यशाचा पासवर्ड (भाग :60) - चिंता (Anxiety)
चिंता चितेकडे तर चिंतन चैतन्याकडे घेऊन जाते..!
एक स्त्री रोज पहाटे जात्यावर दळण दळायची. एके दिवशी पीठ दळता दळता तिच्या डोक्यात विचार आला. आपल्या रात एकूण पाच माणसं! त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी वीस भाकऱ्या रोज दळतो. म्हणजे आठवड्यासाठी एकशेचाळीस भाकऱ्यांचं पीठ दळायचं. महिन्याकाठी सहाशे भाकऱ्या, वर्षासाठी सात हजार दोनशे भाकऱ्यांचं आणि घरातली ही माणसं किमान पन्नास वर्षं जगली तर? ती हिशोब करत राहिली. म्हणजे पन्नास वर्षांसाठी तीन लाख साठ हजार भाकऱ्या. एवढं दळायचं? भाकऱ्यांच्या संख्येनेच तिचं डोकं गरगरू लागलं. तिच्या डोळ्यांपुढे तीन लाख साठ हजार भाकऱ्यांचा डोंगर उभा राहिला. जात्याबरोबर तीसुद्धा गरगरत राहिली. एवढं पीठ आपण कसं दळणार? कधी दळणार? आपल्याला कसं जमणार ? कसं होणार ? त्या चिंतेनेच ती विलक्षण हबकली आणि तिथेच धाडकन कोसळली.
माणसं प्रत्यक्षात काम करण्यापेक्षा त्या कामाच्या चिंतेनेच त्रस्त होतात. कारण कामापेक्षा ती चिंताच जास्त करत असतात. एखादी गोष्ट घडण्याअगोदरच ती नक्कीच घडणार, असं गृहीत धरून माणसं मस्तक धरून बसतात. त्यामुळे त्या गोष्टीला सामोरं जाण्याची उपाययोजना करण्याचंच विसरतात. परिणामी, ती छोटी असणारी गोष्ट मोठ्या स्वरूपात घायाळ करून जाते. वास्तविक, प्रत्येक गोष्ट छोटीच असते. आपली चिंताच तिला मोठी बनवत असते. माणसं वर्तमान सोडतात आणि भविष्यकाळाच्या चिंतेने चिंतातुर होतात. खरं तर दहा अडथळे समोरून येत असतील, तर आपल्यापर्यंत ते अडथळे पोहोचेपर्यंत त्यातून नऊ मध्येच नष्ट झालेले असतात. पण आपण विनाकारण त्याचा आधीच बाऊ करून ते आपल्या अंगावर ओढून घेत असतो. बरीच माणसं आपलं आयुष्य अशा गोष्टींची चिंता करण्यात घालवतात की, ज्या कधी घडल्याच नाहीत किंवा घडणारच नाहीत.
खरं तर, आपल्या हृदयाची काळजी तोपर्यंत करू नये, जोपर्यंत त्याची धडधड थांबत नाही. कारण हृदयाची धडधड थांबवणारी मुख्य गोष्ट ही अती काळजीच असते; दुसरं काही नव्हे! माणसांनी चिंता सोडायला हवी. पण मणसंला चिंतेपोटी काम करायचं सोडतात. कामाच्या दिवसापेक्षा चिंतेचा दिवस माणसाला अधिक थकवून घायाळ करीत असतो. पुढच्या दिवसाची काम करण्याची उमेदच तो हिरावून घेतो. प्रचंड चिंतेपोटी माणसं उदासीन बनतात. काही चिंतातुर जंतू तर इतकी चिंता करतात की, त्यांच्या आयुष्यातलीच नव्हे त्यांच्यामुळे इतरांच्या आयुष्यातलीही सृजनशीलता संपवून टाकतात. यशस्वी व्हायचं असेल, शांती मिळवायची असेल, तर माणसांनी चिंता करण्याऐवजी, समोर आलेल्या समस्येवर चिंतन करून समस्या सोडवली पाहिजे.
काही गोष्टी टाळताच येत नाहीत. त्यांना सामोरं जावंच लागतं. मग त्या टाळाव्या म्हणून किंवा चिंता करून त्यातून काहीही साधणार नसतं. अशा परिस्थितीत चिंतेचा उपयोग काय? त्यापेक्षा त्या गोष्टीवर चिंतन केलं तर त्यावर मात करून यश मिळवण्याचा मार्ग गवसू शकतो. अतिप्रमाणातील चिंता घातक असली, तरी थोडी चिंता किंवा हुरहुर ही नैसर्गिक असते. ती मनाला अस्वस्थ करते. ही अस्वस्थताच नवनिर्मितीची प्रेरणास्थान बनते. चिंता उदासीन कृतिहीनतेकडे नेते, तर चिंतनशील अस्वस्थता सृजनशीलतेकडे, कृतिशीलतेकडे नेते.
नुसतीच चिंता करीत उदासीन राहाणं, वास्तवाचा सामना न करता अन्याय नि दुःख पाहून गप्प राहाणं, हे मृत असल्याचं लक्षण! मात्र कशामुळे तरी चिंतित होणं, त्या अस्वस्थतेतून झडझडून उभं राहाणं आणि कृतिशील होणं म्हणजे जिवंतपणा! असं कुणीतरी पेटून उठल्याशिवाय समाजात बदल घडला नाही. इतिहास याची साक्ष आहे.
वैयक्तिक चिंतेतून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चिंता करायचीच तर ती विश्वाची करा. मग विश्वाच्या त्या चिंतेपुढे तुमची चिंता तुम्हाला खूपच छोटी वाटायला लागेल आणि विश्वाची मोठी चिंता संपवण्याच्या प्रयत्नात नवा इतिहास घडेल !