यशाचा पासवर्ड (भाग :73) - भिती (Fear)
भिती दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या गोष्टीला सामोरं जाणं..!
भीती माणसाला दुबळं बनवते, तर धाडस माणसाला यशस्वी बनवते. भीतीपोटी एखादी गोष्ट करायला माणसं धजावत नाहीत. ती आहे तिथेच उभी राहातात. मात्र जी धाडसाने पुढे घुसतात, ती यशस्वी होऊनच बाहेर पडतात. भयाने ग्रासलेले लोक कुठलाही शोध लावू शकत नाहीत. जगाला संपन्न करणारे सारे शोध निर्भयी माणसांनीच लावले आहेत.
लहान असताना स्वामी विवेकानंद बागेतल्या एका झाडावर चढले होते. झाडावर उलट-सुलट झोके घेणाऱ्या विवेकानंदना भीती दाखवण्यासाठी एक वृद्ध म्हणाला, 'अरे, त्या झाडावर भूत आहे. लवकर खाली उतर!' तसे 'विवेकानंद म्हणाले, 'ते भूत पाहातो आणि मगच उतरतो!”
ही निर्भयता कुठल्याही भीतीची भीती न घालता शोध लावण्यास प्रोत्साहन देते. कुणी सांगितलं म्हणून विश्वास न ठेवता शहानिशा करून खरं-खोटं ठरवण्याचा विवेक निर्भयता प्रदान करते.
भीतीचेही दोन प्रकार असतात. एक स्वाभाविक भय आणि दुसरं अस्वाभाविक भय किंवा भयगंड! स्वाभाविक भय हे नैसर्गिक असतं. मणसाला भीती वाटतेच. अचानक समोर साप दिसला की भीती वाटणारच. पण साप समोर नसतानाही तो केव्हाही येईल आणि दंश करेल या भीतीपोटी सहा फूट उंचीचा पलंग बनवून त्यावर झोपणं, हा भयगंडाचा प्रकार झाला.
अशा भयगंडामुळेच काहींना पाण्याची भीती वाटते. काहींना उंचीची भीती वाटते. रणांगणात प्रचंड पराक्रम गाजवणारा एक सेनानी कुत्र्याला खूप घाबरत असे. पाठीमागे घडून गेलेली एखादी घटना मनात भीतीच्या रूपात घर करून बसते. ती पुढे विनाकारण त्रास देत राहाते. अमावस्येला तिकडे जाऊ नये. तिथे बसू नये, असं लहानपणी कुणीतरी सांगितलेलं असतं. मोठेपणी नुसतं अमावस्या म्हटलं तरी मग भीतीने अंग शहारतं. वास्तविक, त्यात काही कारण नसतं पण विनाकारण आपण काही ग्रह करून घेतो. हे आपलं मानसिक दौर्बल्य असतं. अनेक गोष्टी ज्या आपल्याला प्रगतीकडे गतीने नेक शकतात, त्याच गोष्टींच्या भयगंडामुळे सातत्याने अपयश स्वीकारावं लागतं.
एकाचे सारे वाडवडील युद्धात मारले गेले, तरीही तो सैन्यात भरती झाला.. त्याला त्याच्या मित्राने विचारलं, 'तुझे आजोबा-वडील युद्धातच मारले. गेले. मग तुला सैन्यात जाताना भीती नाही वाटत?" त्याने मित्रालाच उलट विचारलं, 'तुझे आजोबा-वडील कुठं मरण पावले? तो म्हणाला, 'घरीच बिछान्यावर!' त्यावर तो म्हणाला, 'मग तुला बिछान्यावर झोपण्याची भीती वाटते का?"
भीती घालवण्याचा किंवा दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या गोष्टीला सामोरं जाणं. अनुभव घेतला की ज्ञान मिळतं. हा ज्ञानाचा प्रकाशच भीतीचा काळोख हटवणारा ठरतो.
मात्र थोडीफार भीती हिताची असते. ती स्वाभाविकच असते. सापाला काय भ्यायचं, असं म्हणून सरळ पुढे गेलात, तर दंश होणारच. धोका उद्भवणार. मात्र सापांचं पूर्ण ज्ञान घेतलं. विषारी-बिनाविषारी साप ओळखता आले. तसंच साप पकडण्याचं योग्य ज्ञान असलं, तर मग सरळ पुढे गेलात तरी चालेल. निर्भय असणं म्हणजे परिणामांची फिकीर न करता आगीत उडी घेणं नव्हे. निर्भयतेच्या जोडीला सुरक्षित सावधानता हवीच.
मला काहीच होणार नाही, म्हणून भन्नाट वेगाने वाहन चालवलंत, तर ते अपघाताला निमंत्रण. तिथे वेगाची थोडी भीती हवी. याचाच अर्थ सावधानता हवीच. परिणाम माहिती असूनही निव्वळ काय होतंय? म्हणून चुकीच्या गोष्टी किंवा सवय-व्यसन चालू ठेवणं म्हणजे स्वत: ची हानी करून घेणं. कष्टांच्या बळावर मिळवलेले यशाचे ताज परिधान करण्यासाठी शरीरच नसेल, तर उपयोग काय? चुकीच्या कृतीच्या परिणामांची भीती हवीच. तरच सावधान राहाता येतं आणि भयमुक्त सावधानताच यशाकडे नेते.