यशाचा पासवर्ड (भाग :87) -दूरदृष्टी (Vision)
नजर आजवर नव्हे उद्यावर ठेवायला हवी नुसती दृष्टी उपयोगाची नाही, यशासाठी दूरदृष्टी हवी..!
मला फळं खायला मिळतील न मिळतील, पण मी आज झाड लावलंच नाही, तर माझ्या उद्याच्या पिढ्यांना फळं कशी मिळतील? उद्याच्या या विचारातून झाडं लावणाऱ्यामुळेच आजच्या पिढीच्या वाट्याला फळं आली. आज आपण विचारांच्या कल्पनांच्या कृतीच्या शोधाच्या बिया पेरत गेलो, तरच या साऱ्याचा दुष्काळ हटून समृद्धीची, विचारांची, संकल्पनांची, कल्पनांची श्रीमंती वाट्याला येईल.
आज केलेली काटकसर ही उद्याची श्रीमंती बहाल करत असते. पण जी माणसं आजसाठीच सारं खर्चतात, तात्पुरतं सुख, क्षणाचाच आस्वाद घेण्यात रमतात, ती माणसं भविष्यकाळात कफल्लक, अयशस्वी म्हणूनच वावरतात. याउलट, जी माणसं उद्याचा विचार करून कृतिशील होतात. क्षणिक सुख, छोटे धोके, किरकोळ घटना याकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता निर्माण करतात. वर्तमान दृश्यापलीकडे काही भव्य-दिव्य आहे, त्याचा शोध घेत झेपावतात, ती माणसं यशस्वी ठरतात.
प्रत्येक महापुरुषाला त्याच्या तत्कालीन समाजाने अव्हेरलं, छळलं. पण त्यांनी मार्ग बदलला नाही. त्यांच्या वाटेत अनेक मोहाचे क्षण आले; पण ते ढळले नाहीत. सुखाची नवी वाट समोर असूनही ते काट्याकुट्यांचा मार्ग चालत राहिले. याचं कारण, त्यांनी दूरवर पाहिलं होतं. उद्याच्या उदात्त, मंगल समाजासाठी त्यांनी त्यांचा आज कारणी लावला होता.
दूरवरचं पाहाणं म्हणजे ज्योतिष पाहाणं नव्हे. जो ज्योतिष्याला भविष्य विचारत असतो तो खरं तर त्याला उमजणारं-समजणारं, स्वतःला घडवता येणारं भविष्यही गमावत असतो. वर्तमानातील घटनांवर, कृतीवर नजर ठेवून परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन जो भविष्याचा वेध घेतो, तो खरा सामर्थ्यवान ! आज कशाला किंमत आहे ते पाहू नका. उद्या कशाला जास्त किंमत असेल, ते ओळखण्याचा आणि मिळवण्याचा जो प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. घटना घडण्याची नव्हे; तर घटना घडल्यानंतर काय होईल, याची जाणीव ठेवून जो आखणी करतो, तो खऱ्या अर्थाने जेता ठरतो.
मराठ्यांचं कणभर स्वराज्य आपल्या मणभर सामर्थ्याच्या जोरावर सहज जिंकता येईल, या भ्रमात औरंगजेब दख्खन जिंकण्यास आला खरा. पण स्वगृहापासून लांब जाऊन लढण्याचे धोके त्याने जाणले नाहीत. स्वत: च्या मायभूमीत मराठे इतक्या प्राणपणाने लढतील, हे त्याने ध्यानात घेतलं नाही. सामर्थ्याच्या नव्हे; बुद्धीच्या बळावर मराठ्यांनी औरंगजेबाचा सारा खजिना, सैन्य, सामर्थ्य बरबाद केलं. इतके की तो इथेच इतका गुरफटला की त्याला जिवंत दिल्लीला परत जाताही आलं नाही. इतका सर्वनाश निव्वळ त्याच्या स्वराज्य संपवू पाहाण्याच्या भावनातिरेकाने, बुद्धीचा वापर न करता मनाच्या आहारी जाण्यामुळे झाला. स्वराज्य जिंकण्याच्या गौरवाची संधी त्याने पाहिली, पण पुढ्यात येणारी, अंतरा-अंतरावर दडलेली अनेक संकटं पाहाण्यास मात्र तो असमर्थ ठरला.
अपयशाचं सर्वात मोठं कारण, समोर दिसणाऱ्या संकटाचाच प्रचंड बाऊ करणे आणि दूरवरच्या संकटांकडे लक्षच नसणे किंवा त्याबद्दल सतर्क न राहाणे. दूरवरची अस्पष्ट दिसणारी संकटं आकार धारण करण्यापूर्वीच आपण पाहिली, तर त्याविरोधात लढण्याची नि जिंकण्याचीही तयारी करता येते. छोट्या संकटाकडे दुर्लक्ष करून त्यापाठोपाठ येणारं महाभयंकर संकट आपण टाळू शकत नाही. आजच्या किरकोळ दुखण्याकडे केलेलं दुर्लक्ष, उद्याच्या महाभयंकर आजाराला नियंत्रण ठरू शकतं. नजर आजवर नव्हे; उद्यावर ठेवायला हवी. नुसती दृष्टी उपयोगाची नाही. यशासाठी दूरदृष्टी हवी. तुम्ही अडचणीत येण्यापूर्वीच तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेऊन त्यांना नष्ट करायला शिका! तुमची नजर जवळच गुंतून पडली, तर लांबचं दिसणार नाही आणि लक्ष्य स्पष्ट दिसल्याशिवाय झेपावणं घडत नाही. जितकी तुमची दृष्टी दूरवर पोहोचेल, तितकं तुम्ही अधिक मिळवू शकाल. नुसती पाहाणारी नव्हे, तर भविष्य पारखणारी दृष्टीच यश देते !