यशाचा पासवर्ड (भाग :93) -प्रोत्साहन
अपयश कधीच कुठे कायमचं मुक्कामाला रहात नसतं..!
लहानपणीच तिला पोलिओ झाला. कायमचं पंगुत्व आलं. डॉक्टरांनी सांगितलं, ही मुलगी आता आयुष्यात कधीच चालू शकणार नाही. स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही. डॉक्टरांच्या बोलण्याने तिच्या पायातीलच नव्हे आयुष्यातील बळच निघून गेलं. पण तिची आई धीराची. म्हणाली, माझ्या मुलीला पायावर उभं राहायलाच नव्हे; तर तिच्या पायांनी चालायलाच काय, पळायला लावीन मी !
अन् तिची आई तिच्या उरात नि पायात बळ भरू लागली. आईच्या प्रोत्साहनाने तीही सारी शक्ती एकवटून प्रयत्न करू लागली. ती खुर्चीतून उठायची धडपड करू लागली. जमतंय. जमलं. थोडा प्रयत्न कर. आई तिला सांगू लागली. दिवसामागून दिवस गेले. ती मुलगी खुर्चीतून उठून उभी राहिली. बघ, जमलं. तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस. चल, चालूही शकतेस. चाल. करू शकतेस तू हे… चाल. आईच्या या प्रोत्साहनपर शब्दांनी तिच्या पायात वळ आलं. ती हळूहळू चालू लागली. पडली. धडपडली. जखमी झाली.
पण आईच्या विश्वासावर पुन्हा उभी राहिली. अगं, तू चालूच काय; पण पळूही शकतेस. पळ…पळ.. ती बघता बघता पळू लागली. सुरुवातीला हळूहळू मग वेगात… आणखी वेगात आणि मग अक्षरशः ती वाऱ्यासारखी पळू लागली, ती विल्मा रुडॉल्फ !
ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत तीन सुवर्णपदकांची मानकरी ठरली तेव्हा विल्मा रुडॉल्फ म्हणाली, 'हे यश मी मिळवलं, ते निव्वळ नि निव्वळ माझ्या आईच्या प्रोत्साहनामुळे ! आईने माझ्या वैगुण्यांवर नव्हे; माझ्या
बलस्थानावर लक्ष केंद्रित केलं. तिने माझ्या इच्छाशक्तीत वळ भरलं. माझ् आत्मविश्वासाला ताकद दिली. माझ्या जिद्दीला प्रयत्नांची जोड दिली आणि माझ्या पंगुत्वाचं रूपांतर तिने यशात केलं.'
तो ३१ साली व्यवसायात अपयशी झाला. ३२ साली विधिमंडळासाठी पराभूत झाला. ३४मध्ये विधिमंडळावर निवडून गेला, तर ३५ मध्ये त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला. ३६मध्ये त्याच्या चेतासंस्थेवर आघात झाला. ३८मध्ये अध्यक्षपदासाठी त्याचा पराभव झाला. राष्ट्राध्यक्षांना निवडून देणाऱ्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत तो ४० मध्ये हरला. ४९मध्ये अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीतही हरला. ५०मध्ये सिनेटची निवडणूक हरला.. ५६मध्ये उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरला. पुन्हा ५८ मध्ये सिनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला. पण १८६०च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तो 'राष्ट्राध्यक्ष' म्हणून निवडून आला. त्याचं नाव होतं अब्राहम लिंकन !
हा विलक्षण चिवटपणा आणि अपयशाने खचून न जाता पुनः पुन्हा उठून उभा राहाण्याची कला लिंकन कुठून प्राप्त करू शकले ? लिंकन सांगतात, हे सारं त्यांच्या अंतरंगातून आलं. पण ते सातत्याने प्रयत्न करत राहिले, त्याचं महत्त्वाचं कारण लोकांचा त्यांच्यावर त्यांच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता. लोक त्यांना अपयशाच्या गर्तेत असताना धीर द्यायचे. त्यांना सांगायचे, अपयश कधीच कुठे मुक्कामाला कायमचं राहात नसतं आणि त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचे. अपयशाने कधीच कुणाचं नुकसान होत नाही. फक्त त्याच्याच हातून चूक होत नाही, जो मनुष्य कधीही काहीच करत नाही; जर अपयश वाट्याला येत नसेल, तर त्याचा अर्थ, कुठलीही जोखीम न पत्करता ते अगदी जपून-जपून काम करत आहेत. पण असं करून यशही कधी वाट्याला येत नाही. धोका पत्करायलाच हवा. पुन्हा उठून लढायलाच हवं. 'उठ, पुन्हा लढ, तू जिंकू शकशील! असं सांगत प्रोत्साहन देणारे मित्र नि शिक्षक मला लाभले म्हणूनच मी यशस्वी झालो,' असं लिंकत सांगायचे.
यशासाठी प्रोत्साहित करणाऱ्या लोकांत सामील व्हा. मोठ्या माणसांची चरित्रं वाचा. अपयशातून यशाकडे भरारी घेतलेल्या गाथा वाचा. आजूबाजूचा निसर्ग जाणा. बघा, तोही सर्वांना प्रोत्साहित करत असतो, अडचणी तुला थांबवण्यासाठी आल्या नाहीत; तुझी उंची वाढवण्यासाठी आल्या आहेत. चल, पुढे हो.. हे तू करू शकतोस..! हेच निसर्ग सांगत असतो.