यशाचा पासवर्ड (भाग :66) - अमर्यादता
यशाला मर्यादा कधीच नसतात जेव्हा तुम्ही अमर्याद असता..!
एका मंदिरात एक घंटा वाजवणारा होता. अचानक त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. या मंदिरात देश-विदेशातले भक्त येत असल्याने ट्रस्टींनी तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी येणं आवश्यक असल्याचं सांगून घंटा वाजवणाऱ्यालाही ते बंधनकारक केलं. मात्र त्याला ते जमलं नाही. त्याने ती नोकरी सोडली आणि पोटापाण्यासाठी काही करावं, म्हणून त्याच मंदिराच्या बाहेर चहाची एक टपरी टाकली.
खरं तर, यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात. मात्र एकाच वाटेवर आपण अडकून बसतो आणि बाकीच्या वाटा आपण आपल्याच हाताने बंद करून टाकतो. एक दार बंद झालं, तरी दहा दारं आपल्यासाठी उघडी असतात, हे आपण विसरतो. बंद दारापाशीच ते कधी ना कधी उघडेल म्हणून टकरा घेत बसतो. थोडेसे पैसे कमावण्यासाठी आपण तेच तेच काम पुनः पुन्हा करत बसतो. आणि इतर ठिकाणी आपली वाट पाहात बसलेले लाखो रुपये आपण गमावतो. जे फार काही देणार नाही, त्या कामात वेळ घालवून उपयोग नाही. पण तरीही त्याच क्षेत्रात आपण इतके अडकून पडतो की, दुसऱ्या क्षेत्रात समृद्ध व्हायची, यशस्वी व्हायची संधी असतानाही आपण रस्ता बदलणं धुडकावतो. याचं कारण, आपल्याला वाटतं की, ते क्षेत्र झं नाही. तिथे यश मिळेल की नाही याची खात्री नाही. इथे कमी मिळत असलं, तरी सुरक्षितता आहे. तिकडे गेलो तर इकडचंही जाईल! निव्वळ याच मानसिकतेपोटी आपण आहे, तिथेच रुतून बसतो.
जी माणसं सजग असतात, चौकस असतात, बदलायला तयार असतात. थोडंसं धाडस करायला सज्ज असतात. ती कुठेही गेली, तरी यशस्वी होतात. याचं कारण ती समृद्ध व्हायला तयार असतात. ती अमर्याद होण्यासाठी मर्यादा अमान्य करतात. तुमची मोठं होण्याची कल्पना जेवढी मोठी, तेवढे तुम्ही मोठं होणारच! तुमचा खिसा जेवढा मोठा तेवढं तुम्हाला मिळतंच. पण खिसाच छोटा शिवला, तर जास्त मिळून तरी उपयोग काय? जगात अफाट मोठे झालेले लोक असेच आहेत. अफाट यशाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे! ते कुठे अडकून पडले नाहीत. त्यांनी क्षेत्र बदलली, प्रांत बदलले, ते अधिकाधिक समृद्धीच्या दिशेने जात राहिले. जिथे जिथे यश, तिथे तिथे पोहोचत राहिले. त्यांना माहिती होतं, बसथांब्यावर उभं राहून विमानाची वाट बघण्यात अर्थ नाही!
आपल्या यशाचे थांबे ओळखता यायला हवेत. काळाचा वारा कोणत्या दिशेला वाहतो त्या दिशेला धावायला हवं! आपण काय उत्तम करू शकतो ते जाणायला हवं! तशी कृतिशील पावलं टाकत झेपावायला हवं! पैसा पैशाकडेच जातो. कारण तो माणूस पैसा नुसता पडून ठेवत नाही. तो दुसऱ्या क्षेत्रात गुंतवतो. म्हणून तो पैसा वाढतो. यशाचंही तसंच आहे. यशही यशाकडेच जातं. यशाचीही गुंतवणूक करता यायला हवी. तरच सर्वोच्च सर्वोत्तम नि समृद्ध होता येतं.
संकुचित, मर्यादित राहू नका. सातत्याने विस्तारत राहा. अधिक विस्तार अधिक स्रोत निर्माण करतो. तोच तुम्हाला यशस्वी होणारा बनवतो. पण इतरांनाही यशस्वी करणारा ठरतो.
प्रत्येकजण कुठे न कुठे अडकतो. त्या अवरोधात बसतो. आहे तिथेच फसतो. म्हणून थांबून राहू नका. पुढे चला. पुढे नवे पाऊल टाका. नव्या दिशा शोधा. लक्षात असू द्या, पेरलेलंच उगवतं. तुम्ही फक्त पेरत चला. जेवढं अधिक पेराल तेवढं अधिक मिळेल!