यशाचा पासवर्ड (भाग :60) - शिस्त (Discipline)
यश नुसत्या ताकदीच्या बळावर नाही शिस्तीच्या बळावरच मिळवता येतं..!
आपल्याला जे हवं आहे तेच मिळवण्यासाठी नियोजनबद्ध वाटचाल करणं म्हणजेच शिस्तबद्धता! संस्काराने, विचाराने, आचाराने ही शिस् लावता येते. ती प्रेमाने तसंच कठोरपणेही रुजवता येते. इतरांच्या इच्छेखातर पाळली जाणारी शिस्त ही तात्पुरती असते; तर स्वतःच्या इच्छेखातर स्वतः ला लावलेली शिस्त कायमस्वरूपी टिकते. तसं कोणतंच काम अवघड नसतं. अवघड असतं ते शिस्तबद्ध वागणं! ते सामाजिक संकेतांनी, नियमांनी किंवा कायद्यानेही मग घडवावं लागतं. त्याने सामाजिक शिस्त लागते. पण मनाची शिस्त ? आपण काय करावं नि काय करू नये, हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं. पण आपल्या इच्छेवर आपली सत्ता नसते. ओढाळ मन वाटेल ती इच्छा प्रकट करतं. कृती भरकटते. यशस्वी माणसांची इच्छेवर सत्ता असते. ती निर्माण करता येते. त्यासाठी वळणदार मन लाभावं लागतं. तेही कमावता येतं. मनाचं वळण शरीराला वळण लावतं. तिथे सांगावं वा समजावावं लागत नाही. जे उत्तम, उदात्त, मंगल तेच सहजपणे घडून जातं. त्यासाठी शरीराला कष्ट घेण्याची आणि आपल्याच मनाला कष्ट देण्याची तयारी असावी लागते.
तसे दोन प्रकारचे कष्ट साऱ्यांनाच सोसावे लागतात. एक शिस्त पाळण्याचे कष्ट आणि दुसरे पश्चात्तापाचे कष्ट! फरक एवढाच शिस्त पाळण्याचे कष्ट कणभर तर पश्चात्तापाचे कष्ट मणभर असतात.
जी माणसं योग्य वाटेवरून चालण्याची, ध्येयासाठी आवडत्या गोष्टी त्यागण्याची सर्वाधिक मेहनत करण्याची स्वतःला शिस्त लावतात, तीच माणसं सर्वात जास्त यशस्वी होतात. मोठेपणा प्राप्त झालेल्या जगातील माणसांच्या यशाचं हेच गमक की त्यांनी स्वतःला जिंकलं होतं. टंगळमंगळ .करणाऱ्या माणसांच्या बाबतीत यशही टंगळमंगळ करतं. मात्र शिस्तशीरपणे सातत्याने यशाच्या दिशेने चालणाऱ्यांच्या वाट्याला यशही त्याच शिस्तीत येतं.
एखादं सैन्य दुसऱ्या सैन्याहून श्रेष्ठ ठरतं ते त्यातील सैनिकांच्या संख्येमुळे नाही; तर सैन्याच्या शिस्तबद्धतेमुळे !
एकदा इंग्रजाचे वकील आणि पेशव्यांचे वकील मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरत होते. दोघांसोबत एकेक सैनिक होता. पेशव्यांच्या वकिलाने इंग्रज वकिलाला विचारलं, 'खरं तर मला तुम्हा इंग्रजाचं कौतुक वाटतं. तुम्ही इंग्रज मूठभर पण तुमच्या मूठभर लोकांनीच आमचा एवढा मोठा देश ताब्यात घेतला. आमचे इतके लोक पण तुम्ही एवढेसे इंग्रज आमच्यावर राज्य करता. हे कसं काय ?'
त्यावेळी त्या इंग्रज वकिलाने आपल्या सैनिकाला पाण्यात जाऊन समुद्रात उभं राहायला सांगितलं आणि पेशव्याच्या वकिलाला म्हणाला, 'आता तुमचा सैनिकही त्याच्याजवळ उभा करा!' पेशव्यांच्या वकिलाने आपल्या सैनिकालाही तिथे उभा केलं. आता थोड्या वेळाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं म्हणत इंग्रज वकील पुन्हा आपल्या चर्चेत गुंतला.
ती वेळ भरतीची होती. दोघेही सैनिक जिथे उभे होते तिथे पाणी वाढू लागलं. पाणी पायाला लागू लागलं तसा पेशव्यांच्या वकिलाचा सैनिक मागे-मागे सरकू लागला.
बऱ्याच वेळाने दोघा वकिलांची चर्चा संपली. तेव्हा दोघांनी आपल्या सैनिकांकडे नजर टाकली. इंग्रजांचा सैनिक त्याच्या छातीपर्यंत पाणी लागलं तरी तिथेच उभा होता. पेशव्यांचा वकील मात्र आपला सैनिक कुठे दिसतो का ते शोधत होता. तो सैनिक पाणी वाढत गेलं तसा मागे-मागे सरकत कधीच पसार झाला होता.
तेव्हा आपल्या सैनिकाकडे बघत इंग्रजाचा वकील सांगेपर्यंत माझा सैनिक बुडला तरी तिथून हलणार नाही. आम्ही मूठभर इंग्रज तुमच्यावर राज्य करतो, याचं कारण आमच्यातील ही शिस्त आहे. म्हणाला, 'मी आम्ही शिस्त पाळतोच कारण यश ताकदीच्या बळावर नाही, तर शिस्तीच्या बळावरच मिळवता येतं!"