मोठं व्हायचं असेल तर इतरांना मोठं करा |Motivation by Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 92) - प्रशंसा (compliment)

यशाचा पासवर्ड (भाग :92) -प्रशंसा (compliment)

आजची प्रशंसा उद्याच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देत राहते..!


इतर कोणत्याही आजारापेक्षा आपण नकोसे झालो आहोत अथवा आपला काही उपयोग नाही, ही भावना हाच सर्वात मोठा आजार आहे. ही भावना.  माणसाची क्रियाशक्ती किंवा जगण्याची उमेदच संपवू शकते. ही नकारात्मक भावना संपवून क्रियाशक्ती, उत्साह वाढवण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक प्रवलीकरण!

सकारात्मक प्रबलीकरण म्हणजेच प्रशंसा करण्याची कला! खरं तर, प्रत्येकजण आपलं महत्त्व कोणीतरी जाणावं, यासाठी आसुसलेला असतो. आपली कोणीतरी दखल घ्यावी. आपल्या कामाला दाद द्यावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. मैदानात प्रेक्षकांनी दिलेली दाद असो वा मैफलीत श्रोत्यांनी गायकाला दिलेली दाद असो, ही प्रशंसा खेळाडूंचा वा गायकाचा उत्साह वाढवणारी, अधिकाधिक सर्वोत्तम ते निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरते.

एका यशस्वी उद्योजकाला विचारलं, इतर कंपन्यांच्या तुलनेत तुमच्या कंपनीने साधलेल्या प्रगतीचं रहस्य काय? यावर तो म्हणाला, 'इतर लोक मणसांच्या चुका शोधण्यावर भर देतात. मी माझ्याकडे असणाऱ्या माणसांची प्रशंसा करण्याची संधी शोधत असतो. मला ती मिळाली की, मी पटकन तिचा फायदा घेतो. माझ्या कामगारांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. कौतुक करतो. शाबासकी देतो. यामुळे ते करतात त्याहीपेक्षा अधिक वेगाने नि समर्पणाने कामाला लागतात. यशाच्या पुनरावृत्तीची प्रवृत्ती वाढीस लागते, ती यातूनच!

चांगलं काम करण्याची भावना बळकट करण्याचा प्रशंसा हा प्रभावी मार्ग आहे. अपयशाने खचलेल्या, धडपडून मेटाकुटीला आलेल्या एखाद्याला फक्त तुम्ही, तुझ्या मेहनतीचं मोठं कौतुक वाटतं! एवढं बोललात, तर त्याला ते प्रचंड बळ देणारं ठरतं. धडपडणाऱ्या माणसाला पाठीवर फक्त एक कौतुकाची थाप पुरेशी असते.

एका प्रसिद्ध चित्रकाराने सांगितलं, 'माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. पाठीवर त्यांच्या कौतुकाची थाप मिळवण्यासाठी मी कोण धडपडायचो. एखादं चित्र काढल्यानंतर त्यांनी केलेली प्रशंसा ही मला पुढच्या चित्रासाठी प्रेरित करायची. माझ्या वाट्याला माझ्या वडिलांची शाबासकी यावी, यासाठी मी प्रचंड कष्ट करायचो. ह्या कष्टांतूनच मी सर्वोत्तम चित्रकार झालो. माझ्या यशाच्या पाठीमागे कारणीभूत माझ्या वडिलांची प्रशंसाच आहे.'

प्रशंसेने माणसं सुखावतात. अधिक मोठं कार्य करण्यासाठी झेपावतात. एखाद्याचे दोष शोधून टीकाटिप्पणी करण्यापेक्षा त्याचे गुण जाणून त्याची प्रशंसा करणं, हे सर्वोत्तम कृतिशीलतेची निर्मिती करण्यासारखं आहे. उत्तम प्रशंसक होणं यासारखा दुसरा सन्मान नाही.

मात्र प्रशंसक होताना आपण स्तुतिपाठक तर होत नाही ना, याचीही काळजी घेणं महत्त्वाचं. खुशामत करणारी माणसं स्वार्थापोटी अवतीभोवती जमतात. प्रशंसा करणारी आणि खुशामत करणारी माणसं यातील फरक ओळखता आला. पाहिजे. प्रशंसा हृदयातून येते; तर खुशामत वरवरची असते. प्रशंसक तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात; तर स्तुतिपाठक तुम्ही आता सर्वोच्च आहात, असं म्हणत पुढे जाण्याचे रस्ते बंद करतात. प्रशंसेपेक्षा स्तुती करणं सोपं असतं. अशा स्तुतिपाठकांपासून सावधान राहाणंही जमलं पाहिजे.

प्रशंसा करताना ती अती होणार नाही, याचीही काळजी घेणं महत्त्वाचं असतं. ती अती आत्मविश्वास देऊ शकते. अती आत्मविश्वास घातक ठरण्याचीही शक्यता असते. प्रशंसा जशी सकारात्मक प्रबलीकरणाची पद्धत आहे, तशी यशासाठी नकारात्मक प्रबलीकरणही आवश्यक असतं. नकारात्म क प्रबलीकरण याचा अर्थ, चुका दाखवून कानउघाडणी करणं आणि योग्य रीतीने पुढे जाण्यासाठी प्रेरित करणं. प्रशंसेचं प्रेम आणि कानउघाडणीची भीती यांच्या संमिश्र भावनेतून यश गाठता येतं. पण चुका नेहमी खाजगीत सांगाव्यात आणि प्रशंसा मात्र चारचौघांत करावी.

इतरांची प्रशंसा करणं म्हणजे स्वतः उत्तम प्रशंसक होणं. तुम्ही प्रशंसक झालात की, तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगायची गरजच पडत नाही. इतर लोकच तुमच्याबद्दल भरभरून सांगत राहातात. मोठं व्हायचं असेल तर इतरांना मोठं करा.यशाचा यापेक्षा सोपा मार्ग नाही !


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने