What is Self Respect | अभिमानी कार्याची निर्मिती स्वाभिमानी मनातूनच होते..! | Yashacha Password (Part 89) - स्वाभिमान (Self-respect)

 यशाचा पासवर्ड (भाग :88) -स्वाभिमान (Self-respect)

अभिमानी कार्याची निर्मिती स्वाभिमानी मनातूनच होते..!

'शौर्य, धैर्य, साहस, धाडस आणि पराक्रम आपल्या ठायी असूनही आपण परकीयांच्या वरवंट्याखाली का भरडून जायचं. या भूमीवर होणारा अन्याय अत्या का सोसायचा? इथं आपलं स्वतःचं राज्य का नाही?' असं म्हणत शिवरायांनी इथल्या भूमीपुत्रांच्या मनातला स्वाभिमान जागा केला. या स्वाभिमानातूनच पराक्रम उफाळला आणि या मातीत स्वराज्य उभं राहिलं.

आपण कोण आहोत, काय करू शकतो, याची जाणीव म्हणजे स्वाभिमान! स्वतःला स्वतःबद्दलचा वाटणारा अभिमान, अस्मितेची जाणीव म्हणजे स्वाभिमान! या स्वाभिमानातूनच इतिहास घडला. राष्ट्र घडली! स्वतःच्या स्वत्वाची जाणीव झाली की स्वाभिमान जागा होतो. तो जागा झाला की कार्यक्षमता वाढते. अशक्य तेही मग शक्य होऊन जातं. यश-अपयश मिळवून देण्यात स्वाभिमान महत्त्वाची भूमिका बजावतो. आपलं सामर्थ्य, आपलं महत्त्व याची जोपर्यंत स्वतःलाच जाणीव होत नाही, तोपर्यंत स्वाभिमान उंचावू शकत नाही. कोणतंही कार्य करायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर त्याला आतूनच प्रेरणा-चालना मिळावी लागते, ती प्रेरणा देण्याचं काम स्वाभिमान करतो.

स्वाभिमान निश्चित विचार देतो. क्षमता विस्तारतो आणि जबाबदारी स्वीकारण्याची भूमिकाही प्रदान करतो. स्वाभिमानी माणसंच धाडसी असतात. स्वाभिमानच महत्त्वाकांक्षा वाढवत असतो. अपमानाचा बदला अपमानाने किंवा टीकेचा बदला टीकेने करण्यापेक्षा स्वाभिमानी माणसं त्यालाच आव्हान समजून सामोरी जातात, कृतीप्रवण होतात आणि सर्वोत्तम कामगिरी करून उत्तर देतात, स्वाभिमानी माणसं संवेदनाक्षम असतात, स्वाभिमानाला कुणी ठोकर दिली तर ती दुखावतात. पण त्यातूनच पेटून उठतात आणि विशाल कार्य उभं करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, मार्टीन ल्यूथर किंग ही माणसं याच माणूसपणाच्या स्वाभिमानातून पेटून उठली आणि व्यवस्थेविरुद्ध बंड करून त्यांनी नव्या विश्वाची उभारणी केली.

स्वाभिमान म्हणजे खरं तर स्वतः बद्दलची स्वतःच्या मनात असणारी प्रतिमा। ही प्रतिमा जेवढी मोठी नि विशाल तेवढाच स्वाभिमानही! पण या स्वतःच्या प्रतिमेला तुम्ही मर्यादा घातल्यात, ती संकुचित केलीत, की स्वाभिमानही तितकाच कमी होतो. स्वाभिमान शून्य असणारी माणसं कमकुवत असतात. संकुचित मनाची, स्वार्थी, जबाबदारी टाळणारी, पुढाकार न घेणारी, धाडस नसणारी, सतत दबणारी, लाचारी पत्करणारी, दुसऱ्याच्या दयेवर जगणारी, दुबळी आणि आत्मविश्वास नसणारी माणसं ही अपयशीच ठरतात.

मी फेकलेले पैसे उचलत नाही, असं म्हणत मी भिकारी नाही हे सांगणारा माणूस स्वतःची प्रतिमा म्हणजे स्वाभिमानच ठसवतो. आपण कोण आहोत, हे स्वतःच्या हिंमतीने, कष्टाने दाखवून सामर्थ्याने सन्मान मिळवतो. त्याला झुकणं मान्य नसतं. संकटामुळे नमणं त्याला जमत नाही. स्वाभिमान हा न झुकण्याचा गुण प्रदान करत असतो.

स्वाभिमानापोटी सम्राट अकबरापुढे न झुकणारे महाराणा प्रताप किंवा औरंगजेबापुढे न नमणारे संभाजीराजे यांनी मरण पत्करलं, पण शरण जाणं स्वीकारलं नाही. स्वाभिमान कणा ताठ राखण्याचा अभिमान देतो. आपला स्वाभिमान म्हणजे आपल्या भावना. भावना आणि कार्यक्षमता यांचा थेट संबंध असतो. आपले आई-वडील, आपला समाज, आपली भूमी, आपला देश यांच्याबद्दलच्या आदरातूनच स्वाभिमान प्रकट होत असतो. 

सुनील गावसकर पाकिस्तानला गेले, तेव्हा तिथल्या प्रसिद्ध गायिका मुमताज यांना सुनील गावसकरची ओळख करून देताना इम्रान खानने सांगितलं, हे जगातील सर्वोत्तम फलंदाज सुनिल गावसकर! तशी ती मुमताज म्हणाली, मी कुणा गावसकरला ओळखत नाही. मला फक्त इम्रान खान माहिती आहे! नंतर इम्रान खानने मुमताजची ओळख करून देताना सुनील गावसकरना सांगितलं, या जागतिक कीर्तीच्या गायिका मुमताज! तसे सुनील गावसकर झटकन म्हणाले, मला कुणी मुमताज माहिती नाही. मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो. हा असतो स्वाभिमान, जो यशाकडेच नेतो!

nitin bangude patil

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने