यशाचा पासवर्ड (भाग :67) - धीर (Patience)
सुर्योदयाबरोबर अंधाराला हटवणारा प्रकाश येतच असतो... फक्त रात्र सरेपर्यंत धीर धरा..!
थांबा. पाहा. जा. हा फक्त प्रवासाचाच नव्हे, तर यशाचाही सर्वोत्तम मंत्र आहे. अतिघाई संकटात टाकणारी ठरते. कोणतीही कृती करताना, त्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती करून घेणं. धोक्याचा अंदाज घेणं आणि मग पूर्ण तयारीनिशी पुढे जाणं, हा सुरक्षित यश मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग! पूर्ण तयारी अभावी अथवा धोक्याची वा परिणामांची माहिती करून न घेता झेपावणे म्हणजे अपयशालाच कवटाळणे! पण हे माहिती असूनही माणसं अतिउत्साहीपणाने किंवा अतिधाडसीपणाने झेपावतात आणि कपाळमोक्ष करून घेतात. आततायी माणसांच्या वाट्याला यश कधीच जात नाही. विचारपूर्वक कृती करणारी आणि येणाऱ्या घटनेला संयमाने सामोरी जाणारी माणसं यशस्वी होतात.
यशाची वाट घडवायची असेल, तर वाट पाहाण्याची तयारी हवी. पण माणसं आज पेरलं की, उद्या लगेच ते उगवण्याची आणि परवापर्यंत फळ मिळण्याची अपेक्षा धरतात. यश इतकं स्वस्त नसतं. एक छोटंसं फुलपाखरू! पण या इवल्याशा जीवावर एक संशोधक भाळला. आकर्षित झाला. फुलपाखराबद्दलच्या जिज्ञासेपोटी तो झपाटल्यासारखा संशोधन करू लागला एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल ६९ वर्षं तो फक्त आणि फक्त फुलपाखराचाच अभ्यास करत राहिला आणि ६९ वर्षांनी इवल्याशा फुलपाखराच्या जीवनरचनेचा, शरीररचनेचा पट उलगडला. या ६९ वर्षांनी त्या संशोधकाला नोबेल पुरस्काराचा मान मिळवून दिला!
पेरलेलं उगवतंच, हा सृष्टीचा नियम आहे. ज्याची वाट पाहाण्याची तयारी असते, त्याला भरभरून मिळतं. मात्र झटकन आणि पटकन यश मिळवू पाहाणारी, वाट न पाहाणारी माणसं लगेच यश मिळत नाही, हे पाहून वाटा बदलत राहातात. नव्या वाटेला लागतात. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था करून घेतात.
एका सद्गृहस्थाने आपल्या शेतात बांबूची रोपं लावली आणि ती उगवून येण्याची वाट पाहू लागला. पण पहिल्या वर्षी काही उगवलं नाही. दुसऱ्या वर्षीही नाही. तिसरं वर्षही असंच गेलं. चवथ्या वर्षी त्याने ते शेन वैतागरने विकून टाकलं. दुसऱ्याला विकलेल्या त्याच्या त्या शेतात त्याने पाचव्या वर्षी सहज फेरफटका मारला, तेव्हा त्याने बघितलं बांबूचं रोप जमिनीचा उगवून आलं होतं. तो पुढे-पुढे पाहात गेला. इवल्याशा रोपाची टोक आता आभाळाकडे झेपावू लागली होती. त्याने उत्सुकतेने खोदून बघितलं. पाच वर्षांत रोपं जमिनीवर वाढली नव्हती. पण या पाच वर्षांत त्यांची मुळे मात्र जमिनीत खोलवर मैलोन्मैल पसरली होती. तो बिलक्षण हबकला. आता काही दिवसात इथं बांबूची जंगलं होतील.
पण दुर्दैव म्हणजे ती माझी नसतील., असं आर्ततेने पुटपुटत तो उद्गारला, मी थोडी वाट पाहिली असती तर? थोडा धीर धरला असता तर?
केलेली कोणतीही कृती, कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया निर्माण होतच असते. ती कदाचित प्रत्यक्ष स्वरूपात दिसत नसेल, पण अप्रत्यक्ष, अप्रकट रूपात तिची वाढ चालूच असते. सूर्यो दयाबरोबर अंधाराला हटवणारा प्रकाश येतच असतो. फक्त रात्र सरायची वाट पाहायला हवी. जमलं तर एखादी पणती, एखादी ज्योत बाहेर आणि मनातही सातत्याने पेटती ठेवायला हवी.
नोकरीसाठी एक युवक मुलाखत द्यायला त्या कंपनीत पोहोचला. तेव्हा त्याच्याआधीच पन्नास जण तिथे रांगेत हजर होते. तो त्या रांगेत उभा राहिला. वाट पाहाणं गरजेचं होतंच. पण वाट पाहाता पाहाता त्याने मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या सहाय्यकाला एक संदेश लिहून दिला आणि तो संदेश मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला द्यायला सांगितला, तो संदेश असा होता, कृपया तोपर्यंत कुणालाही नोकरी देऊ नका, जोपर्यंत तुम्ही ५१ व्या उमेदवाराची मुलाखत घेत नाही!
काही क्षणांतच मुलाखत घेणारा तो अधिकारी बाहेर येऊन त्याच्याजवळ पोहोचला. म्हणाला, 'मला नुसतीच वाट बघणारी नव्हे, तर कल्पकतेने आणि पुढाकार घेण्याच्या उत्साहाने नवी वाट निर्माण करणारीच माणसं हवी आहेत. मी तुला नोकरी दिली.'
नुसतीच वाट पाहू नका. त्या वेळेत नवी वाट निर्माण करा. यश त्वरित वाटेवर येईल!