यशाचा पासवर्ड (भाग :90) - व्यासंग (Obsession)
क्षणभंगूर नव्हे चिरकाल टिकणारं यश मिळवून देणारं अभ्यासतंत्र म्हणजे व्यासंग..!
माणसं निसर्गाच्या कृपे-अवकृपेबाबत बोलतात, पण निसर्गाचं रहस्य जाणून घेताना फारसं कुणी भेटत नाही. सध्या एका क्लिकवर हवी ती माहिती मिळते. तरीसुद्धा जाणीवपूर्वक ज्ञान-संशोधन करणारं कुणी दिसत नाही. फोनवर बोलणं खूप होतं. पण लेखनसामर्थ्य मात्र आता हरवत चाललं. आहे. बैठकीत गप्पांचे फड अमाप रंगवले जातात. मात्र एखाद्या विषयाचं अभ्यासपूर्ण, सुसंगत विवेचन करणं थंडावलं आहे. गाणं प्रत्येकाला आवडतं, पण एकाच जागेवर बसून सलगपणे रियाज करावा, असं वाटणं दुर्मिळ झालं आहे.
काळ, परिस्थिती, गरजा बदलल्या आहेत. या बदलात स्थिर वृत्तीने, स्थिर चित्ताने काही व्यासंग धरावा. त्या व्यांसगात झपाटून जावं, असं झपाटलेपण उरलं नाही. वेळ निभावून न्यावी आणि घटका साजरी करावी, हाच आता नित्याचार झाला आहे.
एका विचारवंताने जीवनाची दोन प्रयोजनं मानली-टु बी आणि टु हॅव. आपलं अस्तित्व आणि व्यक्तिमत्त्व यांचा विकास म्हणजे टु बी आणि पैसा आणि सत्ता-सुख यांच्या लाभासाठी धडपडणे म्हणजे टु हॅव. ज्यांना स्वत्व आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं, ते ध्यास धरतात, टु बीचा! आणि ज्यांना वरवर आनंदाची, सुखलोलुपतेची आवड, ते कास धरतात टु हॅवची! यश वरवर मिळणाऱ्या आनंदात उथळ भोगात नसतं; तर ते असतं परिपूर्ण, संपन्न, समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीत! ते व्यांसगाने निर्माण करता येतं.
पदव्यांच्या हव्यासापेक्षा, ज्ञानाचा ध्यास धरणारी माणसं व्यासंगी असतात. क्षणभंगुर यश हे पदव्यांनी मिळू शकतं, पण चिरकाल टिकणारं, समाधान देणारं यश हे व्यासंगानेच गाठता येत. जगभरात जे शोध लागले, ज्यामुळे ही समृद्धी आली ती व्यांसगाने झपाटलेल्या संशोधकांमुळे! आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम उंची त्यांनी गाठली, ज्यांना व्यांसगाच्या जोरावर त्या क्षेत्राची खोली गाठता आली. ज्ञान-विज्ञानतत्त्वज्ञानाच्या ज्या शाखा वाढल्या. जी कवाई खुली झाली, ती व्यांसगाने निर्माण झालेल्या ग्रंथकारांच्या ग्रंथांमुळे! ग्रंथांम धील हे ज्ञान आपल्याला कळण्यासाठी तरी ग्रंथ व्यासंगी व्हावंच लागेल.
स्वामी विवेकानंदांकडे फार मोठी पदवी नव्हती. पण त्यांनी अमेरिका, इंग्लंड, युरोपात जी व्याख्यानं दिली, त्यातून त्यांचा विद्याव्यासंग जगाला दिसला. त्यांच्या विद्वत्तेने आणि भाषाप्रभुत्वानं आश्चर्यचकित झालेल्या श्रोत्यांनी मग त्यांना त्यांची पदवी विचारली नाही. त्यांचं नाव हीच त्यांची पदवी झाली.
अर्थकारण, राजकारण, इतिहास, समाजकारण विषय कोणताही असो. आपल्या व्यासंगाने त्यातील सार शोषून घेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ते ज्या विद्यापीठात शिकले, त्या विद्यापीठात 'शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून नोंद झाली, ती त्यांच्या व्यासंगानेच!
खली असो किंवा मिल्खासिंग वा सचिन तेंडुलकर; त्यांच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च यश गाठलं, ते व्यासंगाच्या बळावरच! व्यासंग ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. एका गायकाला विचारलं, 'आता तुम्ही सर्वोत्तम गायक आहात. तुम्हाला रियाजाची, गाण्याच्या व्यासंगाची गरज काय?' तो म्हणाला, 'बरोबर आहे. पण मी रियाज केला नाही आणि गायलो, तर महिनाभरात माझ्या गाण्यातील फरक श्रोत्यांना कळेल. आठवडाभरात माझ्या पत्नीला आणि एका दिवसात तो माझ्या लक्षात येईल. सर्वोत्तम, परिपूर्ण राहायचं असेल, तर मला रोजचा रियाज केलाच पाहिजे.'
व्यासंग म्हणजे तप. जो करतो त्याला सिद्धी लाभतेच. व्यासंगाने उथळपणा नि कोतेपणा दूर होतो. अवखळपणा, अल्लडपणा जाऊन परिपक्वता येते. व्यासंग म्हणजे बुद्धीची शिस्त. वाचन, लेखन, चिंतन, संशोधन, मूल्यम पन, सातत्याचा सराव, अशा प्रक्रियांचा समुच्चय म्हणजे व्यासंग! हवं ते गाठल्याशिवाय स्वस्थता नसण्याचं झपाटलेपण म्हणजे व्यासंग! क्षणभंगुर नव्हे; चिरकाल टिकणारं यश मिळवून देणारं अभ्यासतंत्र म्हणजे व्यांसग !