उत्तम संभाषण कौशल्य असणारी माणसं मैत्रेय आणि लोकप्रिय असतात..! | Yashacha Password (Part 85) - संभाषण (Conversation) | Nitin Banugade Patil


यशाचा पासवर्ड (भाग :85) -
संभाषण (Conversation)

उत्तम संभाषण कौशल्य असणारी माणसं मैत्रेय आणि लोकप्रिय असतात..!

एकमेकांतला संवाद हा विसंवाद होण्यापेक्षा सुसंवाद होण्यासाठी संभाषण कौशल्याची गरज असते. संभाषण कौशल्याने एकमेकातले संबंध उत्तम रीतीने दृढ करता येतात. एकमेकांचे विचार उत्तम रीतीने एकमेकांपर्यंत पोहोचवता येतात. मात्र संभाषण कौशल्याअभावी विचारच न कळणं अथवा न जुळणं त्यामुळे कृतिशीलतेमध्ये प्रचंड अडथळे येणं असे प्रकार उद्भवतात, जे अपयशाकडे नेतात.

| Yashacha Password (Part 85) - संभाषण (Conversation) | Nitin Banugade Patil


संभाषणात सुसूत्रता अत्यंत महत्त्वाची असते. वस्तू जागच्या जागी ठेवायची ज्याला सवय नसते, त्याची ऐनवेळी वस्तू शोधताना मोठी तारांबळ उडते. नेमकं तसंच सुसूत्र नसलेल्या संभाषणाबाबत घडतं. अशा संभाषणातून नुसताच गोंधळ उडतो. असं संभाषण काहीच परिणाम साधत नाही. याउलट स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणं अत्यंत प्रभावकारी ठरतं. विचारांची स्पष्टता आणि परिपूर्ण ज्ञान हे संभाषणाला उत्तमता प्रदान करतं. ज्या विषयांचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान नाही किंवा विचार स्पष्ट नाही, अशा विषयांवरचं संभाषण मुळात टाळावं. संभाषण अयशस्वी होतं याचं कारण इतरांना कमी लेखणं अथवा स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणं. ज्याच्या मनात न्यूनगंडाची भावना असते, तो आपले विचारच प्रकट करू शकत नाही किंवा इतरांना तुच्छ लेखण्याची सवय असल्याने त्याचे विचारच ऐकून घेतले जात नाहीत. ज्याची स्वतःकडे किंवा इतरांकडे अथवा जीवनाकडे बघण्याची वृत्ती नकारात्मक असते, त्याचं संभाषणही नकारात्मकच घडतं. तेथे काही सकारात्मक घडण्याची सुतराम शक्यता नसते. समोरच्याचं नीट ऐकून न घेता सारखं मधे मधे बोलणे अथवा बोलण्याकडे लक्षच न देणे, यातून संभाषण अयशस्वी ठरतं. त्यातून नुसतेच वादविवाद उभे राहातात.

उत्तम संभाषणासाठी वादविवाद टाळायला हवेत. वादविवादात भले आपण जिंकतो, पण समोरचा मात्र हरल्यामुळे आपला शत्रू होऊन जातो. संबंध बिघडतात आणि सहकार्याचे, मैत्रीचे हात कमी होतात. वादविवादात पडण्यापेक्षा दुसऱ्यांच्या मताबद्दल आदर दाखवा. चुकीच्या बाबी कठोर शब्दांऐवजी सौम्य शब्दांत मांडा. स्वतः कमी बोलून इतरांचं ऐकून घ्या. तुमच्या देहबोलीबद्दल जागरूक राहा. त्यामुळे बोलण्यातला आत्मविश्वास प्रकट होतो. सल्ला, आदेश किंवा आव्हान देण्याऐवजी खुलेपणाने सौहार्दाने बोला. समोरच्याच्या चुका काढण्यापेक्षा त्याच्या गुणांचं कौतुक करा. तुमचा विचार त्याला पटवून देऊन कृतीसाठी त्याला प्रोत्साहित करा. उत्तम संभाषण माणसाला कृतीप्रवण बनवतं तर अयोग्य संभाषण अकार्यक्षम करतं.

उत्तम संभाषण कौशल्याच्या माध्यमातून विचारांचं आदानप्रदान करता येतं. आचारांचं दान देता घेता येतं. संभाषणचतुर माणूस जिथे कुठे जाईल तिथे आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा उमटवीत असतो. तो २० लोकांशी संभाषण करतो, पण १०० टक्के फायदा मिळवतो. मात्र संभाषणात चतुर नसलेला माणूस १०० लोकांशी संभाषण करून २० टक्के फायदाही मिळवत नसतो. संभाषण कौशल्य मिळवता येतं, ते जाणीवपूर्वक घडवता येतं. संभाषण कौशल्य हे संपन्न व्यक्तिमत्त्वाचं महत्त्वाचं अंग आहे.

नुसतंच संभाषण कौशल्य असूनही चालत नाही. ते कुणाशी करावं व कसं करावं हेही उमजणं महत्त्वाचं असतं. ज्यांच्यासोबत अनेकदा वाद झालेत, त्यांच्याशीच परत परत संभाषण साधून वाद घालून आपली शक्ती वाया घालवण्यात अर्थ नसतो. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यापेक्षा नव्या, समविचारी, समजून घेणाऱ्या किंवा ज्यांच्याकडून काही कृतिशील चांगलं घडू शकतं, अशांशीच संवाद साधावा. फालतू गप्पा, वायफळ चर्चा, टिंगलटवाळी, टीका असं निरर्थक संभाषण टाळावंच. ज्या संभाषणातून दुसऱ्याचं मन आणि मतपरिवर्तन घडतं, ते खरं संभाषण !

उत्तम संभाषण कौशल्य असणारी माणसं मैत्रेय आणि लोकप्रिय असतात. संभाषणचातुर्याच्या बळावर कोणत्याही परिस्थितीला आणि आक्रमक माणसांनाही ते आपल्याकडे वळवू शकतात. हवं ते लोकबळ ते मिळवू शकतात. निखळ संभाषण निव्वळ आनंद देतो. तोच यशाकडे नेतो !


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने