यशाचा पासवर्ड (भाग :78) -कृती(Action)
यशाच्या दारातून आत जायचं की दारातच ताटकळत बसायचं हे दाराच्या नव्हे तुमच्या कृतीवर अवलंबून असतं..!
एक माणूस किनाऱ्यावर उभा होता. समुद्रातून अनेक बोटी येत-जात होत्या. तो प्रत्येक बोटीकडे पाहात होता. जवळजवळ दिवसभर तो तसाच उभा होता. संध्याकाळी बोटी बंद होत आल्या. हालचाल मंदावली, तेव्हा दिवसभर वोट चालवणाऱ्या माणसाने त्याला विचारलं, अरे, मी दिवसभर पाहातोय, तू किनाऱ्यावरच उभा आहेस. तुझं कुणी येणार आहे का ?
तेव्हा तो म्हणाला, कुणी येणार नाही. मलाच पलीकडे जायचं आहे. तसा तो नाविक म्हणाला, अरे, मग दिवसभर बोटी येताहेत-जाताहेत. तू एकदाही सांगितलं का नाहीस?
तो म्हणाला, अहो, मला कुणी विचारलंच नाही. नाविक हसत म्हणाला, वेड्या, जायचं तुला आहे; सांगायला तू हवंस. सांगितलं नाहीस तर आयुष्यभर असाच उभा राहशील! यशाच्या बोटीचंही तसंच आहे. ती बोट आपल्याकडे स्वतःहून येत नाही, आपल्यालाच तिच्याकडे जावं लागतं, आपली ध्येयं, आपली स्वप्नं पूर्णत्वास जावी म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला मदतीची, सहकार्याची गरज असते. अशी मदत करणारी व्यक्तीही जवळपासच असते. पण बरेच लोक विचारतच नाहीत. काहींच्यात अनाठायी अभिमान वा ताठा असतो. त्यामुळे ते कुणाचीही मदत घेणं नाकारतात किंवा काहींना आपल्याला नकार मिळाला तर, याचीच भीती जास्त असते. खरं तर आजूबाजूला असे असंख्य लोक असतात जे केव्हाही मदत करायला तयार असतात. पण त्यांना कुणी सहकार्य कराल का? विचारतच नाही.
एका तरुणाने एक उद्योग सुरू केला. त्याच्या कारखान्याला काम मिळवण्यासाठी तो एका प्रचंड मोठ्या कंपनीच्या मालकाकडे गेला. त्याचा कारखाना नवीन होता. अजून कुठल्या मोठ्या कामाचा अनुभव नव्हता. पण त्याने विचार केला, काम मिळालं आणि केलं तरच अनुभव येईल ना ? आणि विचारायला काय हरकत आहे, विचारण्यात नुकसान तर काहीच नाही. पण काम मिळवायचं असेल तर विचारायला हवंच. अखेर त्याने धाडसाने त्या मोठ्या कंपनीच्या मालकाला कामाबद्दल विचारलंच. आणि चक्क त्या मालकाने 'हो' म्हटलं देखील. तो मालक म्हणाला, तू विचारलंस यातच मला तुझी इच्छाशक्ती दिसली. पाऊल पुढे टाकण्याची कृती दिसली. तू हे काम नक्कीच करशील. कारण इच्छाशक्ती आणि कृती यांच्या जोरावरच यशस्वी होता येतं !
तुम्हाला काही मिळवण्याची इच्छा असेल, तर तुमची ते मागण्याची इच्छाही असली पाहिजे. माणसं कुणावर तरी प्रचंड प्रेम करतात. पण प्रेम यशस्वी ती होतात, जी प्रियकर अथवा प्रेयसीला थेट विचारण्याची हिंमत ठेवतात. आजूबाजूला असे अनेक दिल के टुकडे दिसतील, जे प्रेमात अयशस्वी ठरलेत. यात नकार मिळाला म्हणून नव्हे, तर विचारलंच नाही म्हणून अयशस्वी झाल्याची उदाहरणं अनेक भेटतील.
खरं तर, सांगा म्हणजे कळेल... मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल. ठोठवा म्हणजे उघडेल. हे जीवन नियम आहेत. तुम्ही सांगितलं विचारलं नाही तर तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मागितलंच नाही तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडणार नाही आणि तुम्ही यशाचं दार ठोठावलंच नाही, तर ते उघडणारच नाही.
तुम्ही विचारता याचा अर्थ, तुम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला माहीत असते. मागता याचा अर्थ, ते मिळवण्याची तुमची इच्छा असते. शोधणं म्हणजे तुमची कृती करण्याची तयारी असते आणि ठोठावणं म्हणजे प्रत्यक्ष कृती करणं आणि कृती करणं म्हणजे ते मिळवणंच !
तुम्ही न विचारणं म्हणजे तुम्हाला काय हवं आहे तेच माहीत नसणं, न मागणं म्हणजे तुम्हाला हवं आहे की नको याबद्दल तुमच्या मनात संभ्रम असणं, न शोधणं म्हणजे तुमची कृती करण्याची तयारी नसणं याचाच अर्थ ते तुम्हाला नको आहे, हेच मान्य करणं म्हणजे दार न ठोठावणं!
यशाच्या दारातून आत जायचं की दारातच ताटकळत बसायचं, हे दाराच्या नव्हे; तुमच्या कृतीवर अवलंबून असतं. विचारा-कृती करा... विचारून कृती करून फारसं नुकसान होत नाही. मात्र विचारलंच नाहीत, कृतीच केली नाहीत, तर मिळणार काहीच नाही. मिळवणारे व्हा..!