आतल्या शत्रूचा पराभव करा, बाहेरचं जग मग सहज जिंकता येतं | Yashacha Password (Part 80) - अडथळे (Obstacles) | Nitin Banugade Patil

 यशाचा पासवर्ड (भाग :80) -अडथळे (Obstacles)


तुम्हाला अपयशी करण्यासाठी अडथळे तुमच्यासमोर येत नाहीत ते येतात तुमच्या यशाची उंची वाढवण्यासाठी..!

प्रत्येकाची स्वप्नं असतात. प्रत्येकालाच काही ना काही करण्याच्या, बनण्याच्या कल्पना सुचतात. जे स्वप्नांचा पाठलाग करतात, जे कल्पना कृतीत उतरवण्याच्या प्रयत्नात राहातात, ते यशस्वी होतात. अयशस्वी ते स्वप्नं, कल्पना कृतीत उतरवणं नाकारतात.

एडमंड हिलरी
एडमंड हिलरी


एडमंड हिलरी माऊंट एव्हरेस्ट या अत्युच्च शिखरावर पोहोचणारा पहिला माणूस ! त्याला विचारलं, माऊंट एव्हरेस्ट सर करताना आपल्याला कोणत्या सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड द्यावं लागलं ? तो म्हणाला, 'मला स्वतःला! मी स्वतःच सर्वात मोठा अडथळा होतो. मनात निर्माण होणारी नकारात्मकता आणि प्रयत्नापासून स्वतःला परावृत्त न होऊ देणं, हेच अडथळे मोठे असतात. आडवा येणारा पर्वत हे आपलं संकट कधी नसतं. पर्वतावर चढण्याचा प्रयत्नच न करता आपण पर्वत बनून राहाणं हा सर्वात मोठा अडथळा! मी यशस्वी झालो ते तो पर्वत चढलो म्हणून नाही; तर मी स्वतः पर्वत बनून राहिलो नाही म्हणून! मी माऊंट एव्हरेस्टवर विजय मिळवला नाही; मी स्वतःवर विजय मिळवला म्हणून जिंकलो!'

मी अमुक एक करूच शकत नाही, या विचाराला गाडून टाकलं, तर तुम्ही काहीही करू शकता. आपला शत्रू बाहेर कधीच नसतो; तो आपल्यातच आत असतो. या आतल्या शत्रूचा पराभव करा; बाहेरचं जग मग सहज जिंकता येतं.

एखादी छोटीसी स्वप्नपूर्ती, एखादी कल्पना कृतीत उतरत गेली, की आपोआप अनुभवात भर पडते. आत्मविश्वासात भर पडते. व्यक्तिमत्त्व भर पडते. आपणच आपल्याला सांगू लागतो, मी हे करू शकलो तर आता आणखीही काही करू शकेन. स्वतःवरच्या या विश्वासातून, स्वतःच्या सकारात्मक प्रतिमेतून मग अशक्य तेही शक्य करणं सहज जमून जातं. स्वतः ला मागे ओढण्यापेक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. यश सहज मिळून जातं. आपण स्वतःला जिंकण्यासाठी सिद्ध करत असताना काही संकुचित विचाराची नकारात्मक माणसं अडथळे आणण्याचे प्रयत्न करतच असतात. तू हे करू शकणार नाहीस. ते अशक्यच आहे. हा वेडेपणा आहे. तू फुकट वेळ घालवतोयस. ते कधीच यशस्वी होणार नाही. तू अजून लहान आहेस. तुला अनुभव नाही. कशाला यात धडपडतोस? असे नकारात्मक शब्द या लोकांच्या ओठांवर सतत असतात. अशा लोकांमध्ये मिसळणं, अशांशी मैत्री वाढवणं, अशा लोकांच्या संगतीत राहाणं म्हणजे स्वतःची वाढ थांबवणं! माणसं दोन प्रकारची असतात. काही देणारे असतात; तर काही घेणारे असतात. तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, यावर तुमचं यश-अपयश ठरतं. देणारे तुम्हाला स्वप्न देतात. तुमच्या कल्पनांत भर घालतात. तुमच्या प्रयत्नांना ताकद देत पुढे नेतात. तुम्हाला सकारात्मक बनवतात. तर घेणारे तुमच्या प्रयत्नांना खीळ घालून तुमची स्वप्नंच काढून घेतात. नकारात्मक करत नाऊमेद करून टाकतात. तुम्ही अमुक एक करू शकता, हा तुमचा विश्वास ते हिरावून घेतात.

सर्वात मोठे धोकादायक ते नव्हेत, जे शस्त्र घेऊन अंगावर येतात. सर्वात धोकादायक ते जे नकारात्मक शब्द घेऊन तुमच्यापुढे पोहोचतात. डोक्याला बंदुकीची नळी लावणारे घातक नव्हेत. तू हे करूच शकणार नाहीस, हा विचार तुमच्या डोक्यात घालणारे घातक असतात.

तुमचा विश्वास पळवणारे सोबत घेण्यापेक्षा विश्वास वाढवणारे सोबत घ्या. तुम्ही काहीही करू शकता. इतरांपेक्षा तुम्ही स्वतःला अधिक ओळखता. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रयत्न सोडू नका. लढत राहा. यश पुढेच आहे!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने