यशाचा पासवर्ड (भाग :84) -राग(Anger)
विधायकतेसाठी रागवावं आणि रागाचं रुपांतर विधायक गोष्टीत करावं हाच यशाचा मार्ग..!
माणसांना राग दोन कारणांनी येतो. बाह्य आणि आंतरिक. बऱ्याचदा माणूस आतून अस्वस्थ असतो. त्याचा राग तो दुसऱ्यावर काढतो. तर कुणीतरी आपल्या मनासारखं वागलं नाही किंवा आपल्या मनासारखं झालं नाही म्हणूनही राग येतो. रागापाठीमागे अहंकार हे महत्त्वाचं कारण असतं. दुसऱ्यापुढे नमतं घ्यायला, क्षमा मागायला आपण अजिबात तयार नसतो. वास्तविक, चुकलं तर क्षमा मागणं आणि एखादा-दुसरा चुकला असेल, तर त्याला क्षमा करणं, हे संबंध दृढ करण्याचे, नातं जपण्याचे, सौहार्दाचं वातावरण निर्मून पुढे जाण्याचे उत्तम मार्ग! पण माणसं हेच मार्ग बंद करून टाकतात आणि अपयशाचे धनी होतात.
आपल्यावर कोणी अन्याय करत असल्यास त्याचा प्रतिकार आपण करायला हवा. एखादं चुकीचं घडत असल्यास तेथे राग व्यक्त व्हायलाच हवा. पण आपल्याकडून तसं होतं का? जिथे अन्याय होतो, तिथे गप्प राहायचं नि जे जवळचे, त्यांच्यावर रागाने तुटून पडायचं, याने काय साधतं ?एक लाकूडतोड्या झाड तोडत होता, तेव्हा झाडाने कुऱ्हाडीच्या दांड्यांला विचारलं, अरे, लाकूडतोड्या माझा शत्रूच आहे, पण तू तर माझ्याच लाकडाचा म्हणजे माझ्याच शरीराचा भाग आहेस. तरीसुद्धा तू लाकूडतोड्याला मला मारण्यासाठी मदत का करीत आहेस खरं तर, राग कुठे व्यक्त करावा नि कसा करावा याचंही भान असणं अत्यंत गरजेचं असतं. जवळची माणसं रागाने नव्हे; प्रेमाने जपून ठेवता येतात. त्यांच्याशी भांडून आपल्या अहंकाराला कुरवाळत आपण आपल्याच सहकाऱ्यांचे हात छाटत असतो. एखाद्याच्या चुकीवर रागाने सामोरं जाण्यापेक्षा त्याच्या दोषांकडे सहानुभूतीने पाहा. त्याचे दोष दूर होऊ शकतात. त्यासाठी त्याला समजून घेऊन मार्गदर्शन करा. तुम्ही रागावता तेव्हा इतर लोक नमते होतात, याचा अर्थ ते तुमचं नेतृत्व मानतात असा नव्हे. तर या रागाच्या वेळी आपण शांत राहाणंच योग्य, हे त्यांना कळतं म्हणून! खरं तर जबरदस्तीने लादलेलं नेतृत्व कधीच यशस्वी होत नाही. नेतृत्व हे जिव्हाळ्याने, समजून घेण्याने, रागाने नव्हे तर कौतुकाने निर्माण करता येतं.
माणसं सातत्याने रागावतात याचं कारण त्यांच्यात साठलेली अतिरिक्त ऊर्जा असते. ही ऊर्जा बाहेर पडण्यास दुसरं माध्यम नसतं. तेव्हा ती रागातून प्रकट होते. अशा व्यक्तींनी स्वतःस काही छंद लावून घेतले, काही कृतिशील कार्यक्रमात स्वतःला गुंतवून घेतलं, तर ही अतिरिक्त ऊर्जा तिकडे रूपांतरित होईल. साहजिकच, तुमची राग-राग करण्याची वृत्ती कमी होऊन जाईल. आगकाडी पाण्यात टाकली तर विझेल. मात्र पेट्रोलमध्ये टाकली तर भडका उडेल. तुम्ही पाणी व्हायचं की पेट्रोल... हे तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्हाला बाहेरून कुणीही क्रोधिष्ट बनवू शकत नाही, बनवत असता ते फक्त तुम्हीच !
रागावणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याचं, मानसिक तसंच बौद्धिक शक्तीचं नुकसान करून घेणं. निरोगी प्रकृतीची धडधाकट असणारी आरोग्यशील माणसं फारशी रागावताना दिसत नाहीत. खरं तर, ती रागवत नाहीत म्हणूनच आरोग्यशील असतात. रागावण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा, ती शक्ती शांतपणे यशाकडे नेणाऱ्या योग्य कृतीत खर्च केली, तर त्याचे परिणाम उत्तम होतात. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे यशाकडे नेणारं सर्वोत्तम सूत्र आहे.
इतरांवर रागावणं सोडा आणि तुमच्यावर कुणी रागावलं तर तेही सोडून द्या. त्यातून जे हिताचं तेवढं फक्त स्वीकारा. उनाडपणा करणारा भूषण जेवायला बसल्यावर त्याने त्याच्या वहिनीकडे मीठ मागितलं. तशी वहिनी रागाने म्हणाली, मीठ मागताय. पण मीठ कमवायची तरी अक्कल आहे का? हे ऐकताच भूषण रागाने ताटावरून उठला. त्याने घर सोडलं. प्रचंड कष्ट केले, अपार मेहनत घेतली. अन् हाच भूषण पुढे कवि भूषण म्हणून भारतात नावारूपाला आला.शिवरायांवर त्याने 'शिवभूषण' लिहिलं. महाराजांनी त्याचा गौरव केला.
विधायकतेसाठी रागवावं अन् रागाचं रूपांतर विधायक गोष्टीत करावं, हाच यशाचा मार्ग !