नैतिक कथा - बुद्धी, विवेक आणि ज्ञान
एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे. आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे, त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दुःख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते.
प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता; मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते.
एके दिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खूश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली.
बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला, बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात.
बादशहा विचारात पडला, की आपण असे काय शिकवले? प्रधान परत बोलू लागला, महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात.
तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात.
परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात. प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.
तात्पर्य - ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मार्गाने वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो..