यशस्वी माणूस यशातून वा कौतुकातून नव्हे तर चुकांतूनच जास्त शिकला आहे..! | Yashacha Password (Part 61) - चुका (Mistake)

यशाचा पासवर्ड (भाग :61) - चुका (Mistake)

कोणताही यशस्वी माणूस यशातून वा कौतुकातून नव्हे तर चुकांतूनच जास्त शिकला आहे..!

एका चित्रकाराने एक सुंदर चित्र प्रदर्शनात लावलं आणि त्या चित्राखाली लिहिलं, ‘जर आपणांस या चित्रात काही चुकीचं वाटत असेल, तर त्या जागी लाल फुली मारा!' दुसऱ्या दिवशी त्याला प्रचंड धक्का बसला. सारं चित्रच लाल फुल्यांनी भरून गेलं होतं. त्याला वाईट वाटलं. आपण इतकं वाईट चित्र काढतो, या विचाराने तो पुरता ढासळून गेला. त्याची ही निराश अवस्था त्याच्या मित्राने पाहिली आणि तो म्हणाला, 'मित्रा, तू निराश का होतोस? तुझ्या इच्छेप्रमाणेच तर लोकांनी त्यांच्या आकलन क्षमतेनुसार चुका दाखवल्या. प्रत्येकाची नजर वेगळी असते. मुळात ज्यांनी चुका दाखवल्या त्यांना खरंच चित्राचं ज्ञान आहे का, हा विचार करून त्या लोकांनी दाखवलेल्या चुका तू निकालातसुद्धा काढू शकतोस. तसं केलंस, तर तुलाच ज्ञान आहे आणि तू चुकूच शकत नाहीस, असा विचारही त्यातून प्रकट होतो. मित्रा, मुळात आपल्याला सारं ज्ञान आहे, असं मानणं हेच सगळ्यात मोठं अज्ञान आहे! ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नव्हे; ज्ञानाचा असलेला भ्रम आहे. आपली कुणी चूक काढूच नये, असं तुला वाटत असेल, तर तुझं चित्र सर्वोत्तमच काय, पण कधी परिपूर्णही होणार नाही.

photo exhibition

'चुकांच्या छापांपेक्षा कौतुकाच्या पाठीवर पडणाऱ्या थापा प्रेरणादायी असतात. पण कौतुकाच्या या थापांखाली काही चुका लपल्या जातात. मग त्या कळल्याच नाहीत, तर सुधारणार कशा? कोणताही यशस्वी माणूस यशातून वा कौतुकातून नव्हे, तर चुकांतूनच जास्त शिकला आहे. शहाण्यातल्या शहाण्या, तज्ज्ञातल्या तज्ज्ञाकडूनही चुका होतात. मुळात तज्ज्ञ कुणाला म्हणतात? अज्ञानातून चुका घडतात. चुकामधून ज्ञान मिळतं. या ज्ञानातूनच तज्ज्ञ घडतात. ज्याची त्या क्षेत्रात कधी चूकच झाली नाही, तो तज्ज्ञ असूच शकत नाही. जो काम करतो, त्याच्याकडूनच चुका होतात. याउलट, मी तुझं अभिनंदन करतो की, चुका होणार हे माहीत असूनही तू काम केलंस. कारण चुकणं ही चूक नसते. मात्र, आपणाकडून चूक होईल, म्हणून कामच न करणे, ही सगळ्यात मोठी चूक असते. चुकीचं असतं, चूक दुरुस्त करण्याची नसणं किंवा सुधारण्यास नकार देणं. मित्रा, सर्वोत्तम होण्यासाठी आपल्या चुका समजणं अत्यावश्यक असतं. त्यातूनच आपल्या कमतरता दूर करता येतात. तू तेच केलंस आणि लक्षात ठेव, शंभर लोकांपैकी पंच्यात्रव लोकांना तुझं काम आवडेल, पण पाच लोक अशी असतील, ज्यांना ते आवडणार नाही. तुझं काम ज्यांना आवडेल त्या पंच्यान्नव लोकांसाठी नव्हे, तर ज्यांना आवडत नाही, त्या पाच लोकांसाठी काम कर. बघ, तेव्हा तुझं काम सर्वोत्तम होईल. आता आणखी एक कर, तू आणखी एक सुंदर चित्र काढ. ते तिथेच लाव आणि त्याखाली लिही, या चित्रात तीन चुका आहेत, त्या चुका शोधा आणि त्या जागी दुरुस्ती करा!'

त्या चित्रकाराने अगदी तसंच केलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं. तिथे कुणाचाही अभिप्राय नव्हता. कुणी चूकही दाखवली नव्हती. मग दुरुस्त करण्याचा तर प्रश्नच नव्हता.

चित्रकार चकित झाला. त्याने मित्राला विचारलं, 'हे कसं?' मित्र म्हणाला, 'मित्रा, दुसऱ्याच्या चुका दाखवणं सोपं असतं, पण त्या चुका दुरुस्त करणं कठीण! आपल्यापैकी प्रत्येकजण अज्ञानी असतोच; फक्त प्रत्येकाचे अज्ञानाचे विषय वेगवेगळे असतात. आपल्या अज्ञानाचं ज्ञान होणं; आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ठाऊक असणं, हेच खरं सर्वोत्तम ज्ञान! कोणताही मनुष्य जन्माला येताना ज्ञानी अथवा शिक्षित नसतो. काम करताना होणाऱ्या चुका सुधारूनच तो शहाणा होत असतो. जितकं आपण ज्ञान घेत जातो, तितकं आपलं अज्ञान आपल्या लक्षात येत जातं. ते चुकांतूनच आपल्याला उमजतं. 

चुका होतील, म्हणून धोका न पत्करता कामच टाळणारी माणसं घाबरट आणि अयशस्वी असतात. मात्र, चुकांचा धोका पत्करून काम करत पुढे जाणारे लोक शहाणे नि यशस्वी ठरतात. तर चुका ध्यानात येऊनही त्या न सुधारता त्याच पुनःपुन्हा करत राहाणारी माणसं मूर्ख असतात..

चुकून होणाऱ्या चुका क्षम्य. मात्र न चुकता चुकाच करत राहाण्याची चूक अक्षम्य! तिथे यश चुकतं आणि चकवतंही !

 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने