संस्कार म्हणजे काय ? | Yashacha Password (Part 72) - संस्कारमूल्य

 यशाचा पासवर्ड (भाग :72) -संस्कारमूल्य

विचार नि आचाराच्या परस्पर समन्वयातून प्रकट होणारं कृतिशिल सौंदर्य म्हणजे संस्कार..!

जीवन नावाच्या परिवर्तनप्रवाहाला घडवण्याचं सामर्थ्य संस्कारांत असतं. संस्कारातूनच संस्कृती विकसित होत जाते. माणसं जन्माला येतात, वाढतात. आपलं कर्तव्यकर्म करीत जीवनयात्रा पुरी करून निघून जातात. पण त्यांनी निर्माण केलेले संस्कार मात्र टिकून राहातात, ते पुढच्या पिढीत उतरतात. व्यक्तीकडून व्यक्तीकडे जातात. संस्काराचं आदान-प्रदान होत राहातं. ते जाणीवपूर्वक केलं जातं तेव्हा शिक्षणाचं रूप धारण करतं.

आपल्या वाट्याला येणारे आई-वडील, शिक्षक, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे संस्कार घडत जातात. मानवी मनं त्यातून तयार होतात. मिळालेल्या संस्कार प्रेरणेनुसार मग ती तशी तशी वागत राहातात. आजूबाजूच्या साऱ्या गर्दीत चांगलं तसं वाईटही विखुरलेलं असतं. त्यातील नेमकं काय वेचायचं, ते प्रत्येकाच्या हातात असतं.

Shyamchi Aai

एका गृहस्थाला दोन मुलं. एक चोऱ्या करणारा तर दुसरा सरळमार्गी! एकाने विचारलं असं का? चोऱ्या करणारा म्हणाला, माझे वडील चोऱ्या करत होते म्हणून मीही..! सरळमार्गी म्हणाला, चोऱ्या केल्याने माझे वडील तुरुंगात खितपत पडलेत. मी त्याच वाटेने कसा जाईन.. ?

एकाच घटनेपासून दोन बोध घेता येतात. निवड आपली असते. आपण कोणता पर्याय निवडतो, यावर आयुष्याचं यश अवलंबून असतं. त्यामुळे आमच्या वाट्याला असं आलं म्हणून आम्ही असे झालो, असं म्हणणं म्हणजे आपण चुकीचा पर्याय निवडला, हे मान्य न करणंच! चुका सुधारता येतात. सवयी बदलता येतात, संस्कारांनी ते शक्य होतं. आपल्या संवेदनशील जाणिवेच्या आधाराने आपण घडवत असलेला विधायक बदल म्हणजे संस्कार! विचार नि आचारांच्या परस्पर समन्वयातून प्रकट होणारं कृतिशील सौंदर्य म्हणजे संस्कार ! जे नैसर्गिक आहे, त्याच्यावर क्रिया, प्रक्रिया करून बदल घडवून आणतात ते संस्कार! ही चोहोदिशांची संस्कारांची उगमस्थानं एकत्र येतात. संस्कारधारा बनतात. लोकांच्या मना-मनांतून प्रवाहित होतात. पुढे संस्कारसमुद्र होत संस्कृतीचं रूप धारण करतात.

संस्काराने शरीर आणि मनाच्या शक्ती जागृत होतात. ज्यावर संस्कार होतात त्याच्या शक्ती वाढीस लागतात. ज्यावर होत नाही त्या निद्रिस्तच राहातात. आपले दोन्ही हात सर्व बाबतीत सारखेच असतात. पण संस्कार उजव्या हातावर होतो अन् तो लिहू लागतो. डावा हात मात्र मागे पडतो. त्यावर संस्कार झाला तर तोही लिहिता होऊ शकतो. परभाषा शिकावी लागते. मातृभाषा शिकावी लागत नाही. ती रोजच्या ऐकण्या-बोलण्यातून जमते. सातत्याने होणारे संस्कार वृत्तीत भिनून जातात.

मूर्ती विकणाऱ्या एका छोट्या गरीब मुलाची दया येऊन एका सद्गृहस्थाने त्याला १० रुपयांऐवजी शंभर रुपये दिले. मात्र त्या मुलाने ते घेतले नाहीत. फक्त दहाच रुपये द्या म्हणून तो अडून बसला. सद्गृहस्थ चकित झाला. त्याने विचारलं, अरे का घेत नाहीस पैसे ? तेव्हा तो छोटा मुलगा म्हणाला, 'मी तुमच्याकडून हे फुकटचे पैसे घेतले, तर माझ्या आईचं आयुष्य कमी होईल!'

आश्चर्याने पाहात त्या सद्गृहस्थाने विचालं, 'हे कुणी सांगितलं तुला?' तो म्हणाला, 'माझ्या आईने !”

आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या आपल्या मुलाला आपल्या जीवाची साक्ष देऊन फक्त कष्टानेच पैसे कमव, असा संस्कार करणारी ही आई... केवढी मोठी संस्कार शाळा!

सेवाभाव, समर्पणवृत्ती, प्रामाणिकता, मानवता अशा संस्कारमूल्यांचं शिक्षण देणाऱ्या 'शाळा' हव्यात. हल्ली सौंदर्यवृद्धीची केंद्रं उभी राहाताहेत, पण संस्कार समृद्धीची केंद्रं कुठे दिसत नाहीत. जग सुविधांनी संपन्न आहे, पण त्यात संस्कारमूल्यांचं दैन्य आहे. असं यश काय कामाचं ? 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने