यशाचा पासवर्ड (भाग :88) - मैत्री (Friendship)
चांगला मित्रच तुमची यशाशी मैत्री घडवत असतो..!
तुम्ही कोणत्या पुस्तकांच्या आणि कोणत्या मित्रांच्या संगतीत आहात, यावर तुमच्या यशाचा लेखाजोखा ठरत असतो. आपला मित्र परिपूर्ण आणि सर्वगुणसंपन्न असावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आपण परिपूर्णतेचा शोध घेतो, तेव्हा पदरी निराशा येते. सर्वगुणसंपन्न कुणीच नसतो. अशा वेळी मित्राच्या न्यूनत्वावर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्या गुणत्वाचा विचार केला आणि त्याचं न्यूनत्व आपल्या प्रोत्साहनाने दूर करू पाहिलं, तर मित्रच नव्हे यशही जवळ येतं. आपले गुणदोष माहिती असूनही; आपल्याबद्दल सगळे जाणूनही जो आपल्यावर प्रेम करतो, तोच मित्र! मैत्री म्हणजे प्रेम, आस्था. मैत्री म्हणजे चुकीची कानउघाडणी, संकटकाळी मदतीचा हात… मैत्री म्हणजे शाबासकीची पाठीवर पडणारी थाप आणि आसवं पुसणारा ऊबदार हात !
मैत्री त्यागावर अवलंबून असते. स्वार्थीपणा मैत्रीला बाधा आणतो. तशा रोज ओळखीपाळखी खूप होतात. पण मैत्र एखाद्याशीच जुळतं. कारण तिथे प्रामाणिकपणा, परिपक्वता आणि त्याग असतो. मैत्री जुळायला जसा वेळ लागतो, तशी ती टिकवायलाही प्रयत्न करावे लागतात. एका वर्षात १०० मित्र बनवणं अवघड नाही, पण १०० वर्षांपर्यंत एकच मित्र टिकवून ठेवणं अवघड! मैत्रीत अशा अनेक परीक्षा द्याव्या लागतात. नंतरच ती अधिक घट्ट नि अधिक दृढ होत जाते.
निव्वळ सौंदर्य वाढवणाऱ्या दागिन्यांसारखे मित्र नकोत. स्तुतिपाठक तर पावलोपावली भेटतात. पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र महत्त्वाचे! स्तुतिपाठक मित्र आपला प्रगतीचा वेग मंदावून टाकतात; तर कठोरपणे सल्ले देणारे मित्र आपली बिनघोर प्रगती साधू इच्छितात. माणसं सुखात संबंध वाढवतात, मैत्र जोडतात. मात्र सुखाचा नि श्रीमंतीचा थाट ओसरला की, दिसेनासे होतात. काहीजण जोपर्यंत तुमची उपयुक्तता आहे, तोपर्यंत सोबत धावतात आणि ती संपली की गायब होतात. मित्र सुखात नव्हे; संकटात कळतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा तुमच्या मि त्रांना कळते, तुम्ही कोण? आणि जेव्हा तुम्ही अयशस्वी ठरता, तेव्हा तुम्हाला कळते, मित्र कोण? खऱ्या मित्रांसमोर दुःख कमी होतं आणि आनंद वाढतो.
युद्धात आपल्या मित्राला गोळ्या लागल्याचं लक्षात येताच त्याचा जवान मित्र त्याला पाहायला निघाला, तेव्हा बाकीच्या जवानांनी त्याला थोपवलं. त्याला म्हणाले, 'अरे, त्याला वर्मी गोळ्या लागल्या आहेत, तो मेलाही असेल. पण त्याला पाहाण्याच्या नादात तू तुझा जीव कशाला धोक्यात घालतोस? चहूकडून गोळ्यांचा भडिमार चालू आहे !'
पण त्याला राहावेना. अखेर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो मित्राच्या बंकरमध्ये धावलाच. थोड्या वेळाने परत आला, तेव्हा बाकीच्या जवानांनी विचारलं, आहे का जिवंत तो? त्याने नकारार्थी मान हलवली. तेव्हा ते म्हणाले, तुला आधीच सांगत होतो. उगाच जीव धोक्यात घालून गेलास स्वत: चा. तसा तो म्हणाला, 'मी त्याच्याजवळ गेलो, तेव्हा तो जिवंत होता. मला पाहताक्षणी तो आनंदला. माझा हात हातात घेऊन म्हणाला, मला खात्री होती तू येशीलच!' आणि मग माझ्याच मांडीवर त्याने अखेरचा श्वास घेतला. तो माझ्यासाठीच प्राण थोपवून थांबला होता. त्याचा विश्वास होता माझ्यावर. मी गेलो नसतो, तर मात्र..
मैत्री म्हणजे विश्वास. मैत्री म्हणजे भरवसा. मैत्री म्हणजे बांधिलकी. आपल्या उरात साठलेलं कुणापुढे तरी रितं करावं, असं वाटणारं स्थान म्हणजे मित्र, जिथे चांगुलपणाची देवाणघेवाण करावी, असं ठिकाण म्हणजे मित्र. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही की आनंदाने स्वतःला स्वतःच मिठीही मारू शकत नाही. त्यासाठी एक मित्र हवाच. तुम्हाला हर क्षणी समजून घेणारा! परिस्थिती अवघड असते, तेव्हा व्यक्तीला स्वतःचा प्रभाव आणि पैसा नाही, तर स्वभाव आणि मित्रच उपयोगी पडतात. मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही आदर्श मित्र बना. कारण, चांगले यश चांगुलपणाकडेच धावतं !