यशाचा पासवर्ड (भाग :77) -श्रध्दा
ज्यांची स्वत:वर आणि स्वतःच्या क्षमतेवर श्रध्दा असते तीच माणसं यशस्वी होतात..!
माणसं स्वप्नं पाहातात. स्वप्नांच्या पूर्तीसाठी धडपडत राहातात. त्यासाठी जे काही करावं लागतं ते सारं करत राहातात. ही काही मिळवण्याची 'आशा' एक समृद्ध भावप्रवृत्ती तयार करते, जी माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहाते. बळ पुरवते. कोणत्याही संकटाशी लढण्याचं सामर्थ्य देते. ही भावप्रवृत्ती म्हणजे 'श्रद्धा.
श्रद्धा म्हणजे पुराव्याशिवायचा विश्वास. जी गोष्ट आता अस्तित्वात नाही. मात्र ती अस्तित्वात येऊ शकते, या विश्वासावर अवलंबून पाऊल पुढे टाकण्याची केलेली कृती!
रविंद्रनाथ टागोर श्रद्धेची व्याख्या करताना लिहितात, 'पहाटेच्या काळोखात प्रकाशाची चाहूल घेणारा आणि आनंदाच्या भरात प्रकाशपूजन करणारा, मधूर कूजन करणारा संवेदनाक्षम पक्षी म्हणजे श्रद्धा ! प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा श्रद्धेचा पक्षी असतोच..!
आपल्याकडे नसलेल्या ज्या गोष्टीची आपण आशा करतो, तिचा श्रद्धा हाच गाभा असतो. प्रत्यक्षात हाती काही नसतं. समोरही ते दिसत नाही, तरीही एका विलक्षण ओढीने पाय चालत राहातात. यशापर्यंत पोहोचवतात. श्रद्धा तुम्हाला लढण्याची इच्छाशक्ती देते. पुढे जात राहाण्याचं धैर्य देते. ऊर्जा देते. सबल बनवते. प्रोत्साहित करते. श्रद्धा जगवते आणि तगवतेही. कितीही संकटं येऊ दे...कितीही आव्हानं कोसळू दे, लख्ख प्रकाश असू दे की किर्र काळोख; आपण चालायला हवं, लढायला हवं, ही समज येणं म्हणजे श्रद्धा. खरं तर आपली जीवनश्रद्धाच आपल्याला निर्णय घ्यायला भाग पाडते. नावीन्याचा शोध घेण्यास सांगते. धाडस-साहस करायला लावते. प्रेरणा विचारांतून तर स्फूर्ती श्रद्धेतून मिळते.
ज्यांची स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा असते, ती माणसं यशस्वी होतातच. जर तुम्ही मोठी स्वप्नं बघू शकता तर ती तुम्ही पूर्णही करू शकता, असा विश्वास बाळगण्याची श्रद्धा असायला हवी. पण नुसती श्रद्धाच नव्हे; त्या श्रद्धेसोबत बांधिलकीही असायला हवी. आयुष्यात काही वादळी क्षण येतात. तुफान घोंगावतात. कोसळून टाकणाऱ्या स्थिती उद्भवतात, पण या साऱ्या परिस्थितीतही तग धरून राहाणं म्हणजे आपल्या जीवनश्रद्धेशी बांधिलकी जपणं !
जीवनात विचलित करणारी, मार्गातून दूर फेकणारी संकटं आली तरीही ही 'श्रद्धा' सांगते, हे सारं जाण्यासाठीच आलंय. फक्त तू टिकून राहा. संकटं निघून जाण्यासाठीच आलेली असतात. पण ही संकटं जावीत म्हणून कुणापुढे पालथं पडू नका. पडायचंच झालं,
तर पाठीवर पडा. म्हणजे वर पाहू शकाल अन् पुन्हा उठू शकाल! कुणा भोंदू माणसाच्या पुढे हात जोडून उभं राहाणं आणि कुठे कुठे फेऱ्या मारत राहाणं म्हणजे श्रद्धावंत असणं नव्हे. स्वतः काहीच न करता इतरांनी आशीर्वादाच्या बळावर आपली दुःखं हरण करावीत असं वाटून त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं, हे स्वार्थ लोभापायी किंवा आळसामुळे सरळ सरळ स्वतःची निष्क्रियता सिद्ध करण्यासारखं ! ही श्रद्धा नव्हेच. श्रद्धा क्रियाशील बनवते; निष्क्रिय नव्हे. श्रद्धा केवळ प्रवृत्ती नव्हे ती प्रत्यक्ष कृती आहे. श्रद्धा प्रभावी व्हायची असेल, तर कृती केली पाहिजे.
एका शास्त्रज्ञाचे एक नाही, दोन नाही तब्बल साडेतीन हजार प्रयोग फसले. पण तरीही तो थांबला नाही. अखेर तो यशस्वी झाला. त्याला त्याच्या यशस्वीतेचं कारण विचारलं. तो म्हणाला, माझी माझ्यावर श्रद्धा होती. माझी माझ्या क्षमतेवर श्रद्धा होती. मला यश मिळणारच यावर तर माझी प्रचंड श्रद्धा होती. म्हणूनच मी थांबलो नाही. प्रयोग करत राहिलो. माझ्या श्रद्धेने मला माझ्या सामर्थ्याची जाण दिली. यश दिलं.
तुमची इतरांवर किती श्रद्धा आहे, यावर तुमचं यश अवलंबून नसतं. तुमची तुमच्यावरआणि 'तुमच्या कृतीवर किती श्रद्धा आहे, यावर तुमचं यश अवलंबून असतं.