नैतिक कथा - वचनाचे पालन
एका राज्यात एक महान साहित्यिक राहात होते. ते एकदा खूप आजारी पडलें. वैद्यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. परंतु साहित्यिकांनी वैद्यांचा सल्ला धुडकावून आपले काम चालूच ठेवले व आराम न करता ते आपले नित्यकार्य करत राहिले. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसू लागला. घेतलेल्या औषधांचा परिणाम होईना.
साहित्यिकांचे सहकारी या त्यांच्या वर्तनाने चिंतेत पडले. त्यांनी गावातील एका साधूला बोलावले व साहित्यिकांचे वागणे त्यांना सांगितले. साधू साहित्यिकांना भेटण्यास आले. दोघांची भेट झाली.
साधू साहित्यिकांना म्हणाले, महाशय, आपण इतके चांगले साहित्य निर्माण करता, त्यातून इतके चांगले विचार लोकांना देता. आपल्या लेखनातून समाजाचे प्रबोधन घडते पण जर आपणच राहिलाच नाहीत तर हे समाजप्रबोधनाचे काम कोण करणार?
मी एक साधू आहे. आणि मला तुमच्याकडून एक भिक्षा हवी आहे. साहित्यिक साधूंना म्हणाले, तुम्ही जी भिक्षा मागाल ती मी द्यायला तयार आहे. साधू म्हणाले, महाशय तुम्ही रोज दुपारचे जेवण झाल्यावर एक तास विश्रांती घ्याल असे वचन मला द्या, हीच माझी भिक्षा आहे.
साहित्यिकाने म्हणणे मान्य केले व दुसऱ्याच दिवशी साहित्यिकांचे सहकारी दुपारी भेटण्यासाठी आले असता त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. सहकाऱ्यांनी दार वाजवले असता साहित्यिक म्हणाले, जे कोणी आले असेल त्यांनी माझी नंतर भेट घ्या मी आत्ता साधूला भिक्षा देत आहे.
तात्पर्य : दिलेल्या वचनाचे पालन करणे हे निष्ठेचे प्रकटीकरण आहे. त्यामुळे परस्परातील विश्वास आणि संबंध दृढ होतात.