यशाचा पासवर्ड (भाग :57) - फरक (Difference)
छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठ्या यशाचा जन्म होतो.. !
महात्मा गांधीनी अमुक हे करा म्हणून कुणाला सांगितलं नाही. त्यांनी स्वतः ती गोष्ट केली. स्वतःमध्ये बदल केला. स्वतःपासून सुरुवात केली. त्यामुळे लोक गांधीजींचं अनुकरण करू लागले. त्यामुळे प्रचंड मोठं कार्य उभं राहिलं.
प्रत्येक मोठी गोष्ट ही छोट्या-छोट्या गोष्टीतूनच पूर्णत्वाला जाते. एक एक पाऊल उचलल्यानेच हजारो मैलांचा प्रवास पार पाडता येतो. थेंबाथेंबानेच 'तळे' साचवता येते. या छोट्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणारे आणि ते करणारेच मोठे होतात. मात्र एखादी गोष्ट छोटी म्हणून दुर्लक्ष करण्याने माणसं कायम मोठं होण्याला मुकतात. छोट्या गोष्टीचं गांभीर्य नसल्याने किंवा तिला महत्त्व न दिल्याने अनेक गोष्टी टाळल्या जातात. मात्र त्याच गोष्टी पुढे अपयशाचं मोठं कारण ठरतात. एखादी गोष्ट आज न केल्याने आज फारसा फरक पडत नसेल कदाचित, पण उद्या मात्र त्याचा बराच मोठा फरक पडतो. आज थेंब थेंब वाया जाणारं पाणी न थांबवता काय फरक पडतो? असं म्हणणारी किंवा वेळ असूनही करू उद्या. काय फरक पडतो, असं म्हणत काम टाळणारी माणसं उद्याच्या पाण्याच्या आणि वेळेच्याही भयाण दुष्काळाला सामोरे जाऊ शकतात. आजची बेपर्वाई आणि बेफिकिरी उद्यासाठी बेफाम तोटा घडवत असते.
स्वतःबद्दलचा अतिआत्मविश्वास, गांभीर्याचा अभाव, भविष्याबद्दलची अनास्था आणि छोट्या गोष्टींना दुय्यम मानण्याचा अहंभाव किंवा ती न केल्याने होणाऱ्या परिणामाबद्दलचं अज्ञान या गोष्टी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, धोक्याच्याच ठरतात. लोकांना सारं चांगलंचुंगलं हवं असतं. त्यासाठी बदल हवा असतो. मात्र त्यासाठी स्वतः काही करण्याची तयारी नसते. केल्याशिवाय मिळत नाही, ही वस्तुस्थिती असतानाही मी नाही केलं तर काय फरक पडतो? असं विचारणारी माणसं असतातच. एकाला सांगितलं, चल, स्वच्छता अभियान राबवू या! तो म्हणाला, राबवू या ना. पण मी एकटा काय करणार. बाकीचे नकोत का? यावर ठीक आहे असं म्हणून सांगणारा माणूस गेला. सोबत अनेक माणसं घेऊन आला. म्हणाला, चला आता. आलेत सारेजण! तसा तो म्हणाला, आता आलेत ना सारेजण. मग मी एकटा नाही आलो, म्हणून काय फरक पडतो ?
काय फरक पडतो म्हणून जबाबदारी टाळणारी माणसं काही मोठं घडवू शकत नाहीत. याउलट, प्रत्येक गोष्ट करताना फरक पडतो हे लक्षात ठेवून वागणारी माणसं मी कचरा करणार नाही. रस्त्यावर टाकणार नाही, असे म्हणत कृती करू लागली, तर अनेकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवण्याची गरजच पडणार नाही. शर्टाचं पहिलं बटण चुकलं की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात. मात्र पहिलं बटण बरोबर लागलं, की बाकीची बटणं न बघताही बरोबर लागतात. आपली प्रत्येक कृती ही इतरांना तशी कृती करण्यास भाग पाडत असते. म्हणून तुम्ही बदला. जग आपोआप बदलेल !
हा बदल घडवून आणण्यासाठी आपण कोण आहोत, लहान की मोठे, गरीब की श्रीमंत याने काही फरक पडत नाही. प्रत्येक माणसाने थोडा-थोड़ा करत बदल घडवून आणला, तर एक दिवस आपणच नव्हे तर सारं जग बदलेल!
एका ठिकाणी आग लागली होती आणि ती विझवण्यासाठी एका चिमणीची विलक्षण धावाधाव चालली होती. ती आपल्या चोचीत पाणी घ्यायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची. तिची धडपड एका कावळ्याने बघितली आणि तो तिला म्हणाला, “अगं, चिमणे. तू केवढी. तुझी चोच केवढी. तुझ्या चोचीत पाणी बसणार तरी किती आणि त्याने आग विझणार तरी किती? कशाला धडपड करतेस?"
तेव्हा ती चिमणी म्हणाली, 'हे बघ. माझ्या या धडपडीने आग विझेल की नाही, हे मला माहिती नाही. पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला. जाईल, तेव्हा आग लावणाऱ्यांत नाही; आग विझवणाऱ्यांत माझं नाव लिहिलं जाईल. म्हणूनच माझ्या धडपडीचा आगीला नसेल कदाचित, पण मला मात्र निश्चित फरक पडतो.'
लक्षात असू द्या. कृती छोटी असो वा मोठी, यशाला फरक पडतोच!