जोपर्यंत तुमची गरज असते. तोपर्यंतच तुमचे महत्व असते..! | Yashacha Password (Part 96) उपयोगिता मूल्य

यशाचा पासवर्ड (भाग :96) -उपयोगिता मूल्य

जोपर्यंत तुमची गरज असते. तोपर्यंतच तुमचे महत्व असते..!


एका सद्गृहस्थाची गाडी वाटेत मध्येच बंद पडली. तासभर त्याने शक्य तेवढे प्रयत्न केले, पण गाडी सुरू होईना. अखेर त्याने मेकॅनिकला बोलावलं. आलेल्या मेकॅनिकने गाडीचं इंजिन उघडून तपासणी केली आणि एक स्क्रू आवळला. त्या सद्गृहस्थाला म्हणाला, आता बघा गाडी सुरू करून ! सद्गृहस्थाने चावी फिरवली अन् क्षणात गाडी सुरू झाली. आनंदित झालेल्या सद्गृहस्थाने विचारले, किती पैसे द्यायचे? तसा मेकॅनिक म्हणाला, फक्त पाचशे रुपये!! पैसे ऐकून सद्गृहस्थ चांगलाच चमकला. म्हणाला, एक स्क्रू आवळायचे पाचशे रुपये ? मेकॅनिक म्हणाला, स्कू आवळायचे नाही, कोणता स्कू आवळायचा, हे कळायचे हे पैसे आहेत! स्क्रू तर तुम्हीही आवळू शकता. ते 'सामान्य ज्ञान झालं. पण कोणता स्क्रू आवळायचा हे कळणं हे 'विशेष' ज्ञान झालं. ते माझ्याकडे आहे, त्याचे हे पैसे आहेत.


सामान्यज्ञान साऱ्यांकडे असतं. पण विशेषज्ञान हे इतरांपासून तुम्हाला वेगळं अथवा विशेष बनवत असतं. आपलं अस्तित्व आणि यश चिरकाल टिकवण्यासाठी ही गरज निर्माण करावी लागतेच. आपण कुणावर अवलंबून राहूच नये. पण कुणी आपल्यावर अवलंबून नसणं, ही गोष्ट मात्र आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. लोकांनी तुमच्यावर अवलंबून राहाणं, ही तुमच्या कर्तृत्वशीलतेला क्रियाशील ठेवणारी प्रक्रिया आहे. ज्यावेळी तुमची गरज संपेल त्यावेळी तुमचं काम थांबेल. तुमची गरज असणं ही तुम्हाला पहिली संधी दिली 'जाण्याची तुमची 'योग्यता' आहे. तुम्ही तुमची गरज निर्माण केली नाही, तर ती संधी दुसऱ्याला दिली जाईल. सबब, तुम्ही स्पर्धेतून आपोआप मागे पडाल.

आपल्याला कधीही मागे ढकललं जाणार नाही, असं सर्वात पुढचं स्थान मिळवायचं असेल, तर ज्याला दुसरा पर्याय उपलब्ध होणार नाही, अशी बुद्धिमत्ता, निर्मितीक्षमता किंवा कौशल्य तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अगदी प्रचंड अफाट काही नसलं तरी चालेल, पण सर्वसामान्यांपेक्षा निराळं, वेगळं अथवा साऱ्यांत उठून दिसेल, असं विशेष ज्ञान, कृती, कौशल्य तुम्ही मिळवलंच पाहिजे. आजचं ज्ञान उद्या जुनं होईल. उद्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्हाला अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण राहावंच लागेल.

स्वतःच्या कृतींची, कौशल्याची गुंतवणूक एकाच क्षेत्रात करू नका. ती एकावेळी अनेक क्षेत्रात आणि अनेक व्यक्तींजवळ करा जेणेकरून ही गुंतवणूक तुमची गरज निर्माण करेल. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला तगवेल नि जगवेल. तुमच्याकडे भरपूर पर्याय असू द्या, पण इतरांना तुमच्याशिवाय पर्याय नसू द्या. ही अवस्था तुमचं महत्त्व अबाधित ठेवते.

दोन घोडे आपापले ओझे पाठीवर घेऊन निघाले होते. पैकी एक घोडा आळशी होता. तो विनाकारण मागे-मागे राहू लागला. उगाच थकल्यासारखं चालू लागला. त्याच्या मालकाने ते पाहिलं आणि त्या आळशी घोड्यावरचं ओझं काढून पुढच्या घोड्याच्या पाठीवर टाकलं. आळशी घोडा ओझ उतरल्यामुळे सुखावला आणि पुढच्या घोड्याला छद्मीपणे म्हणाला, 'जेवढं ओझं पेलशील, तेवढं तुझ्या पाठीवर अधिक टाकलं जाईल. तू नुसता ओझं उचलत कष्ट कर आणि असाच मर!' पुढचा मात्र ओझं सावरत काही न बोलता चालत राहिला.

मुक्कामाला पोहोचल्यावर मालक चारा घालण्यासाठी आला तेव्हा म्हणाला, 'माझं सगळं ओझं जर एकच घोडा उचलू शकतो, तर दुसरा ठेवू कशाला? त्यापेक्षा ओझं न उचलणारा घोडा कापावा आणि त्याच्या चामडीतून पैसा कमवावा!' आणि तसं केलंही!

जोपर्यंत तुमचा इतरांना उपयोग असतो, तोपर्यंतच तुमच्या असण्याला अर्थ असतो.
 

उपयोगिता मूल्य नसेल, तर तुम्ही असून नसल्यासारखे! सातत्याने क्रियाशील राहा. तुम्ही बरंच काही करू शकता, ही आशा इतरांच्या मनात सतत जिवंत ठेवा. स्वतःचं उपयोगिता मूल्य वाढवा. तुमची गरज निर्माण करा. कारण गरजेशिवाय यशही कुठे फिरकत नाही!


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने