हरलेल्या सस्याची गोष्ट | Yashacha Password (Part 83) - संघटन (Organization) | Nitin Banugade Patil

 यशाचा पासवर्ड (भाग :83) -संघटन (Organization)

एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर साऱ्यांनाच विजयी होता येतं..!

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकलं. पण सशाला शांत बसवेना. आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं. पराभवाचा हा सल संपवण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशा चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यंत जिंकला. हळू चालणारं कासव हरलं.

ससा आणि कासव | Nitin Banugade Patil


पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं, 'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू!' ससा हसला आणि म्हणाला, 'एकदा माझ्या चुकीमुळे हरलो.

पुनः पुन्हा मी ती चूक कशी करेन? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत!' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार!' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धीम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला.

शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली. ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं. पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबून राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलंही. शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतः च्या बुद्धिक्षमतेने मात दिली.

हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं. तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला म्हणाला, 'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची. आजपासून एक करायचं, जिथे जमीन असेल, तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल, तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असेच पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू!'

प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहीना काही गुण असतोच. जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकतं. जे इतरांकडे नाही, ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो. सर्वोत्तम यश गाठता येतं.

एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !

उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते. पण कल्पना सत्यात उतरवणारी कृतीक्षमता नसते. काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहीकडे संघटनक्षमता असते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच विकट रणांगणही जिंकणे!

यश मिळवायचे असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं! संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखं पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहाणं टाळलं पाहिजे. याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा.. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या. नव्याने मैत्री करा. युती करा. साऱ्यांच्या संपर्काति राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे उत्तम ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने