यशाचा पासवर्ड (भाग :62) -आनंद (Happiness)
यश हा आनंदाचा स्त्रोत कधीच नसतो आनंद हाच यशाचा स्त्रोत असतो..!
ज्यांना गायचं असतं, ते नेहमी गाण्याच्या शोधात राहातात, ज्यांना आनंदी राहायचं असतं, ते नेहमी आनंदाच्या शोधात असतात. त्यामुळे दुःख त्यांच्या वाट्याला कधी येत नाही. पण जर दुःख वाट्याला आलंच तर समजावं दुःख नाही आपण रस्ता चुकलेलो आहोत.
एका जाणत्या महापुरुषाकडे एक व्यक्ती येऊन सांगू लागली, 'महाराज, माझी दारू सोडवा, माझं आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालंय. कृपा करून माझी दारू सोडवा.' हे ऐकताच ते महापुरुष ताडकन् उठले. त्यांनी एका खांबाला मिठी मारली अन् ते ओरडू लागले. 'मला सोडवा. मला सोडवा. या खांबाने मला धरलंय, मला सोडवा.'
हे पाहून ती व्यक्ती हसू लागली. म्हणाली, 'महाराज आपण जाणते म्हणून मी आपल्याकडे दारू सोडवण्यासाठी आलो होतो. पण आपण तर? अहो, तुम्ही स्वतःच उठून या खांबाला धरलंत आणि आता तुम्हीच ओरडताय, मला सोडवा. मला सोडवा. अहो, या खांबाने कुठे तुम्हाला धरलंय ?”
ती व्यक्ती जे समजायचं ते समजली. आपण आपल्या दुः खांना समस्यांना कवटाळून बसतो आणि टाहो फोडतो-मला सोडवा! आपल्या इच्छेशिवाय या सृष्टीत आपल्याला कुठलीच गोष्ट धरून ठेवू शकत नाही. धरतो ते आपणच! आपल्याला बदलण्याची क्षमता फक्त आपल्यातच असते. मी काय करू शकतो? मी काय निर्माण करू शकतो? अस म्हणत स्वतः चा शोध घेणाऱ्यांनीच जगाचा शोध लावला आहे. त्यातूनच त्यांना आनंदाचा शोध लागला आहे. ज्या गोष्टी मिळवता येत नाहीत, असं लोकांना वाटतं, त्या गोष्टी मिळवण्यातच सर्वात मोठा आनंद असतो. खरं तर, यश हा आनंदाचा स्रोत कधीच नसतो; तर आनंद हाच यशाचा स्रोत असतो. तुम्ही हसलात तर जग हसतं, तुम्ही रडलात तर मात्र तुम्हाला एकट्यालाच रडावं लागतं. आनंदी माणसाकडे यशच काय; पण जगही धावत येतं.
एका राजाने एका तत्त्वज्ञानी माणसाला एक ग्रंथ देऊन सांगितलं, या ग्रंथातील अर्थाचा शोध लावा. त्या तत्त्वज्ञाने एक वर्षाचा वेळ मागून घेतला. एक वर्षाने तो परत आला. राजाने अर्थ विचारला, तेव्हा तो तत्त्वज्ञ म्हणाला, 'या ग्रंथातून सापडलेला एकच अर्थ-यात काही अर्थ नाही! 'राजा चम कला. म्हणाला, 'यात काही अर्थ नाही तर त्यासाठी तुम्ही एक वर्ष घालवले कशाला? तत्त्वज्ञ शांतपणे म्हणाला, 'एक वर्ष घालवलं म्हणून तर कळलं ना. यात काही अर्थ नाही!' मग तुम्ही मिळवलं काय ? राजाने पुन्हा विचारलं, तत्त्वज्ञ म्हणाला, आनंद! यात काही अर्थ नाही या शोधाचा आनंद!
राजा हसला. आनंदी झाला. म्हणाला, 'कुठल्याही गोष्टीत आनंद शोधण्याची तुमची ही वृत्ती आवडली!' तसा तत्त्वज्ञ म्हणाला, 'महाराज, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दुः खाची नि आनंदाची! आणि निवड आपल्यालाच करायची असते. मी आनंदाचीच करतो. कारण आनंद हा संसर्गजन्य आहे; तो त्वरित सगळीकडे पसरतो. तुम्हाला विश्व आनंदी हवं असेल, तर तुम्ही आनंदी व्हा. आनंदात आपलंच काय, इतरांचं दुःख दूर करण्याचंही सामर्थ्य असतं. आनंदच जगण्याचं समर्थपण असतं आणि आनंदाची गोष्ट अशी की, आनंदाचं उगमस्थान आपल्याच अंतर्यामी असतं.
हसण्यामुळे हृदयाची जळमटं साफ होतात. आनंद मनाची स्वच्छता करतो. हसल्याने आपण आनंदी होत नाही. तर आपण हसतो आहोत या भावनेने आपण आनंदी होतो. हा आनंद चिरतारुण्य देतो. वृद्धत्वामुळे माणसाचं हसू कमी होत नाही. उलट न हसण्याने माणसं वृद्धत्वाकडे झुकत असतात. आनंदी राहा. कारण आनंदाच्या चावीनेच यशाचं दार उघडतं!