बुद्धी म्हणजे मिळवलेलं ज्ञान नव्हे. बुद्धी म्हणजे प्रश्न पडणे.. | Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 91) - बुद्धिमत्ता (Intelligence)

यशाचा पासवर्ड (भाग :91) - बुद्धिमत्ता (Intelligence) 

प्रश्नपत्रिकेतील जगाला प्रश्न सोडवू न शकणाऱ्या अनेकांनी भेडसावणारे प्रश्न सोडवलेत..!


परीक्षेत उत्तम गुण मिळवून माणसं गुणवंत होतात. उत्तम कलानिर्मितीच्या बळावर काही कीर्तिवंत होतात. उत्तम शरीर संपदेच्या बळावर काही माणस जयवंत होतात. आपल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवून काही यशवंत होतात. पण ही सारी बुद्धिमंत असतीलच असं नाही. तीन तासांच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या माहितीसंग्रहाच्या आणि स्मरणात ठेवलेल्या ज्ञानाच्या बळावर लिहिणं आणि गुण मिळवणं म्हणजे बुद्धीची प्रखरता नमो बुद्धी म्हणजे मिळालेले गुण नव्हे. बुद्धी म्हणजे लाभलेली पदवी नव्हे. उत्तम गुण न लाभलेली अथवा नापास झालेली मुलं बुद्धिमंत नसतात, असं तर अजिबात नव्हे. आयुष्याच्या यशोपरीक्षेत सर्वोत्तम विजेते ठरलेले अनेकदा शालेय परीक्षेत नापास झाल्याची नोंद आढळते. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं देऊ न शकणारी माणसं, पुढे जगाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी ठरली. मग बुद्धी म्हणजे नेमकं काय? बुद्धी म्हणजे मिळवलेलं ज्ञान नव्हे. बुद्धी म्हणजे प्रश्न पडणे..

बुद्धी म्हणजे मिळवलेलं ज्ञान नव्हे. बुद्धी म्हणजे प्रश्न पडणे.. | Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 91) - बुद्धिमत्ता (Intelligence)

तो सोडवण्याची धडपड करणे. त्यासाठी परिस्थितीचा अर्थ लावण्याची, समस्याचं निराकरण करण्याची, संकटातून वाट काढण्याची नैसर्गिक क्षमता म्हणजे बुद्धी..!

समान शिक्षणाच्या लाटेने पुढे नेणं योग्य नाही, हे स्पष्ट झालं. मग त्यासाठी वर्गीकरण करता येईल काय? मुलांची क्षमता मोजणं शक्य होईल काय? या प्रयत्नातून विचारवंतांनी, शिक्षणतज्ज्ञांनी बुद्धिमत्ता मूल्यमापनाच्या कसोट्या तयार केल्या व त्यातून बुद्धिगुणांक काढला जाऊ लागला. त्याचे प्रकार पाडण्यात आले. सामान्य, शीघ्र, अतिशीघ्र, असामान्य आणि तेजस्वी बुद्धी असे ते प्रकार आहेत. ५० ते ७० बुद्धिगुणांकाचा मंदबुद्धी; तर १७० बुद्धिगुणांक असणारा प्रतिभावंत मानला गेला. ज्या साहित्यिकांना प्रतिभावान मानलं गेलं, ज्या गायकांना प्रतिभा संपन्न समजलं गेलं किंवा ज्या खेळाडूंना जीनियस मानलं गेलं ते पुस्तकी परीक्षेत नापास झालेले होते. कदाचित, त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक चाचण्या घेतल्या. असत्या तर त्यांच्या क्षमतांचं, प्रज्ञेचं दर्शन घडलं असतं. मग निव्वळ परीक्षेत उत्तम गुण मिळवणारा बुद्धिमान नि नापास होणारे 'ढ' म्हणून त्यांना हिणवणं, कमी लेखणं, हा त्यांच्या ठायी असणाऱ्या इतर क्षमतांचा, प्रज्ञेचा, गुणांचा अपमान करण्यासारखं नव्हे का ? गुण हेच सर्वश्रेष्ठ! या भ्रमामुळे नापास होण्याच्या भीतीपोटी किंवा झाल्यामुळे अनेकजण आत्महत्यांचा मार्ग पत्करतात. हे त्यांच वैयक्तिक नुकसान आहेच, पण त्यांच्यात असणाऱ्या इतर गुणांचा, प्रतिभेचा जो लाभ जगाला घडला असता; त्यातून जे विश्व निर्माण केलं असतं, तेही त्यांच्यासोबत संपून जातं.

कोणाला कथा कळते; पण भूगोल कळत नाही. कोणाला इतिहास आठवतो, पण गणित सुटत नाही. कोणाला यंत्रातलं सारं कळतं; पण व्यापारातलं समजत नाही. बुद्धी जी यंत्रातंत्रात चालतं ती तंत्रप्रधान, जी सामाजिक क्षेत्रात सहज विहार करते ती समाजप्रधान तर इतिहास-गीत-संगीतापासून कला-तत्त्व चिंतनापर्यंत रमते ती विवेचक बुद्धी! ज्याला ज्या पद्धतीची निसर्गदत्त बुद्धी मिळालेली असते, तिचा विकास साधावा म्हणजे अपयश वाट्याला येत नाही. डॉक्टरही बुद्धिमान असतो आणि शेतकरीही बुद्धिमान असतो. फक्त त्यांचं व्यावसायिक नैपुण्य ज्या घटकावर अवलंबून असतं, ते घटक भिन्न असतात.

ज्ञानसंपादन आणि ज्ञानउपयोजन यांचा समन्वय साधून अनुभवाचे सर्व घटक संघटित करून क्रियाशील होणं म्हणजे बुद्धिमत्ता! बुद्धी म्हणजे सक्रीय ज्ञान. बुद्धी म्हणजे चातुर्य, अवघड, गुंतागुंतीच्या गोष्टी सर्वशक्ती पणाला लावून पार पाडण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ! बुद्धिवंताना समस्या कळते; त्यासाठी काय करावं, ते कळतं. करतो आहे ते योग्य की अयोग्य, ते समजतं आणि समस्या खरोखरच सुटली की नाही, तेही कळतं. बुद्धी म्हणजे निव्वळ गुण मिळवण्याची क्षमता नव्हे. बुद्धिमान चालण्या-बोलण्यातून वागण्यातून उमजतो. आजूबाजूचं जगणं कळणं, स्वत:ला ओळखणं, योग्य दिशेला वळणं, यातून तो लक्षात येतो. बुद्धीमध्ये आकलनाची प्रसन्नता, अनुभवाची शुभ्रता आणि वृत्तीची निरभ्रता असते. बुद्धी निसर्गदत्त असते. तिच्या साहाय्याने ज्ञान हवं तेवढं मिळवता येतं. मात्र बुद्धीला प्रयत्नांची जोड नसेल तर सारं व्यर्थ असतं.

यशाचं दुसरं नाव बुद्धिमत्ताच असतं!प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने