बुध्दिमत्तेवर नव्हे तर तिच्या वापरावर यशाचं प्रमाण ठरत असतं.. ! | Yashacha Password (Part 64) - बुध्दिमत्ता (Intelligence)

 यशाचा पासवर्ड (भाग :64) -बुध्दिमत्ता (Intelligence)

बुध्दिमत्तेवर नव्हे तर तिच्या वापरावर यशाचं प्रमाण ठरत असतं.. !

राजा आपल्या प्रधानाला म्हणाला, 'तुम्ही एवढे बुद्धिमान, पण तुमचा मुलगा एवढा मूर्ख कसा ?' प्रधानाने विचारलं, 'काय झालं?' तेव्हा राजा सांगू लागला. 'तो पाठशाळेत जाताना मला नेहमी भेटतो. त्यावेळी मी त्याच्यापुढे एक सोन्याचं नाणं आणि एक चांदीचं नाणं ठेवतो आणि म्हणतो, यातलं मौल्यवान नाणं उचल. तेव्हा तो नेहमी चांदीचं नाणं उचलतो. मौल्यवान काय तेच त्याला कळत नाही. तो सोन्याच्या नाण्यापेक्षा चांदीचं नाणं घेऊन जातो. हा मूर्खपणाच नाही काय?' राजाचं हे बोलणं ऐकून प्रधानाला खूप वाईट वाटलं. घरी आल्यावर त्याने आपल्या मुलाला विचारलं, 'तू एवढा बुद्धिमान असून तुला सोन्या-चांदीतला फरक कसा कळत नाही. तू रोज मौल्यवान म्हणून चांदीचंच नाणं का उचलतोस?'

बुध्दिमत्तेवर नव्हे तर तिच्या वापरावर यशाचं प्रमाण ठरत असतं.. ! | Yashacha Password (Part 63) - बुध्दिमत्ता  (Intelligence)

तेव्हा त्याचा मुलगा झटकन् आत गेला आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेला डबा आणून प्रधानापुढे रिकामा केला. चांदीची ती असंख्य नाणी दाखवत मुलगा प्रधानाला म्हणाला, 'मला सोन्या-चांदीतला फरक कळत नाही, असं नव्हे. पण मी रोज पाठशाळेत जाताना राजाला माझी गंमत करण्याची लहर येते आणि तो मौल्यवान नाणं उचल असं म्हणून माझ्यापुढे एक सोन्याचं आणि एक चांदीचं नाणं ठेवतो. मी त्यातलं चांदीचं नाणं उचलतो. यावर राजासहित सगळे हसतात. माझ्या मूर्खपणावर आनंद मिळवतात. पण मीही ते जाणीवपूर्वकच करतो. कारण मला माहिती आहे, ज्यादिवशी मी सोन्याचं नाणं उचलीन, त्या दिवसापासून हा खेळ बंद होईल! एका सोन्याच्या नाण्यासाठी ही रोज मिळणारी चांदीची नाणी गमावण्याइतका मी मूर्ख नाही. त्यांना हे कळत नाही. ते मला खेळवत नाहीत. उलट, मीच त्यांना खेळवतोय!' खरं तर, इतरांपेक्षा शहाणं नि समंजस व्हायचंच; पण ते इतरांना कळू द्यायचं नाही, यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. सतर्कता, सजगता आणि संधिशोधकता ही सगळी बुद्धिमत्तेचीच अपत्यं असतात. ज्यांची बुद्धी गंजलेली असते, त्यांच्यामध्ये याच गुणांचा अभाव असतो. म्हणूनच बुद्धिमान लोक जी कामं तात्काळ करतात, तेच काम करायला मूर्ख लोक प्रचंड उशीर लावतात. खरं तर, ते उशीर लावतात म्हणूनच इतरांच्या तुलनेत मूर्ख ठरतात.

बुद्धिमान माणसं जगतात वर्तमानात. पण लक्ष ठेवतात भविष्याकाळावर! भविष्यातील घटनांचा ते आधीच अंदाज घेतात. त्यानुसार कार्यतत्पर होत परिस्थितीवर पूर्ण ताबा मिळवत ते परिस्थितीवर स्वार होत यशाकडे झेपावतात. ज्यांना हे साधत नाही, ते मात्र अजाण ठरतात. त्यांच्याकडे बुद्धी नसते, असं नव्हे! पण बुद्धीचा वापर करायचा असतो, हेच त्यांना ठाऊक नसतं. बुद्धी कुणाला कमी; कुणाला जास्त असं कधीच नसतं. बुद्धी साऱ्यांकडेच एकसारखी असते. मात्र बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करतात, तेच अधिकाधिक बुद्धिमान ठरतात.


बुद्धिमत्तेवर नव्हे तर तिच्या वापरावर यशाचं प्रमाण ठरत असतं. अनेकांकडे ज्ञान प्रचंड असतं, पण ते वापरण्याची बुद्धी नसते. जे बोलतं ते ज्ञान आणि जी ऐकते ती बुद्धी !

बुद्धिमान माणसं आपल्या डोक्यातलं गुपित कधीच सांगत नाहीत आणि मूर्ख माणसं आपल्या डोक्यात काहीच ठेवत नाहीत. मूर्ख कायम स्वतःचं गुणगान करतात; तर बुद्धिमान कायमच मूर्खाचं गुणगान करीत असतात. बुद्धिमान लोकांना जेवढ्या म्हणून संधी मिळतात, त्या त्यांनी स्वतःच निर्माण करून घेतलेल्या असतात. बुद्धिमान माणसं चुका मान्य करतात. चुकांतून शिकत अधिक समंजस बनतात. प्रत्येक माणूस कधी ना कधी पाच मिनिटं का होईना, पण मूर्खासारखं वागतोच. फक्त ती वेळ वाढू न देण्याची दक्षता जे घेतात, ते बुद्धिमान! कोणत्या गोष्टीला किती वेळ आणि किती किंमत द्यायची, हे ज्या दिवशी कळू लागेल, तो दिवस बुद्धिमान होण्याच्या दिशेला निघाल्याचा आरंभ असेल. आपण लवकरात लवकर शहाणे होण्यासाठी.. धडपडत राहाणं, हे बुद्धिमत्तेचं आणि यशाचंही लक्षणं आहे!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने