तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड करता यावर तुमची यशस्विता अवलंबून असते | Yashacha Password (Part 82) - पर्याय (Options) | Nitin Banugade Patil

 यशाचा पासवर्ड (भाग :82) -पर्याय (Options)

यश मिळवताच येतं, फक्त तुम्ही कोणता पर्याय निवडता यावर ते अवलंबून असतं..!

एक गृहस्थ एका हॉटेलमध्ये गेला. तिथे त्याला दोन बोर्ड दिसले. शाकाहारी विभाग… आणि मांसाहारी विभाग. तो दुसऱ्या बोर्डच्या दिशेने आत गेला. तेथे त्याला पुन्हा दोन बोर्ड दिसले. एकावर लिहिलं होतं, खाली बसण्यासाठी तर दुसऱ्यावर लिहिलं होतं खुर्चीवर बसण्यासाठी; त्याने खुर्चीवर बसून जेवण्याचा पर्याय निवडला. तो त्या दिशेने पुढे गेला. तिथे त्याला पुन्हा दोन बोर्ड दिसले. रोख विभाग ! आणि उधार विभाग ! त्याने विचार केला, पैसे देऊन जेवण्यापेक्षा उधार जेवावं. आपण परक्या गावचे, इथे कोण ओळखतो आपल्याला. कोण येणार पुन्हा पैसे मागायला? कशाला घालवा पैसे. जेवू की उधार! असं म्हणत तो उधार विभागाकडे वळला. चालत राहिला. अचानक त्याला पुढे एक बोर्ड दिसला त्यावर लिहिलं होतं-बाहेर जाण्याचा मार्ग !

Yashacha Password (Part 82) - पर्याय (Options) | Nitin Banugade Patil

खरं तर, प्रत्येक ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड करता यावर तुमची यशस्विता अवलंबून असते. प्रामाणिकता आणि इमानदारीचा पर्याय निवडलात तर त्यात कष्ट असतील, संघर्ष असेल, पण चिरंतन टिकणारं यशसुद्धा त्यातच असतं. याउलट, अप्रामाणिकतेचा आणि बेईमानीचा पर्याय निवडलात तर त्यात कष्ट नसतील, संघर्ष नसेल. क्षणभर डोळे दिपवून टाकणारं; आपल्याला हवंहवंसं वाटणारं यश लाभेलही. पण ते चिरकाल टिकणारं, आनंद देणारं नसेल. हा पर्याय अखेरीस अपयशाकडेच घेऊन जाईल.

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा.. जे जबाबदारी पाळत नाहीत, ते इतरांच्या भरोशाला पात्र राहात नाहीत. किंवा जे इतरांचा विश्वासघात करतात, त्यांचं यश अथवा नेतृत्व फार काळ टिकूच शकत नाही. इतरांच्या कामाचं, श्रमाचं श्रेय स्वतः घेण्याचा जो प्रयत्न करतो, त्याच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. स्वत:ची कीर्ती वाढवण्यासाठी, स्वतः ला मोठेपणा मिळवण्यासाठी अथवा स्वतःच्या स्वार्थापोटी माणसं बेईमानीचा अथवा अप्रामाणिकतेचा आसरा घेत स्वतः चं सत्त्व, तत्त्व नि नैतिकता विकून टाकतात. अशी माणसं मिळालेल्या फायद्यातून क्षणभर मोठी होतात. मात्र ती यशस्वी ठरत नाहीत. अशी माणसं अपकीर्ती आणि तिरस्काराचीच धनी होतात. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बेईमानी, हेच अपयशामागील सर्वात मोठं कारण असतं.

लोकांच्या मनांमध्ये तुमची प्रतिमा तुम्ही कशी घडवता, यावर तुमचं मोठेपण ठरत असतं. लोकांच्या स्मरणात तुम्ही कीर्तीनेही राहाता अन् अपकीर्तनेही ! नुसतं स्मरणात राहून उपयोग नाही. आठवण आली तर ती चांगुलपणाची, अलौकिकपणाचीच यायला हवी. कीर्ती हा यशाचा मूलभूत आधार आहे. कीर्तीच्या जोरावरच तुम्ही वर्चस्व गाजवू शकता. ती एकदा हातून निसटली तर मात्र शिल्लक काहीच राहात नाही. कीर्ती हा काळजीपूर्वक वाढवण्याचा, जतन करण्याचा मौल्यवान ठेवा आहे. त्यासाठी योग्य उद्दिष्ट ठरवून कष्ट करायला हवेत. औदार्य, प्रामाणिकता, सचोटी किंवा चातुर्य असा कुठलाही गुण ज्यामुळे तुम्ही असामान्य, असाधारण व्हाल, असं काही कमवायला हवं. मात्र चुकीची निवड तुमची विश्वासार्हता गमावून टाकते. तुम्ही लक्षात राहाता, मात्र तुम्ही लक्षातही राहायला नको, अशी इतरांची तुमच्याबद्दल भावना बनते.

गांधील माशी

एका गांधील माशीला 'मोठं' व्हायचं होतं. तिला लोकप्रियता हवी होती. त्यासाठी तिने ठरवून राजवाड्यात जाऊन राजाच्या छोट्या राजकुमाराचा कडकडून चावा घेतला. राजकुमार भयाण रडू लागला. राजवाडा त्याने डोक्यावर घेतला. सारा राजवाडा, राजा, दरबारी सारे त्याच्याकडे धावले. माशीने पुन्हा त्याचा चावा घेतला. माणसं संतापली. गांधील माशीच्या मागे लागली. तिने मग प्रत्येकाला चावण्याचा सपाटा लावला. बातमी वान्यासारखी पसरली. साऱ्या जनतेने बघता-बघता राजवाड्याला गराडा घातला. सारे व्यवहार ठप्प झाले. साऱ्यांच्या ओठी फक्त गांधील माशी..! गांधील माशी म्हणाली, आज मी मोठी झाले…!!

त्याचवेळी मोठेपणात मश्गूल असलेल्या गांधील माशीच्या पाठीवर तडाखा बसला. गांधील माशी आणि तिचा मोठेपणा तिथेच संपला! 'मोठं' होता येतं, 'यश' मिळवता येतं. फक्त तुम्ही कोणता पर्याय निवडता, यावर ते अवलंबून असतं !

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने