ते बोललो नसतो तर बरं झालं असतं ! | Yashacha Password (Part 95) मौन (Silence)

यशाचा पासवर्ड (भाग :95) - मौन (Silence)

कुठे नि काय बोलायचं याचं भान जितकं

आवश्यक, त्याहीपेक्षा कुठे बोलूच नये याचं ज्ञान अत्यावश्यक असतं..!


आपल्या विरोधात जाणाऱ्या प्रधानाला राजाने फाशीची शिक्षा सुनावली. प्रधानाच्या गळ्यात फासाचा दोर अडकवण्यात आला. फाशी देण्यासाठी त्याच्या पायाखालची लाकडी फळीही हटवण्यात आली. पण अचानक फाशीची दोरी मधेच तुटली आणि प्रधान धडपडत जमिनीवर कोसळला. तत्कालीन काळात अशाप्रकारे दोर तुटल्यास जीवदान मिळत असे. जमिनीवर पडलेला प्रधान आपलं अंग झाडत उभा राहिला आणि आजूबाजूच्या लोकांना म्हणाला, 'बघा, असलं आपलं राज्य. या राजाला एक दोर देखील धड नीट बनवता येत नाही!'

फासातून बचावलेल्या प्रधानाची बातमी घेऊन अधिकारी राजाकडे आला. संकेतानुसार प्रधानाला जीवदान देणं क्रमप्राप्त होतं. राजाने ते दिलंदेखील. पण राजाने त्या अधिकाऱ्याला विचारलं, 'हे सारं घडल्यानंतर प्रधान काही बोलला का ?"

अधिकारी म्हणाला, 'हो महाराज. प्रधान म्हणाले, या राजाला साधा एक मजबूत दोर देखील बनवता येत नाही!

तसा राजा म्हणाला, 'तसं असेल तर आम्ही मजबूत दोर बनवू शकतो, हे त्याला सिद्ध करून दाखवलंच पाहिजे!' आणि क्षणात प्रधानाच्या जीवदानाचा निर्णय नाकारत राजाने त्याला पुन्हा फासावर चढवण्याचे आदेश दिले.

प्रधानाला पुन्हा फासावर चढवण्यात आलं. यावेळी मात्र दोर तुटला नाही. फाशी दिल्यानंतर राजाने अधिकाऱ्याला विचारलं, 'फाशी जाताना प्रधान काही बोलला का ?' अधिकारी म्हणाला, 'होय महाराज. ते म्हणाले, मागच्या वेळी दोर तुटल्यानंतर मी जे बोललो, ते बोललो नसतो तर बरं झालं असतं !

बऱ्याचदा बोलण्यापेक्षा न बोलणं हितकारक असतं. कुठे नि काय बोलायचं याचं भान जितकं आवश्यक त्याहीपेक्षा कुठे बोलू नये, याचं ज्ञान अत्यावश्यक ठरतं. धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द एकदा बाहेर पडला, की परत घेता येत नाही. बोलताना फार काळजी घ्यावी लागते. नको असताना आणि नको ते नको तेवढं बोलत राहाणं घातक ठरतं. मन मोकळं व्हावं, विचारांच्या जडत्वापासून हलकं व्हावं किंवा मतांचं आदानप्रदान व्हावं, म्हणून संवाद घडणं महत्त्वाचं असतं. पण अकारण बोलत राहाणं हे व्यसन इतर घातक व्यसनांइतकंच त्रासदायक ठरतं.

आपल्या शरीराची ऊर्जा ही सर्वाधिक प्रमाणात खर्ची पडते ती पाहाणे आणि बोलणे या दोन मार्गानी! योग्य तेच पाहाणं आणि योग्य तेच बोलणं यातून इतर वेळी पाहाणं आणि बोलणं यांना विश्राम देऊन हा ऊर्जाक्षय थांबवता येतो.

सततचं बोलणं तुमचा स्वतःला सिद्ध करण्याचा आटापिटा दर्शवून तुम चा उथळ अहंपणा प्रकट करतं. तर कमी बोलणं तुमचं व्यक्तिमत्त्व सखोल विचारशीलतेचं असल्याचं सिद्ध करतं. कमी बोलण्यामुळे आपसूकच चुकीच्या बोलण्याचा धोका टाळता येतो, किंबहुना चुका आटोक्यात राहातात. सातत्याच्या बोलण्याने वाचाळता वाढीस लागते. त्यातील विचारांची अर्थगर्भता आणि वाणीचं सौंदर्य हरवतं. तर कमी बोलण्याने अथवा मौनामुळे मनाला अंतर्मुखता प्राप्त होते. सलगपणे चिंतन-मनन करता येतं. आपल्या जगण्या-वागण्याचं, विचारांचं-कृतीचं शांतपणे निरीक्षण परीक्षण करता येतं. चुका पाहता येतात. नव्या वाटा शोधता येतात. मनाला काही काळ तटस्थता, अलिप्तता, निर्लेपता प्राप्त होऊन निर्मळता मिळवता येते. ती मनाची शक्ती ऊर्जा वाढवणारी ठरते.

पैशाची काटकसर करणारा धनवान; तर मोजकं बोलून शब्दांची काटकसर करणारा ज्ञानवान ठरतो. खरा विद्वान मितभाषी असतो. तो शब्दांच्या चिंध्या उडवीत बसत नाही. त्या ऊर्जेचा वापर तो भव्य-दिव्य-उदात्त आणि मंगल निर्मिण्यासाठी करतो. जे नुसतेच बोलत राहातात, ते काही करत नाहीत आणि करणारे कधीच बोलत नाहीत. त्यांची कृती हेच त्यांचं बोलणं असतं.

यश गोंधळ-गदारोळात नव्हे, शांततेच मुक्कामाला राहातं.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने