संकल्प करायचेच तर किरकोळ कशाला? असे करा की जगाला हेवा वाटावा | Yashacha Password (Part 65) -संकल्प (Resolution)

 यशाचा पासवर्ड (भाग :65) - संकल्प (Resolution)

निश्चयाने केलेले अन् निश्चयपूर्वक राबवलेले 

संकल्पच आपलं यश निश्चित करतात..!


New Year Resolution | संकल्प करायचेच तर किरकोळ कशाला? असे करा की जगाला हेवा वाटावा | Yashacha Password (Part 65) -संकल्प (Resolution)

नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यावर मी मित्राला विचारलं, यावर्षी काय संकल्प करणार ?

तो म्हणाला, कोणताच संकल्प करायचा नाही, हाच संकल्प करणार!

मी विचारलं का ?

तो म्हणाला, केलेले संकल्प पुरेच होत नाहीत.

मी पुन्हा विचारलं, असा कोणता संकल्प दरवर्षी करतोस?

तो म्हणाला, सर्वोत्तम होण्याचा!

मी म्हटलं, हेच तर कारण आहे संकल्प पूर्ण न होण्याचं! माणूस जेव्हा एकदम सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करतो. स्वतः मध्ये सगळे गुण एकदम आणू पाहतो, तेव्हा तो या प्रयत्नात अपयशीच ठरतो. मात्र जेव्हा तो एक-एक गुण ठरवून, शोधून तो आपल्यामध्ये बाणवण्याचा संकल्प करतो, तेव्हा तो त्यात सहज यशस्वी होतो. साऱ्या गुणांचा स्वतःमध्ये अंतर्भाव करून सर्वोत्तम ठरतो.

वरवर ठरवून, नुसतं म्हणून कार्य सिद्धीस जात नाही. खरं तर, आपण एखाद्या गोष्टीचा तत्त्वतः संकल्प करतो, याचाच अर्थ, ते करण्याचा आपला इरादाच नसतो. संकल्प ठाम असायला हवा. तो पक्का ठरवायला हवा. अपयश वाट्याला येतं, तेव्हा एवढंच सिद्ध होतं की, तुमचा संकल्प ठाम नव्हता! यश मिळवण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचा ठाम संकल्प महत्त्वपूर्ण ठरतो. महान कार्य कार्यशक्तीने नाही; संकल्पशक्तीनेच पूर्णत्वाला जातात. फक्त त्याला योग्य कष्टांची आणि कष्टाळू योग्यतेची गरज असते. प्रत्येक माणसात शक्ती असते. फक्त ती जागवण्याची आपण जबाबदारी घ्यायला हवी.

आपल्या रोजच्या जगण्या-वागण्यात आपल्या आपल्यालाच काही गोष्टी जाणवतात. आणि आपल्यात ते बदल करणं आपल्याला आवश्यक वाटतात. ही बदलाची गरज जेव्हा निर्माण होते, तेव्हा माणूस 'संकल्प' करतो. त्यासाठी ठराविक वेळेची, दिवसाची वा मुहूर्ताची गरज नसते. पण जेव्हा ती आपली गरज बनते. याचा अर्थ अजनूही आपली बदलण्याची पूर्ण तयारी झालेली नसते.

माणसात अशी एक शक्ती आहेच जी माणसाला त्याचवेळी उपलब्ध होते, जेव्हा त्याला काय हवं, हे निश्चित माहिती असतं आणि ती मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही, असा ती संकल्प करते. यश तेव्हाच वाट्याला येतं.

संकल्प छोटे-छोटे असतात; तर ध्येय मोठं असतं. मोठ्या ध्येयाची यशस्विता या छोट्या संकल्पाच्या यशस्वितेतच असते. निश्चयाने केलेले संकल्प आणि निश्चयपूर्ण राबवलेले संकल्पच आपलं वास्तव, आपलं यश निश्चित करतात.

संकल्प करावेच. पण संकल्पांचं विस्मरण होता कामा नये. ते सातत्याने स्मरत राहावे. या सातत्याने अंतर्मन जागं होतं. संकल्पपूर्तीसाठी कृतिशील पावलं उचलतं. एकच संकल्प पुनः पुन्हा करा, जोपर्यंत तो पूर्ण होत नाही. संकल्प एकट्यापुरते मर्यादित ठेवू नका. ते जगजाहीर करा. एकट्यापुरते ठेवले, तर ते अपूर्ण राहिल्याचे कुणाला कळणार नाहीत, म्हणून टाळता येतात.

जगजाहीर केले, तर मात्र ते पूर्ण करण्याची जबाबदारी उचलावीच लागते. आपण सगळेच आपलं स्वतःचं मूल्यमापन आपल्या संकल्पावरून करत असतो आणि इतराचं मूल्यमापन मात्र त्यांनी केलेल्या कार्यावरून ठरवत असतो. लक्षात असू द्या, हेच तुमच्याबद्दलही घडतं. लोक तुमचं मूल्यांकन तुमच्या संकल्पावरून नाही; तुमच्या कार्यावरूनच करतात. म्हणून नुसतेच संकल्प करू नका. ते कृतीत आणून पूर्णत्वाला न्या. संकल्पाच्या पूर्णत्वातच संपूर्ण यश सामावलेलं आहे.

आणि संकल्प करायचेच तर किरकोळ कशाला? असे करा की जगाला हेवा वाटावा. यशालाही तुमच्याकडेच येण्याचा संकल्प करावा लागेल!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने