभ्या राहातात. ज्या सोडवण्यासाठी मग पुन्हा उदंड वेळ खर्च करावा लागतो. घाई करू नका. घाई करून तुम्ही तुमचा वेळेवर आणि स्वतःवरही ताबा नसल्याचं सिद्ध करत असता. प्रतीक्षा करा. गोड फळ हवं असेल तर ते पक्व होण्याची वाट पाहावीच लागते. थोडं थांबून, धिराने घेऊन वाटचाल केली की, हवं ते योग्य वेळेत मिळतंच!
यशाच्या प्रवासासाठी आपल्याला तीन टप्पे पाडता येतात. यातील पहिला टप्पा आहे प्रदीर्घ काळ अथवा वाट पाहाण्याचा काळ. आपणास जे हवं आहे त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची वाट पाहाणं. हा काळ फार संयमाचा असतो. अनुकूल वेळ आलेली नसताना शांत राहाणं फार महत्त्वाचं असतं. दुसरा टप्पा असतो कृतीचा काळ. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की लगेच कृतिशील होत आपणांस जे काही साधायचं आहे, त्यासाठी योग्य धोरण आखणं आणि त्याची अंमलबजावणी करत पूर्ण तयारी करून ठेवणं. तर तिसरा टप्पा असतो तो निर्णायक काळ. जो सरतेशेवटी येतो. ही वेळ असते, प्रचंड वेग आणि आपली पूर्ण क्षमता पणाला लावून आपली योजना कार्यान्वित करण्याची! आपण वाट पाहिली आहे. योग्य तयारी केली आहे. आता योग्य क्षण आला आहे. बस्सं, आता ही वेळ साधायची! ती साधली की यश येतंच. आणि ती चुकली अथवा चुकवली की अपयश!
बहिरी ससाणा तेच तर करतो. तो शांतपणे, संयम ठेवून आकाशात घिरट्या घालत असतो. पण आपल्या चाणाक्ष डोळ्यांनी खालचे सारे निरखित असतो. खालच्यांना मात्र आपल्याकडे कोणी पाहात आहे. काही योजना आखत आहे, याची कल्पनाही नसते. अचानक योग्य क्षण येतो आणि बहिरी ससाणा विजेच्या वेगाने सपकन खाली येतो. त्याचा वेग इतका जबरदस्त असतो की भक्ष्याला प्रतिकार करणे शक्यच होत नाही. त्याच्या भक्ष्याला काय घडतंय हे कळण्यापूर्वीच बहिरी ससाणा त्याला आपल्या पायांच्या तीक्ष्ण नख्यांच्या पकडीत पकडून फार उंचावर नेतो. ससाणा यशस्वी ठरतो.
काही सांगतात, वेळ सरत नाही. काही म्हणतात, वेळ पुरत नाही. अशा लोकांवर काळ हुकूमत गाजवत असतो. यश मिळवायचं असेल, तर काळाला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका. जे काळावर स्वार झाले आणि ज्यांनी वेळेला हवं तसं वळवलं, तेच यशस्वी झाले. वेळेचा योग्य वापर करता यायला हवा. सारं परत मिळवता येतं. मात्र गेलेली वेळ परत आणता येत नाही. प्रयत्न करत राहा. यश मिळणारच आहे. थोडी वाट पाहा. कारण अजून ती वेळ आलेली नाही. अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नका. आता अपयश आलं, याचाच अर्थ अजून ती वेळ गेलेली नाही.ती यश घेऊन येतेच आहे!