शिष्टाचार एवढा महत्त्वाचा ठरतो की तो आपला जीवही वाचवू शकतो ! | Yashacha Password (Part 81) - सौजन्य (Courtesy) | Nitin Banugade Patil

यशाचा पासवर्ड (भाग :81) - सौजन्य(Courtesy)

तुम्ही दुसऱ्याला दिलेला मोठेपणा तुमचं मोठेपण वाढवत असतो..!


कामाची वेळ संपत आली तसे बर्फाच्या कंपनीत काम करणारे सारे कामगार घरी जाण्याची तयारी करू लागले. तेवढ्यात अचानक कंपनीच्या एका यंत्रामध्ये थोडा बिघाड झाला. तो तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी असलेला कामगार लगेच तिकडे धावला. दुरुस्तीचं काम करता करता खूप उशीर झाला. तोपर्यंत सारे कामगार निघून गेले होते. कंपनीचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता दिवेसुद्धा बंद केले गेले. त्यावेळी या कामगाराच्या लक्षात आलं की, आपण आत अडकलो गेलो आहोत. आता सकाळी जेव्हा दरवाजे उघडतील तेव्हाच सुटका ! तो नखशिखान्त हादरला. बर्फाच्या कंपनीत रात्र घालवणं सोपं नव्हतं. बर्फाच्या त्या थंडीने जीवाला धोका होता. त्या कामगाराला काही सुचेना. तो सैरभैर झाला.

Security Guard Respect | Nitin Banugade Patil

पण अचानक चमत्कार झाला. कोणीतरी दरवाजा उघडला. त्याने समोर पाहिलं, तर कंपनीचा सुरक्षारक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने काम गाराला बाहेर काढलं. गारठलेल्या कामगाराचा जीव बचावला. न राहवून कामगाराने सुरक्षारक्षकाला विचारलं, मी आत अडकलोय हे तुम्हाला कळलं कसं ?

तेव्हा सुरक्षारक्षक म्हणाला, 'रोज कंपनीत अनेक कामगार येतात नि जातात. पण त्यात तुम्ही एकटेच असे आहात की, तुम्ही रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम करता. आज सारे कामगार गेले. पण सवयीने माझ्या कानावर पडणारा राम राम ऐकला नाही. म्हणून शंका आली आणि मी आत पाहायला आलो. माझी शंका खरी ठरली.'

कामगाराला आश्चर्य वाटलं. आपण दिलेला एवढासा सन्मान, आपण दाखवलेलं सौजन्य... आणि पाळत असलेला शिष्टाचार एवढा महत्त्वाचा ठरतो की तो आपला जीवही वाचवू शकतो !

सौजन्य म्हणजे दुसऱ्याची कदर करून वागणं. तुम्ही दुसऱ्यांना मान दिलात, थोडासा सन्मान दिलात, तर तो माणूस तुमचं कोणतंही काम झटकन करून देतो. दुसऱ्याला दिलेला मोठेपणा तुमचं मोठेपण वाढवत असतो. सौजन्यशील माणसं मोठी होतात. मात्र सौजन्याअभावी मोठी माणसंही छोटी आणि थिटी ठरतात. अंगी फारसे गुण नसलेली माणसं निव्वळ सौजन्यशील वागण्यामुळे पुढे निघून जातात; तर अंगी सारे गुण असूनसुद्धा असभ्य वागण्यामुळे माणसं मागे पडतात.

सौजन्य म्हणजेच नम्रता ! सौजन्य म्हणजेच सभ्यता ! तुमचं वागणंच तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमची लोकमानसातील उंची घडवत असतं. अंगी रुजलेलं नैतिक वर्तन हेच सौजन्याचं प्रकट रूप असतं. मी त्याला किंमत का देऊ? असं म्हणण्यानं त्याचं फारसं नुकसान होत नाही. आपलं मात्र नुकसान नक्कीच होतं. सौजन्याने माणसं कमावता येतात. सौजन्याअभावी मात्र ती गमावली जातात.

सौजन्यपूर्ण वागण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही किंवा त्यासाठी काही खर्चही करावा लागत नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून, वर्तनातून सौजन्य सहजपणे व्यक्त करता येतं. एखादं स्मितहास्य, आभाराचा एखादा शब्दही त्यासाठी पुरेसा असतो. ही अत्यंत छोटी गुंतवणूक असते. त्याचे फायदे मात्र प्रचंड असतात. आपल्या स्मितहास्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. त्याच्या या आनंदाचे आपण कारण ठरतो हा आनंद फार मोठा असतो.

कोरड्या शिष्टाचाराने समाधान लाभत नाही. मनापासून आलेल्या सौजन्यातून प्रेम आणि आपलेपणा निर्माण होतो. सौजन्य इतरांच्या भावनांना जपण्याची वृत्ती निर्माण करतं. ती वृत्ती आपली संवेदनक्षमता प्रकट करत असते. सौजन्यातूनच तुमचे संस्कार प्रकट होत असतात.

असभ्य, उद्धट वागणुकीने माणसं तिरस्काराचे धनी होतात. ती नकोशी वाटतात; तर सौजन्यशील माणसं साऱ्यांनाच हवीहवीशी वाटतात. सौजन्यशीलता, नम्रता, सभ्यता ही सुसंस्कृतपणाची लक्षणं आहेत आणि यश नेहमी अशा सुसंस्कृतपणाकडेच धावत असतं !

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने