यशाचा पासवर्ड (भाग :94) -प्रतिक्रिया (Response)
तुमचं यश तुमच्या क्रियेचीच प्रतिक्रिया असते..!
हेलन केलर यांची एक कविता आहे-एक जागृत मन दुसऱ्या मनाला जागवतं. दुसरं जागृत मन तिसऱ्या बांधवाचं दार ठोठावतं… जागे झालेले तिघे सारं गाव जागं करू शकतात नि सारं उलटंपालटं होऊ शकतं. जागी झालेली खूप माणसं एवढी उलथापालथ करतात की, अखेर उरलेले सारे जागे होतात!
मात्र तुम्ही झोपलेले असाल तर कदाचित सारेच झोपलेले असतील, अन् त्यामुळे भविष्यसुद्धा झोपलेलंच राहील. तुम्ही झोपलेले असताना जग जागं राहून बदल घडवेल आणि तुमचं भलं होईल, अशी अपेक्षा ठेवणं फोल ठरेल. जगाच्या कृतीवर तुमचं काही अवलंबून नसतं. तुमच्या कृतीवरच जगाची कृती ठरत असते. तुमच्या प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया उमटत असते. ती प्रतिक्रिया इतर कोणाच्या नव्हे, तर तुमच्या क्रियेवरच अवलंबून असते.
दरीच्या काठावर उभा राहून एक मुलगा आपल्या आईला हाक मारत होता. त्याची हाक सुटली, की दरीतून त्याच्या हाकेचा प्रतिध्वनी येई. त्याला मोठी गंमत वाटली. तो मग जोरजोराने हाका मारू लागला. बोलू लागला. तो जे बोलेल त्याचे तसेच प्रतिध्वनी येऊ लागले. त्याने आईला याबद्दल सांगितलं तेव्हा त्याची आई म्हणाली, 'बाळा, आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण जे बोलतो, तेच आपल्याला ऐकू येतं. आपण जसं इतरांशी वागतो, तेच वागणं आपल्या वाट्याला येतं. आपण जशी कृती करतो, तशीच प्रतिकृती आपल्याला सामोरी येते. आपलं आयुष्य म्हणजे आपल्याच कृतींचा आरसा असतो. आपलं आयुष्य आपलाच प्रतिध्वनी असतो.'
आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक विचार किंवा आपली प्रत्येक वर्तणूक आपल्याकडे परत येतच असते आणि परत येताना जशी गेली होती, त्याच अचूकतेने परत येते.
गरिबीमुळे उपाशीपोटी भटकत असलेला एक मुलगा एका स्त्रीच्या घरापुढे आला. त्या मुलाची मरणासन्न अवस्था पाहून ती स्त्री गहिवरली. तिने त्याला घरात नेलं. प्यायला दूध, खायला फळं दिली. पोटात अन्न जाताच त्या मुलाला उभारी आली. तो त्या स्त्रीने दाखवलेल्या ममतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तेथून निघाला.
वीस वर्षांनंतर एक वृद्ध स्त्री एका हॉस्पिटलमध्ये आणली गेली. तिच्या जवळ कुणी नव्हतं. उपचार होणं तर गरजेचं होतं. अचानक एका डॉक्टरचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्याने त्वरित तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. इलाज सुरू केले. ती स्त्री वाचली. जरा बरी झाल्यावर तिने आपल्याला वाचवणाऱ्या डॉक्टरचे भरल्या डोळ्यांनी आभार मानायला हात जोडले. तेव्हा तो डॉक्टर म्हणाला, 'वीस वर्षांपूर्वी मरणासन्न अवस्थेत मी तुमच्या घरापुढे आलो होतो. तेव्हा तुम्ही मला मदत केली नसती, तर आज मी डॉक्टरच काय पण जिवंतही नसतो!"
आयुष्यात आपण जे काही करतो, त्याची भरपाई होतच असते. आपली केलेली कुठलीही गोष्ट कधी वाया जात नाही. त्याची परतफेड होतच असते. आपल्या कष्टाचं झाड कधीही कृतघ्न नसतं. त्याला फळं येतातच. तुम्ही प्रामाणिकपणे दुसऱ्यासाठी चांगलं करत राहाता, त्यावेळी आपोआप आपल्या भल्याची पायाभरणी होतच राहाते. तुम्ही जे लोकांना वाटता, तेच तुमच्याकडे परत येत असतं. प्रेम, स्नेह, जिव्हाळा व सहकार्य देत राहिलात की, तुमच्या वाट्याला ते परत नैसर्गिकरीत्या येणारच! तुमच्या उत्कर्षाच्या काळात तुम्ही लोकांच्या मदतीला धावलात, तर तुमच्या पडत्या काळात लोक तुमच्या मदतीला धावतातच!
इतर लोकांचं वागणं ही आपल्या वागण्याची प्रतिक्रिया असते. तुम्ही उत्तम असलात की, लोकही उत्तम होतात. तुम्ही सकारात्मक असलात, की जगही सकारात्मक होतं. तुम्ही नकारात्मक असलात, तर मात्र सारं जग तुमच्याविरोधात चालून आल्यासारखं वाटतं. तुम्ही काय व्हावं हे जगाच्या नाही; तुमच्या हातात असतं. तुमचं यश हे तुमच्या क्रियांचीच-प्रतिक्रिया असते.