यश मिळवायचं तर स्वप्नं बघण्याचं धाडस हव नि जिंकण्याचं धैर्यही हवं! | Yashacha Password (Part 79) - स्वप्नं (Dreams) | Nitin Banugade Patil

यशाचा पासवर्ड (भाग :79) -स्वप्नं (Dreams)


स्वप्न पूर्ण न होणं ही शोकांतिका नव्हे, तर पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे स्वप्नच नसणं ही सर्वात मोठी शोकांतिका..!

अशक्य गोष्ट अशक्य तोपर्यंतच असते, जोपर्यंत ती शक्य होत नाही. ती शक्य झाली की तिचाच विक्रम होतो आणि एक विक्रम झाला की, तो मोडण्यासाठी पुढचा विक्रम. तो मोडण्यासाठी पुन्हा पुढचा विक्रम. मग पहिला विक्रम जो कधी अशक्य वाटत असतो, तो अगदी सहजसाध्य होऊन जातो. अशक्य साध्य करायचं असेल, तर प्रथम अशक्य स्वप्न पाहिली पाहिजेत. 

 

Dreams | Yashacha Password (Part 79) - स्वप्नं (Dreams) | Nitin Banugade Patil

स्वप्नंच माणसाला काही करण्याची प्रेरणा देतात. स्वप्न कल्पनांचं बीज पेरतात. स्वप्नंच कारण देतात. कृती करण्यासाठी प्रवृत्त करतात. जे स्वप्नं बघतात ते ती पूर्ण करू शकतातच. असं स्वप्न कधी पडतच नाही जे पूर्ण होणार नाही. नुसतं स्वप्नरंजन करून नव्हे तर त्या स्वप्नांवर विश्वास ठेवून त्याचा पाठपुरावा करायला हवा. स्वप्न पूर्ण न होणं ही शोकांतिका नव्हे; तर पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे स्वप्नच नसणं ही मोठी शोकांतिका असते.

काही अत्यंत संकुचित, किरकोळ स्वप्न समोर ठेवतात. छोटे संकल्प करतात. त्यांचा खरं तर स्वतःच्या क्षमतांवरच विश्वास नसतो. अपयश तुम्हाला मागे खेचत नाही. तुमची अल्पसंतुष्टताच तुम्हाला पुढे नेत नाही. मोठी स्वप्नं पाहा. स्वप्नं अविश्वसनीय असतील, तर यशही अविश्वसनीय असेल. जेवढी तुमची स्वप्नं मोठी तेवढंच यश मोठं असतं. सर्वच यशस्वी लोकांत एक समान गुण आढळतो. तो म्हणजे, त्यांची स्वप्नं बघायची क्षमता! साच्या महान लोकांच्या स्वप्नांतही दूरदृष्टी होती. दूरदृष्टी नसलेली माणसं लवकर विनाश पावतात. तर दूरदृष्टी असणारी माणसं या जगात अशक्य काही नाही हा संदेश देत पिढ्यानपिढ्या स्वप्नं पाहाण्याची प्रेरणा देत चिरंतन राहातात.

स्वप्न माणसाला निर्मितीक्षम बनवतात. स्वप्नंच तुमच्या यशाचं बीज असतात. या बीजाला दररोज पाणी घाला. स्वप्न सत्यात उतरेल. यश दारात अवतरेल. तुम्ही पेरूचं बीज लावलंत तर पेरूचं झाड उगवेल. तुम्ही आंब्याचं बीज लावलंत तर आंबा येईल. तसं तुमचं स्वप्न कसं आहे यावर यश ठरेल. काहींची स्वप्नं रोज बदलतात. रोज वेगवेगळी स्वप्नं त्यांना पडतात. कधी चांगली; तर कधी वाईट. या स्वप्नगोंधळाचा यशासाठी काही उपयोग होत नसतो. दुसरी स्वप्नं ही 'दिवास्वप्नं' असतात. माणसं जागी असली तरी ती या स्वप्नात नुसती वाहवत जातात. जेव्हा शरीर एका ठिकाणी अन् मन दुसऱ्या ठिकाणी असतं तेव्हा काही मिळणं आणि मिळवणं फार कठीण दिवास्वप्नात नेमकं हेच होतं.

'यश' ती स्वप्नं देतात ज्या स्वप्नांमध्ये कल्पना करण्याचं सामर्थ्य असतं. मोबाइल, विमान, टीव्ही अशा अनेक गोष्टी हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हत्या. पण आज आहेत. याचं कारण कुणाला तरी सुचलेली कल्पना जी त्यांना त्यांच्या स्वप्नांतून मिळाली होती. स्वप्नं हीच माणसाला मिळालेली महान देणगी आहे. जिने जग घडवणाऱ्या अशा अनेक देणग्या दिल्या. स्वप्नांशिवाय जगणं म्हणजे पंख तुटलेल्या पक्ष्यासारखं जगणं. जिथं उंच उडणं घडूच शकत नाही. स्वप्नांशिवाय जगणं म्हणजे जगणं नव्हेच. जगात नाउमेद, निराश माणसं ती असतात, ज्यांनी स्वप्नं पाहाणं सोडून दिलंय. जी स्वप्नं पाहातात ती निराश कधीच नसतात. ती सातत्याने आशावादी राहातात.

भूतकाळाची उजळणी करणारी स्वप्नं पाहू नका. भविष्यकाळाची रेखाटनं करणारी स्वप्नं पाहा. ती आयुष्य सुंदर करतील. स्वप्नं आभाळातून टपकत नाहीत. आपल्या मनाची आकांक्षाची ती निर्मिती असते. झोपेत पडतील ती स्वप्नं नव्हेत. झोप उडवतील ती खरी स्वप्नं! ही स्वप्नं तुम्ही स्वीकारता, वाढू देता, सोडून देता की मारून टाकता यावर तुमचं यश अवलंबून असतं. आत्मविश्वास, निश्चय आणि चिकाटी यावर कुठलंही स्वप्न सत्यात उतरवता येतं. यश मिळवायचं तर स्वप्नं बघण्याचं धाडस हव नि जिंकण्याचं धैर्यही हवं!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने