निरोगी शरीरसंपदा उदंड यशाचं उदंड आयुष्य देते | Yashacha Password (Part 86) - व्यायाम (Exercise) | Nitin Banugade Patil

यशाचा पासवर्ड (भाग :86) -व्यायाम (Exercise)

जे पुन्हा मिळवता येतं ते आपण कधीही मिळवू शकतो, पण जे शरीर एकदाच मिळतं ते प्राणपणाने जपायलाच हवं..!

पैसा कमावण्यासाठी माणसं प्रकृतीकडे दुर्लक्ष करून आरोग्य गमावतात आणि पुन्हा आरोग्य कमावण्यासाठी कमावलेला सारा पैसा गमावतात. मग साधतात काय? इतर साऱ्या गोष्टी करताना आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृतीचं संतुलन राखायला हवं. जसे आपण रोज जेवतो, झोपतो, पाणी पितो; तसाच रोज व्यायामही करायलाच हवा. शरीराला जितकी अन्नपाण्याची गरज असते तितकीच व्यायामाचीही आवश्यकता असते, आपलं शरीर आपल्याला मिळालेली अमूल्य भेट आहे. शरीराशिवाय आपल्याला अस्तित्वच नाही. पण तरीही त्याची हेळसांड केली जाते. आम्ही कपड्यांची काळजी घेतो, पण ते ज्याच्यासाठी आहेत, त्या शरीराची काळजी घेत नाही. आम्ही आमच्या गॉगलला जपतो, पण डोळ्यांना नाही. खरं तर डोळ्यांपेक्षा गॉगलची किंमत जास्त नसते, हे आपल्याला उमजायला हवं. उत्तम शरीरसंपदा असेल तर आपण गमावलेल्या साऱ्या गोष्टी परत मिळवू शकतो. पण गमावलेलं आरोग्य मात्र पुन्हा हवं तसं कमावता येत नाही..



बेफिकिरी आणि बेपर्वाईतून ज्यांनी आपल्या शरीराची हानी करून घेतली, ज्यांनी काही अवयव गमावले, त्यांना शरीराची किंमत विचारा. गेलेला अवयव परत नाही निर्माण करता येत. जे पुनः पुन्हा मिळवता येतं ते आपण कधीही मिळवू. पण जे शरीर एकदाच मिळतं, ते प्राणपणाने जपायलाच हवं. काहीजण सांगतात, विज्ञान, शरीरशास्त्र, वैद्यकीयशास्त्र आता इतकं पुढं गेलं आहे की, पैशाच्या बळावर मी माझं शरीर हवं तसं करू शकतो. एवढंच काय, अवयवाचं प्रत्यारोपणही करू शकतो. हे खरंही असलं तरी नवीन डोळा बसवायचा तर खर्च १०-२० लाख रुपये, किडनी बदलायचे ३० ४० लाख रुपये, हृदयाची रक्तवाहिनी बदलायची २-५ लाख रुपये. मग शरीराच्या साऱ्या अवयवांची किंमत काढली तर ? ती करताच येत नाही. पण अब्जावधी रुपयांच्या पुढे जाईल ती.

आम्ही आमच्या गाडीची किती व्यवस्थित काळजी घेतो. तिचं वेळेवर सर्व्हिसिंग, साफसफाई अगदी वेळ देऊन करून घेतो. त्याचप्रमाणे शरीरासाठी रोज थोडा वेळ द्याच. शरीराला हानीकारक असणाऱ्या गोष्टी टाळा. क्षणभर मिळणाऱ्या आनंदापेक्षा निरोगी शरीरसंपदेमुळे आयुष्यभर लाभणारा आनंद फार मोठा असतो. उत्तम आहार, उत्तम विहार, उत्तम व्यायाम याने नुसतं शरीरच मजबूत होत नाही; तर मनही मजबूत बनतं. शरीरात काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. उदंड नि अखंड काम करण्यासाठी ऊर्जा टिकून राहाते. निरोगी शरीरातच तल्लख बुद्धी असते.

स्वामी विवेकानंदांनी जेव्हा भारतभ्रमण केलं, तेव्हा त्यांना भारतीय लोकांमध्ये शारीरिक स्वास्थ्याचा, निरोगी शरीरसंपदेचा अभाव दिसून आला. भारतातील लोकांना प्रगती करायची असेल व या स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल, तर योग्य व्यायाम व आहार घेतला पाहिजे, असं प्रतिपादन करत ते म्हणाले, 'गीता वाचण्यापेक्षा मैदानावर फुटबॉल खेळा, जेव्हा तुमचं शरीर मजबूत होईल, तेव्हाच तुम्ही गीतेचा अर्थ चांगल्या प्रकारे समजू शकाल.'

भगतसिंग तुरुंगातही व्यायाम करत होते. तिथल्या जेलरने ते पाहिलं व तो हसत म्हणाला, आता व्यायाम करून काय उपयोग? तुला आता फासावर द्यायचं आहे ! तेव्हा भगतसिंग म्हणाले, 'मग काय झालं ? ही व्यायामाची ताकदच मला तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडेल !' भगतसिंग व्यायामाच्या बाबतीत इतके नियमित होते की, फाशीच्या दिवशीही त्यांनी व्यायाम केला.

व्यायामासाठी वेळ नाही किंवा आता वेळ निघून गेली, असं म्हणू नका.. वेळ कधीही जात नाही. हाती असलेल्या वेळेचा योग्य वापर केलात तर भरपूर वेळ उपलब्ध होतो. निरोगी शरीरसंपदा उदंड यशाचं उदंड आयुष्य देते.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने