यशाचा पासवर्ड (भाग :71) -संस्कार
यशाची कमाई ही संस्काराच्या कमाईवरच अवलंबून असते..!
तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व जुलमी ब्रिटिश राजवटीचा एका खेडेगावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षांचा मुलगा राहात होता. एके दिवशी या छोट्या रामला तिने एक काम सांगून बाजारात पाठवलं. राम निघाला. बाजार चौकात आला आणि अचानक थिजल्यासारखा जागच्या जागी स्तब्ध झाला. त्या चौकात इंग्रजांनी तिथल्या रयतेला झाडाला बांधलं होतं. त्यांच्या पाठीवर कोरडे ओढले जात होते. त्या अत्याचाराने तडफडणारी ती माणसं पाहून राम कळवळला. त्याला ते बघवेना. तो सरळ घरी आला. आईने विचारलं, 'काम केलंस?" त्यानं मानेने नकार दर्शवत त्या चौकात जे पाहिलं ते सांगितलं आणि म्हणाला, 'आई, तो इंग्रजाचा अन्याय.' तशी त्याची आई कडाडली, 'राम, एवढं सगळं घडत होतं, तेव्हा तू काय करत होतास ?"
राम म्हणाला, आई, मी काय करणार. मी एवढासा! तशी आई. उद्गारली, 'राम, धावून जायला हवं होतंस त्या इंग्रजांवर. लक्षात ठेव राम, जिथे अन्याय-अत्याचार होतो ना तिथे गप्प बसायचंच नसतं!
आईचे हे शब्द रामच्या मनावर कोरले गेले. आठवडाभरातच राम पुन्हा त्या चौकात गेला. पुन्हा तेच दृश्य. तो इंग्रजाचा अन्याय आणि विवश लोकांच्या उठणाऱ्या किंकाळ्या. ते फटकारे. तो आक्रोश ! राम बिथरला. हाताच्या मुठी आवळल्या. जिथे अन्याय होतो तिथे गप्प बसायचंच नसतं हा आईचा संस्कार त्याच्या मनात टकरा घेऊ लागला आणि राम थरारला. त्याने समोरचा दगड घेतला आणि भिरकावला इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेने. घाव वर्मी बसला. भळभळत्या रक्ताची ती जखम दाबीत इंग्रज अधिकारी कोसळला. पण थांबतो तो राम कसला? धावत जाऊन त्याने मोठा दगड उचलला आणि घातला इंग्रजाच्या डोक्यात. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तेव्हा टाचा घासत असणाऱ्या त्या इंग्रज अधिकान्याकडे बघत राम म्हणाला, 'आईने सांगितलंय मला, जिथे अन्याय होतो ना तिथे गप्प बसायचंच नसतं!" केवढा फरक. एक आठवड्यापूर्वीचा राम. भेदरून पळून आलेला आणि आता इंग्रज अधिकाऱ्यावर धावून गेलेला! फक्त एक संस्कार. आईचा एक संस्कार हा बदल घडवून गेला.
राम पकडला गेला. त्याचं वय पाहून बालगुन्हेगार म्हणून सोडून नाही दिला. इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली म्हणून त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. राम तुरुंगात गेला. एके दिवशी तुरूंग अधिकाऱ्याने त्याला सांगितलं, 'राम, उद्या तुला फाशी द्यायची आहे. तुझी शेवटची इच्छा काय ते सांग?"
इवलासा राम. पण शांतपणे म्हणाला, 'शेवटची इच्छा एकच. माझ्या आईला मला भेटायचंय!' रामच्या आईला बोलावणं धाडलं. ती आली. पण रडत-टाहो फोडत नाही. अभिमानी उराने आली. तिने रामला विचारलं, 'राम, का बोलावलंस?' तसा तिच्या कुशीत शिरत राम म्हणाला, 'आई, उद्या मला फासावर चढवणार. आतापर्यंत तू माझ्यावर संस्कार करत आलीस. मरण्यापूर्वी तुझा एखादा शेवटचा संस्कार माझ्यावर व्हावा, असं वाटलं म्हणून बोलावलं आई!' तशी रामची आई म्हणाली, 'राम, मातीसाठी देशासाठी बलिदान देतोयस. शेवटचा संस्कार ऐक. मरण्यापूर्वी, फासावर जाण्यापूर्वी तुझ्या डोळ्यांतून अश्रूंचा एक थेंबही नाही आला पाहिजे!' आणि ती ताडकन निघाली. पाच-सहा पावलं गेली. तिने अचानक वळून रामकडे बघितलं. रामचे डोळे पाण्याने भरले होते. ती संतापली. कडाडली, राम ऽऽऽ तसा राम धावत तिच्या कुशीत गेला. म्हणाला, 'आई, मरणाची भीती वाटतेय म्हणून नाही रडत. अगं, इतरांच्या आया त्यांच्या पोरांना जगण्याचे संस्कार देतात. मला अशी आई लाभलीय, जी माझ्यावर मातीसाठी मरण्याचे संस्कार करतेय. आई, डोळ्यांत पाणी तुझ्या आठवणीने आलं. फासावर जातोय म्हणून नाही! मिळालाच पुढचा जन्म, तर तूच माझी आई म्हणून येशील ना?' आणि भरल्या डोळ्याने आईनेही रामला घट्ट उराशी कवटाळलं.
यशाची कमाई ही संस्कारांच्या कमाईवरच अवलंबून असते. म्हणूनच संस्काराच्या संगतीत राहावं. ते देणारांच्या पंगतीत बसावं. कारण संस्काराचं यश हेच यशाचा संस्कार करत असतं.